Value Based Pricing

लघुउद्योजकांच्या एका ग्रुपसाठी सेवा आणि उत्पादनाच्या किंमती कशा ठरवायच्या (Pricing Strategies) याबद्दल मी एक ट्रेनिंग दिले होते. त्यामध्ये सांगितलेली ही गोष्ट -
ही गोष्ट १५व्या शतकातील आहे — स्कँडिनेव्हियाच्या संयुक्त राज्याचा राजा आणि डेन्मार्कमधील क्रोनबर्ग येथील गोष्ट.
स्कँडिनेव्हियाच्या संयुक्त राज्याचा राजाने आपल्या प्रदेशातील समुद्रमार्गातून जाणाऱ्या जहाजांवर “toll” (मार्गशुल्क) आकारण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हे शुल्क प्रत्येक जहाजासाठी ठराविक दराने आकारलं जात होतं. पण हा मार्ग योग्य नव्हता.
कारण सर्व जहाजं एकसारखी नव्हती, ते वाहून नेत असलेला माल वेगवेगळ्या प्रकारचा आणि किंमतीचा होता. त्यामुळे कमी किमतीचा माल नेणाऱ्या जहाजांना नुकसान आणि जास्त किंमतीचा माल नेणाऱ्या जहाजांना फायदा होत होता.
म्हणूनच दुसरा पर्याय निवडला. मालाच्या वजनावर आधारित शुल्क ठरवणं. पण इथेही एक अडचण होती — जहाजातील मालाचे वजन करणे सोपी गोष्ट नव्हती. आणि व्यापारी खरे वजन सांगतीलच असं नव्हतं. ही वेळखाऊ, किचकट प्रक्रिया देखील उपयोगी पडली नाही.
अशा वेळी राजाच्या मदतीला आला एक बुद्धिमान माणूस — पेडर ऑक्स (Peder Oxe).
त्याने एक विलक्षण कल्पना वापरली — त्याने व्यापाऱ्यांना जहाजवरील मालाचे मूल्य घोषित करायला सांगिले. आणि व्यापाऱ्यांनी सांगितलेल्या मूल्यावर एक ठराविक टक्केवारीने टोल आकारला जाईल असे सांगितले. साहजिकच व्यापारी टोल वाचविण्यासाठी आपल्या मालाची किंमत कमी दाखवतील असे तुम्हाला वाटले असेल. पण इथेच खरा खेळ होता — पेडर ऑक्सने आणखी एक अट घातली होती. राजाला वाटल्यास त्याच्याकडे मालाची संपूर्ण खरेदी करण्याचा अधिकार होता.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2

येथे क्लिक करा.

================

आता व्यापारी फारशी फसवाफसवी करूच शकत नव्हते.
जर त्यांनी मालाचं मूल्य जास्त सांगितलं, तर राजा खरेदी करेल की नाही हे सांगता येत नाही, पण टोल मात्र जास्त भरावा लागेल.
आणि जर त्यांनी किंमत कमी सांगितली, आणि राजाने खरेदीचा पर्याय निवडला तर — मोठं नुकसान निश्चित!
शेवटी व्यापाऱ्यांसाठी सर्वात चांगला पर्याय एकच होता — मालाची खरी किंमत जाहीर करणं आणि त्या प्रमाणे टोल भरणं.
या एका बुद्धिमान निर्णयामुळे राजाचं टोल उत्पन्न तीनपट वाढलं आणि त्याच पैशांत क्रोनबर्ग किल्ला उभारला गेला.
थोडक्यात काय, लबाडी करून, फसवाफसवी करून एकाचा फायदा आणि दुसऱ्याचं नुकसान होत असेल तर तो व्यवहार दीर्घकाळ टिकत नाही. प्रामाणिक राहण्यातच सर्वांचा दीर्घकालीन फायदा आहे.
ही कल्पना म्हणजे “game theory" चे चांगले उदाहरण आहे. जिथे माहिती पुरेशी उपलब्ध नाही (माहितीचा असमतोल) तिथे Game Theory वापरली जाते. या थिअरीची खूप रंजक उदाहरणे आपल्या दैनंदिन जीवनात आढळतात. एक नागरीक म्हणून आपण हा देश कसा सुधारू शकतो हे पण आपल्याला Game Theory मधून शिकता येईल.
त्याबद्दल सविस्तर बोलूया, पुढील लेखात !

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

What would you like to learn today?