उमवेल्ट

कल्पना करा, तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्याला घेऊन बाहेर फेरफटका मारायला गेला आहात. तुम्ही आजूबाजूला दिसणाऱ्या ओळखीच्या माणसांना भेटताय, थांबून बोलताय. वातावरणातला गंध , गाड्यांचे आवाज आणि वाऱ्याची झुळूक तुम्हाला जाणवते आहे.
तुमचा कुत्रा सोबत चालतोय पण तो इथेतिथे ओळखीच्या खुणा हुंगत चाललाय. ओल्या नाकपुढ्या हवेतील असंख्य गंध साठवतायत, गंधांवरून तो जगाचा अर्थ लावतोय. त्याला ते आवाज ऐकू येत आहेत जे तुम्हाला ऐकू येत नाही. त्याला ते दिसतंय जे तुम्हाला दिसत नाही किंवा तुम्ही सवयीने दुर्लक्ष करताय.
त्या कुत्र्याच्या अंगावरील केसात एक गोचीड लपून बसली आहे. त्या अंध आणि बहिऱ्या जिवासाठी जगाचा अर्थ फक्त दोनच गोष्टी आहेत - सस्तन प्राण्याच्या शरीराचे तापमान आणि त्याच्या त्वचेतून येणारा (ब्युटीरिक ऍसिडचा) गंध. यापलीकडे जग आहे, हे त्याला माहीतच नाही.
तुम्ही एका झाडापाशी थांबलात. त्या झाडावर वटवाघूळ लटकलेलं आहे. ते डोळ्यांनी नव्हे, तर प्रतिध्वनीने (echolocation) जग 'पाहत' आहे. वस्तूवर आदळून परत येणाऱ्या ध्वनिलहरींमधून ते आपल्या मनात जगाचं चित्र उभं करतं. प्रकाशाचे रंग, झाडांची हिरवी पानं याला त्याच्या जगात काहीच अर्थ नाही.
हे आहे 'उमवेल्ट' !
१९०९ मध्ये, जेकब वॉन युक्सकुल (Jakob von Uexküll) नावाच्या एका जीवशास्त्रज्ञाने 'उमवेल्ट' ही संकल्पना मांडली. उमवेल्ट' म्हणजे एकाच परिसरात राहणारे वेगवेगळे प्राणी, जगाला वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवतात. थोडक्यात सांगायचं तर, जगाचा तो छोटासा, मर्यादित भाग जो एखादा प्राणी आपल्या ज्ञानेंद्रियांनी ओळखू शकतो, तो म्हणजे त्याची 'उमवेल्ट'.
जग अफाट आहे. पण आपण तेवढंच जग अनुभवू शकतो जेवढी आपली ज्ञानेंद्रिये पाहू शकतात. प्रत्येक जीव आपल्या 'उमवेल्ट'लाच संपूर्ण आणि अंतिम वास्तव समजतो.


'द ट्रुमन शो' हा एक प्रसिद्ध इंग्रजी चित्रपट आहे. ही ट्रुमन बरबँक नावाच्या एका माणसाची कथा आहे, जो एक सामान्य आणि आनंदी जीवन जगतो. तो सीहेवन नावाच्या एका सुंदर, शांत आणि परिपूर्ण शहरात राहतो. त्याचे मित्र आहेत, त्याची पत्नी आहे आणि एक चांगली नोकरी आहे. पण त्याला एक गोष्ट माहीत नसते - त्याचे संपूर्ण आयुष्य एक खोटं आहे. तो जन्मापासून एका विशाल स्टुडिओमध्ये (जो शहरासारखा दिसतो) राहत आहे आणि त्याचे आयुष्य हा २४ तास चालणारा, जगभरात प्रसारित होणारा एक प्रचंड लोकप्रिय रिॲलिटी टीव्ही शो आहे.

https://www.facebook.com/100044560684437/posts/pfbid02z41x4PK1durVCupW1Ghm7LWSGWPk31bdrUadFnCmUgoYKVZQpDx2EgJFkE29gz12l/

या चित्रपटातील नायकाप्रमाणेच, "आपल्यासमोर जे जग सादर केले जाते, तेच आपण वास्तव म्हणून स्वीकारतो." आपणही आपापल्या 'उमवेल्ट' स्वीकारतो आणि तिथेच थांबतो.
माणसाची 'उमवेल्ट' जास्त गुंतागुंतीची आहे, कारण ती फक्त ज्ञानेंद्रियांवर अवलंबून नाही. ती अनेक पातळ्यांवर तयार होते:
१. जैविक 'उमवेल्ट' (The Biological Umwelt): आपल्या प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. जो व्यक्ती रंगांधळा आहे, त्याचं आणि आपलं दृश्य जग वेगळं आहे. काही लोकांना इतरांपेक्षा जास्त तीव्र गंध येतो किंवा चव समजते. काहीजण अतिशय मंद आवाजही ऐकू शकतात. हा आपल्या 'उमवेल्ट'मधील नैसर्गिक फरक आहे.
२. अनुभवांची 'उमवेल्ट' (The Experiential Umwelt): हा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपले आयुष्यभरातील अनुभव आपल्या वास्तवाची आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची निर्मिती करतात.
उदाहरणार्थ, सुरक्षितता: ज्या व्यक्तीचं बालपण युद्धजन्य परिस्थितीत गेलं आहे, तिच्यासाठी फटाक्याचा मोठा आवाज म्हणजे 'धोक्याचा संकेत' असतो. याउलट, शांत वातावरणात वाढलेल्या व्यक्तीसाठी तोच आवाज फक्त 'एक गोंगाट' असतो. इथे आवाज (संकेत) एकच आहे, पण दोन्ही 'उमवेल्ट'मध्ये त्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे.
उदाहरणार्थ, आर्थिक स्थिती: गरिबीत वाढलेल्या व्यक्तीसाठी पैशाचं, बचतीचं आणि सुरक्षिततेचं महत्त्व वेगळं असतं. तिच्या जगात प्रत्येक निर्णय आर्थिक गणितावर अवलंबून असतो. दुसरीकडे, श्रीमंतीत वाढलेल्या व्यक्तीच्या 'उमवेल्ट'मध्ये हे संकेत तितकेसे तीव्र नसतात.


================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================

३. ज्ञान आणि संस्कृतीची 'उमवेल्ट' (The Knowledge and Cultural Umwelt): आपलं शिक्षण, आपली नोकरी आणि आपली संस्कृती आपली 'उमवेल्ट' घडवते.
एकाच पुलाकडे पाहताना, एका इंजिनिअरला त्यातील 'लोड-बेअरिंग स्ट्रेस' आणि 'टेन्साइल स्ट्रेंथ' दिसेल, तर एका इतिहासकाराला त्या पुलाने शहराच्या विकासात बजावलेली भूमिका दिसेल. एका कवीला त्यात विरह किंवा मिलनाचं प्रतीक दिसेल. पूल तोच आहे पण प्रत्येकाची 'उमवेल्ट' वेगळी आहे.
समस्या तेव्हा सुरू होते, जेव्हा आपण हे विसरतो की समोरच्या व्यक्तीची 'उमवेल्ट' आपल्यापेक्षा वेगळी असू शकते. आपण आपल्याच अनुभवांच्या आणि ज्ञानाच्या चष्म्यातून जगाला पाहतो आणि आग्रह धरतो की समोरच्यानेही ते तसंच पाहावं. इथूनच मतभेद आणि संघर्षाला सुरुवात होते. (सोशल मीडियावर तर हे २ ४ तास चालू असते !)
'उमवेल्ट' आपल्याला शिकवते की आपलं ज्ञान आणि अनुभव मर्यादित आहेत. आपण जगाचा एक छोटासा तुकडाच पाहू शकतो. ही जाणीव आपल्यातील अहंकार कमी करते. "मी सर्वकाही जाणू शकत नाही आणि माझं जग हे एकमेव सत्य नाही," ही भावना मनात रुजवणं, ही विकासाची पहिली पायरी आहे.
जेव्हा तुमचा कोणाशी वाद होईल, तेव्हा त्याला 'जिंकण्याची लढाई' म्हणून पाहू नका. त्याकडे 'समोरच्याची उमवेल्ट समजून घेण्याची संधी' म्हणून पाहा.
"तुझं चुकतंय!" असं म्हणण्याऐवजी, "तू या निष्कर्षापर्यंत कसा पोहोचलास, हे मला समजून घ्यायचं आहे," असं म्हणून पाहा.
"हे असं कसं असू शकतं?" याऐवजी, "तुला असं का वाटतं, हे सांगशील का?" असं विचारा. यामुळे संवाद तुटण्याऐवजी अधिक अर्थपूर्ण होतो.


सहानुभूती म्हणजे फक्त समोरच्यासाठी वाईट वाटणं नाही, तर त्याची 'उमवेल्ट' कशी असेल याची कल्पना करण्याचा प्रयत्न करणे (सह-अनुभूती). त्याचे अनुभव, त्याच्या भीती, त्याच्या आशा-आकांक्षा कोणत्या जगात घडल्या आहेत, हे समजून घेण्याचा प्रयत्न करणे. यामुळे आपण माणसांना त्यांच्या वागण्यावरून नाही, तर त्या वागण्यामागील कारणांवरून समजून घ्यायला लागतो.
एका टीममध्ये किंवा समाजात जितके जास्त प्रकारचे लोक असतील, तितक्या वेगवेगळ्या 'उमवेल्ट' एकत्र येतात. यामुळे होतं काय की, सगळ्यांच्या मर्यादित जगांना एकत्र करून, वास्तवाचं एक मोठं आणि अधिक स्पष्ट चित्र दिसू लागतं. जिथे एकाला धोका दिसतो, तिथे दुसऱ्याला संधी दिसू शकते. म्हणूनच, कामाच्या ठिकाणी किंवा समाजात विविधता असणं हे केवळ नैतिकदृष्ट्या चांगलं नाही, तर ते व्यावहारिकदृष्ट्याही अत्यंत फायदेशीर आहे.
आपल्या रोजच्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग येतात, जेव्हा आपल्याला खात्री असते की 'आपणच बरोबर आहोत' आणि समोरची व्यक्ती 'चुकत आहे'. मग ते कौटुंबिक वाद असोत, ऑफिसमधील मतभेद असोत किंवा मित्रांसोबतची चर्चा असो. आपण आपल्या मतांवर ठाम राहतो आणि समोरच्याला आपलं म्हणणं पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पण या सगळ्यात आपण एक मूलभूत गोष्ट विसरतो. कदाचित हा संघर्ष 'बरोबर' विरुद्ध 'चूक' असा नसून, 'एक जग' विरुद्ध 'दुसरं जग' असा असेल तर? आपण जेव्हा हे स्वीकारतो की आपलं जग मर्यादित आहे, तेव्हाच आपल्याला इतरांचं जग शोधण्याची प्रेरणा मिळते. आणि याच जाणिवेत अधिक समृद्ध मानवी संबंधांची शक्यता दडलेली आहे.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल की 'मीच बरोबर आहे', तेव्हा क्षणभर थांबा आणि स्वतःला विचारा: "मी माझ्या 'उमवेल्ट'मधून बोलतोय की समोरच्याची 'उमवेल्ट' समजून घेण्याचा प्रयत्न करतोय?"
या एका प्रश्नाने तुमच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात अफाट बदल घडू शकतो.


सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !