There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
सप्टेंबर २०१५ मध्ये नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्सची सुरुवात झाली. त्याआधी एक छंद म्हणून नेटभेट डॉट कॉम हा तंत्रज्ञानविषयक मराठी ब्लॉग लिहीत होतो.
मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डिप्लोमा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा पहिलं वर्ष प्रचंड कठीण गेलं. दहावीला असताना मी इंग्रजीमध्ये पहिला आलो होतो आणि तरीदेखील संपूर्णपणे इंग्रजीमधून शिकणं मला एवढं कठीण जात होतं, तर मग इतर विद्यार्थ्यांची कल्पनाच न केलेली बरी. तेव्हा खरंतर पहिल्यांदा मातृभाषेतून शिक्षण किती महत्त्वाचं आहे ते जाणवलं.
पुढे जेव्हा केवळ इंग्रजी भाषेमुळे अनेकांना शिक्षण व नोकरी मिळवण्यात येणारी अडचण पाहून हा भाषिक अडथळा दूर करण्यासाठी आपण काही तरी केलं पाहिजे असं वाटायला लागलं.
त्यानंतर नोकरी करत असताना एकदा एका मित्राने सांगितलं की, तो काही तरी ऑनलाइन बिझनेस करणार आहे.
मुळात ऑनलाइन बिझनेस करता येतो हेच मला माहीत नव्हतं. मी त्याच्यावर हसलो.
पण त्याने मला नीट समजावून सांगितलं की, ऑनलाइन बिझनेस कशा प्रकारे करता येईल ते. त्याची बिझनेस आयडिया ही फक्त आयडियाच राहिली, ती प्रत्यक्षात कधी उतरलीच नाही; पण मला मात्र त्याने एक नवीन दृष्टी दिली. तेव्हापासून मी जो ऑनलाइन जगाच्या प्रेमात पडलोय ते प्रेम आजतागायत तसूभरही कमी झालेलं नाही.
हे करताना माझ्या लक्षात आलं की, मी भाषिक आणि डिजिटल असे दोन्ही प्रकारचे अडथळे दूर करू शकतो आणि त्यातूनच ‘नेटभेट’चा जन्म झाला.
नेटभेटमधील तंत्रज्ञान विषयक लेख लोकांना आवडत होते आणि उपयोगीही ठरत होते, परंतु हे काम खूप वेळखाऊ होतं. अर्धवेळ काम करून नेटभेटला पूर्ण न्याय देता येत नव्हता. शेवटी मी नोकरी सोडून पूर्णवेळ नेटभेटचे काम करायचे ठरवले आणि यातूनच नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्सचा जन्म झाला.
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्समध्ये आम्ही अनेकविध विषयांचे ऑनलाइन कोर्सेस मराठी भाषेतून उपलब्ध करून दिले आहेत.
मायक्रोसॉफ्ट एक्सेल, वर्ड, पॉवरपॉइंटपासून ते सोशल मीडिया, वेब डिझाइन, डिजिटल मार्केटिंग अशा अनेक विषयांवरील कोर्सेस येथे उपलब्ध आहेत. यापैकी अनेक कोर्सेस आम्ही पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले आहेत. नेटभेटमध्ये विषयांचे बंधन नसून कला, व्यवसाय, तंत्रज्ञान, मार्केटिंग, भाषा, फायनान्स अशा अनेक विषयांवरील कोर्सेसचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.
काही तरी व्यवसाय करावा हे कॉलेजमध्ये असल्यापासूनच मनात होते, परंतु त्यासाठी उचित वातावरण नव्हते म्हणून नोकरी करत राहिलो. नोकरीत असतानादेखील एसी, रेफ्रिजरेटर दुरुस्तीचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. ग्रीटिंग कार्ड्स, सेंट विकायचाही प्रयत्न केला, पण हे तेवढ्यापुरतंच. फारसं काही जमलं नाही. पुढे नोकरी करत असतानाच एम.बी.ए.चं शिक्षण घेत असताना काही करण्याची ऊर्मी पुन्हा जागृत झाली. तोपर्यंत नेटभेट एक ब्लॉग म्हणून व्यवस्थित चालू होता. गुगलच्या जाहिरातींमधून पैसेदेखील चांगले मिळत होते; पण एक शाश्वत व्यवसाय म्हणून त्याला भविष्य दिसत नव्हतं. अशातच ऑनलाइन लर्निंगबद्दल काही वाचनात आलं आणि एका युरेका मोमेंटमध्ये कळलं की, मराठी (आणि इतर भारतीय भाषांमध्ये) ई-लर्निंग आणण्याचा प्रयत्न कोणीच केलेला नाही. म्हणून मीच याची सुरुवात करायची ठरवलं.
================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी आजच आमचे अॅन्ड्रॉइड अॅप इन्स्टॉल करा.
https://bit.ly/35Axjzz
================
दहावीनंतर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पूर्ण करून मी महिंद्रा ट्रॅक्टर्समध्ये दोन वर्षे ज्युनिअर इंजिनीअर म्हणून काम केलं. त्यानंतर गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड आणि गोदरेजमध्ये नोकरी केली. गोदरेजमध्ये असताना मॅनेजमेंट, बिझनेस, सेल्स आणि मार्केटिंग या क्षेत्रांशी माझा संबंध पहिल्यांदा आला आणि या विषयांची गोडीच लागली. अजून शिकण्यासाठी म्हणून मी एकाच वेळी बी.बी.ए. आणि बी.एस.स्सी. (आयटी) मध्ये प्रवेश घेतला. नोकरी करत असतानाच मी एकाच वेळी दोन्हीही पदवी अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर मला गोदरेज कंपनीनेच पुरस्कृत केलेला एम.बी.ए. प्रोग्राम करता आला.
गोदरेजमध्ये ज्युनिअर इंजिनीअर पदापासून सुरुवात करून दहा वर्षांतच मी असिस्टंट जनरल मॅनेजर झालो.
२०१५ साली नोकरी सोडली तेव्हा मी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांचा बिझनेस हेड होतो. गोदरेजचे तीन बिझनेस मी या दोन राज्यांमध्ये सांभाळत होतो, पण माझं मन मात्र ऑनलाइन जगात अडकलं होतं, म्हणूनच मी नोकरी सोडून पूर्णवेळ नेटभेटला द्यायचं ठरवलं.
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्सला सुरुवातीपासूनच खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. एका वर्षातच आम्ही ८ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्यापैकी सुमारे ३ हजार ५०० विद्यार्थ्यांनी विविध कोर्सेस केले.
त्याचसोबत आम्ही ऑफलाइन ट्रेनिंग घ्यायलादेखील सुरुवात केली आहे. मराठी बांधवांना आपल्या मातृभाषेतून सर्व काही शिकता यावे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आहोत. ऑनलाइन कोर्सेस असल्यामुळे जगातील प्रत्येक मराठी माणसाकडे आम्ही पोहोचू शकतो. कमीत कमी खर्चात, आपल्या वेळेनुसार आणि सोयीनुसार हे कोर्सेस शिकता येतात. मराठीनंतर आम्ही हिन्दी, गुजराती, तेलुगू अशा इतर भाषांमध्येही जास्तीत जास्त कोर्सेस उपलब्ध करून देणार आहोत.
लवकरच आम्ही स्पर्धा परीक्षांसाठीचे कोर्सेस आणि ऑनलाइन परीक्षादेखील (MOCK TEST) उपलब्ध करून देणार आहोत.
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स हा एक प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये विविध विषयांमधील तज्ज्ञ ऑनलाइन कोर्सेस बनवून थेट विद्यार्थ्यांना विकू शकतात. त्यामुळे त्यांना पैसे कमावण्याचा एक अतिरिक्त स्रोत निर्माण होईल.
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स हे स्टार्टअप पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित आहे. ऑनलाइन शिक्षण असल्याने ते संगणक, मोबाइल, टॅबलेट, स्मार्ट टीव्ही अशा अनेक उपकरणांद्वारे पाहता येते. इंटरनेटशी जोडला गेलेला प्रत्येक नागरीक या कोर्सचा फायदा घेऊ शकतो. या दसर्याला आम्ही नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्सचे मोबाइल अॅपही लाँच केले आहे.
नेटभेटला शक्य तितकी स्वायत्तता देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही इतरत्र फंडिंगसाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्णपणे बूटस्ट्रॅपिंगमधूनच नेटभेट उभी राहिली आहे. आमचे ग्राहकच आमचे खरे गुंतवणूकदार आहेत. ग्राहकांनी विकत घेतलेल्या कोर्सेसमुळे आम्ही एका वर्षातच ब्रेक-एव्हनपर्यंत येऊ शकलो आहोत.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. स्किल डेव्हलप्मेंट क्षेत्रामधील कोर्सेस पूर्ण झाल्यानंतर आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी उत्तमोत्तम शिक्षकांकडून ऑनलाइन कोर्सेस बनवून घेणार आहोत. हे सर्व कोर्सेस मुलांना पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचसोबत आम्ही सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध करून देणार आहोत जे विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यास मदत करतील. एकूणच शिक्षण सोपे आणि स्वस्त करून मराठी बांधवांना प्रगतिपथावर नेण्यासाठी नेटभेट कटिबद्ध आहे.
================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा -
SUBSCRIBE - https://good.gl/JtFkBR
===============
धन्यवाद !
सलील चौधरी
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com