ययाती सिंड्रोम

भागवत पुराणात सांगितलेली ययातीची कथा. नहुष राजाचा पराक्रमी पुत्र, ययाती हा एक महान चक्रवर्ती सम्राट होता. आपल्या पराक्रमाने, सौंदर्याने आणि शासनाने त्याने कीर्ती मिळवली होती. पण एका चुकीमुळे, दैत्यांचे गुरु शुक्राचार्यांनी त्याला अकाली वृद्धत्वाचा शाप दिला. ऐन तारुण्यात आलेलं हे वार्धक्य ययातीला सहन झालं नाही. त्याने शुक्राचार्यांची खूप विनवणी केली. तेव्हा त्यांनी शाप पूर्णपणे मागे न घेता एक पर्याय दिला - "जर तुझा कोणी पुत्र स्वेच्छेने त्याचं तारुण्य तुला देऊन तुझं वार्धक्य स्वीकारायला तयार झाला, तर तुला तुझं तारुण्य परत मिळेल."
ययातीने आपल्या मोठ्या पुत्रांना विचारले, पण कोणीही आपल्या तारुण्याचा त्याग करून वडिलांचे वार्धक्य स्वीकारायला तयार झाले नाही. शेवटी, त्याचा सर्वात धाकटा पुत्र, पुरु, वडिलांच्या सुखासाठी आपले तारुण्य द्यायला तयार झाला.

ययातीला पुन्हा तारुण्य मिळालं. त्यानंतर त्याने अनेक वर्षे, सर्व प्रकारची ऐंद्रियिक सुखे आणि ऐषोआराम भोगले. जगातील सर्व सुखं त्याच्या पायाशी लोळण घेत होती. पण इतका भोग घेऊनही त्याच्या मनाला शांती मिळाली नाही, तृप्ती लाभली नाही. तेव्हा त्याला एक महान सत्य उमगले. त्याने स्वतःशीच म्हटले:


न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति। हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते॥
अर्थात: "इच्छांची पूर्तता करून कधीही इच्छा शांत होत नाहीत. जसे अग्नीत तूप (हवि) टाकल्याने अग्नी विझत नाही, उलट तो अधिकच भडकतो, त्याचप्रमाणे भोगांच्या उपभोगाने वासना अधिकच वाढतात."
हा साक्षात्कार झाल्यावर ययातीला आपली चूक कळली. त्याने तात्काळ आपला पुत्र पुरुला त्याचे तारुण्य परत केले आणि राज्याचा त्याग करून तो मोक्षाच्या शोधात वनात निघून गेला.
ययातीची कथा ही केवळ एक पौराणिक कथा नाही, तर ती आजच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाचे अचूक वर्णन करते. आपण सर्वच कुठेतरी 'ययाती' झालो आहोत.

एखाद्या प्रमोशनसाठी आपण दिवसरात्र एक करतो. ते मिळाल्यावर काही काळ आनंद होतो, पण लगेचच पुढच्या प्रमोशनचे, जास्त पगाराचे किंवा मोठ्या केबिनचे वेध लागतात. एका यशस्वी प्रोजेक्टनंतर दुसरा, दुसऱ्या नंतर तिसरा... ही शर्यत कधीच संपत नाही. आपल्या सहकाऱ्याच्या गाडीपेक्षा मोठी गाडी, त्याच्या घरापेक्षा मोठं घर, या तुलनेच्या अग्नीत आपण आपलं मानसिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक सुख 'तूप' म्हणून टाकत असतो. आपण आपल्या आरोग्याचे आणि वेळेचे 'तारुण्य' देऊन करिअरचे 'वार्धक्य' विकत घेत आहोत का?
बाजारात आलेला नवीन मोबाईल फोन आपल्याला हवा असतो. तो मिळाल्यावर काही महिन्यांतच त्याचं नवीन मॉडेल येतं आणि आपलं मन पुन्हा अशांत होतं. सोशल मीडियावर मिळणारे लाइक्स आणि फॉलोअर्स हे देखील असेच आहेत. शंभर लाइक्स मिळाले की हजारांची अपेक्षा, हजार मिळाले की लाखांची. प्रत्येक नोटिफिकेशन हा त्या अग्नीत टाकलेल्या तुपाच्या थेंबासारखा आहे, जो आपली मान्यतेची भूक अधिकच वाढवतो.


================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================


किंवा एका नात्यातून दुसऱ्या नात्यात सुखाच्या शोधात फिरणारी व्यक्तीसुद्धा ययातीसारखीच आहे. तिला वाटते की बाह्य परिस्थितीत किंवा व्यक्तीमध्ये बदल केल्याने सुख मिळेल, पण खरा बदल तर आतून घडायचा असतो.
ययातीला हे समजायला बरीच वर्षे लागली, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. राजा ययातीने अनेक वर्षांच्या भोगानंतर जे सत्य जाणले, ते हेच की खरा आनंद बाहेरील वस्तू किंवा परिस्थितीत नाही, तर तो आपल्या आत, आपल्या संयमात आणि समाधानात आहे. सुख हे इच्छापूर्तीमध्ये नाही, तर इच्छांवर नियंत्रण मिळवण्यात आहे. जेव्हा आपण आपल्या इच्छांचे गुलाम न बनता स्वामी बनतो, तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने शांती आणि समाधान लाभते.

SBFC कंपनीचे CEO असीम धृ यांच्या एक मुलाखतीत त्यांनी किस्सा सांगितलं होता. दुबई शॉपिंग फेस्टिव्हल चालू होता, ते एका मोठ्या मॉल मध्ये उभे होते. आजूबाजूला लोक प्रचंड शॉपिंग करत होते. एकमेकाला खरेदी केलेल्या वस्तू दाखवत होते. लुई व्हिटोन, प्राडा अशा महागड्या ब्रँडसच्या पिशव्या मिरवत होते. तेव्हा असीम यांच्या मनात विचार आला की त्यांना काहीच विकत घेण्याची ईच्छा नव्हती. ते म्हणाले की " तुम्हाला जे पाहिजे ते उपलब्ध आहे....तुमची ते मिळविण्याची ऐपत आहे ...आणि तरीही तुम्हाला ते नको आहे....हीच आनंदाची गुरुकिल्ली आहे !"


जसं गुरुदत्त म्हणाला होता ......
ये महलों, ये तख़्तों, ये ताजों की, दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?.....

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !