There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
१९३० चं दशक. व्हिएन्ना शहर.
फ्रिट्झ नावाच्या एका उद्योजकाच्या घरी चाललेली डिनर पार्टी. मेणबत्त्यांच्या प्रकाशात उजळलेली जेवणाची टेबलं. रेशमी गाऊन्स घातलेल्या स्त्रिया. भरलेल्या ग्लासांच्या टकटक आवाजात मिसळलेल्या उद्योजकांच्या आणि सत्ताधाऱ्यांचा गप्पा.
आणि त्या टेबलाच्या टोकाला बसलेली एक मोहक, थक्क करणारी सुंदर स्त्री — हॅडविग किस्लर.
ती फ्रिट्झ ची पत्नी होती. तो एक श्रीमंत शस्त्र व्यापारी होता. पण फ्रिट्झचं तिच्यावर प्रेम नव्हतं. त्याच्यासाठी, ती एक शोभेची वस्तू होती, एक दागिना होती, ज्याचं प्रदर्शन तो मोठ्या सोसायट्यांमध्ये करत असे. तिच्यासाठी, या पार्ट्या म्हणजे एक तुरुंग होता, जिथे ती शांतपणे बसून शक्तिशाली पुरुषांना येणाऱ्या युद्धासाठी बनवल्या जाणाऱ्या शस्त्रांबद्दल बोलताना ऐकत असे. यामध्ये भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, राजकारणी......आणि हो, नाझी (Nazis) सुद्धा होते.
https://www.facebook.com/share/1FHQeGCK4U/?mibextid=wwXIfr
हेडविगला त्यांचा तिरस्कार वाटत होता. तिला आवडत नव्हतं की ते तिच्या घरात हसत-खेळत होते, किंवा तिचा नवरा त्यांना शस्त्रात्रं विकत होता. आणि एका संध्याकाळी तिने ठरवलं — बस्स, आता पुरे झालं.
पुढच्या पार्टीत तिने योजना आखली.
मेकअप लावायला जाते” असं सांगून ती उठली.
आणि परत आलीच नाही.
दुसऱ्या सकाळी, पॅरिस रेल्वे स्टेशनवर ती उतरली — एकटी, स्वतंत्र, नव्या सुरुवातीस तयार असलेली !
पुढे लंडनमध्ये तिची भेट झाली चित्रपट सम्राट लुई बी. मेयर यांच्याशी.चित्रपटात काम करण्यासाठी ती त्याच्यासोबत अमेरिकेला निघाली. अमेरिकेच्या जहाजावर बसताना तिने नवीन नाव घेतलं हेडी लामार.
थोड्याच दिवसांत ती पडद्यावर झळकली आणि १९४१ पर्यंत तिची ओळख झाली — जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून.
पण सौंदर्यही कैद बनू शकतं.
तिला फक्त सौंदर्यासाठी काम मिळायचं. डायलॉग्ज मिळत नव्हते , चांगले रोल्स मिळत नव्हते. फक्त उभं राहायचं आणि मोहक दिसायचं.लोक तिला (आणि सर्वच सुंदर स्त्रियांना) मूर्ख समजायचे !
पण हेडी मूर्ख नव्हती. उलट — ती एक हुशार स्त्री होती. तिला तंत्रज्ञानात रस होता. सतत काही न काही नवीन शोधण्याचा ती प्रयत्न करत असे.
त्याचवेळी अटलांटिकमध्ये जर्मन पाणबुडींनी शत्रूची जहाजं बुडवल्याच्या बातम्या तिच्या आल्या .तिला व्हिएन्नातील त्या डिनरपैकी एक संभाषण आठवलं — लष्करी वापरासाठी रेडिओ लहरींचा वापर करण्याबद्दल कोणी तरी शास्त्रज्ञ तिच्या पतीबरोबर बोलत होता.
तिला सुचलं —
जर टॉर्पेडोला (पाणबुडीतून सोडलेले क्षेपणास्त्र) नियंत्रित करणारा सिग्नल एका फ्रीक्वेन्सीवर न थांबता सतत बदलत राहिला, तर शत्रूला तो पकडता येणार नाही ?
तीनं यावर काम सुरु केलं. ही कल्पना प्रत्यक्षात आणली, पेटंट मिळवलं आणि अमेरिकन नेव्हीला जर्मन जहाजांविरुद्ध वापरण्यासाठी मोफत दिलं.
पण नेव्हीला हे मान्यच नव्हतं की जगातील सर्वात सुंदर स्त्री त्यांच्या अभियंत्यांना न सुटलेली समस्या एकटी सोडवू शकते. त्याऐवजी तिला सल्ला देण्यात आला “ते कर जे तुला जमतं !" (थोडक्यात फक्त उभं राहायचं आणि मोहक दिसायचं !). ते करून युद्धात मदत करता आली तर करा असं सांगण्यात आलं.
हेडीला वाईट वाटलं. पण तिला नाझींचा इतका तिटकारा होता की तिने हेही करण्याचं ठरवलं ! तिला माहित होतं — लोक तिच्या सौंदर्यासाठी पैसे देतील.
ती युद्धासाठी फंड गोळा करायला लागली. जे लोक मदत करतील त्यांना चक्क चुंबन द्यायला सुरुवात केली. तिला किस करता यावं म्हणून लोक मदत करायला लागले. लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या — एका रात्रीत तिनं $७ मिलियन जमा केले. आणि एकूण $२५ मिलियन जमा केले.
हे इथे संपलं असतं तरी मोठीच स्टोरी झाली असती —
जगातील सर्वात सुंदर स्त्रीने नाझींना चुंबनाने हरवलं !
पण खरी कथा इथे संपत नाही.
त्यानांतर काही दशकांनी १९६२ मध्ये — क्यूबन मिसाईल क्रायसिस मध्ये, नेव्हीने अखेर हेडीचं तंत्रज्ञान वापरून पाहिलं. आणि ते अफलातून निघालं.
तिला त्याचं श्रेय मिळालं नाही, पैसेही दिले नाही, तिने मागितलेही नाही — पण तिचं “फ्रिक्वेन्सी हॉपिंग” तंत्रज्ञान पुढे उपग्रह संप्रेषण, जीपीएस मध्ये वापरलं गेलं. आणि हो जे तंत्रज्ञान वापरून तुम्ही आता हा लेख वाचत आहात.... त्या Wi-Fi चा पायाभूत आधारामध्ये पण तिच्या संशोधनाचा हातभार आहे !
आज तुम्ही मोबाईलवरून मेसेज पाठवताय, व्हिडिओ बघताय, हे सगळं त्या स्त्रीमुळे शक्य झालं — जी एका रात्री व्हिएन्ना सोडून गेली… आणि अख्खं जग बदलून गेली ! कधी कधी जग बदलण्यासाठी बंदुका, बॉम्ब किंवा सैन्याची गरज नसते… फक्त एका धाडसी पावलाची, एका चांगल्या कल्पनेची आणि जिद्दीची गरज असते !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !