ही कहाणी आहे एका वेड्या स्वप्नाची...

ही कहाणी आहे एका वेड्या स्वप्नाची... एका अशा निर्धाराची, ज्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीलाही गुडघे टेकायला भाग पाडलं. ही कहाणी आहे रिचर्ड विल्यम्स नावाच्या एका पित्याची, ज्याने आपल्या मुलींच्या जन्माच्या आधीच त्यांच्या यशाची गाथा लिहिली होती !
वर्ष होतं १९८०. कॅलिफोर्नियाच्या गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या कॉम्प्टन शहरात, रिचर्ड नावाचा एक सामान्य माणूस टीव्ही पाहत होता. स्क्रीनवर एक दृश्य दिसलं आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला ! रोमानियाची एक टेनिसपटू, स्पर्धा जिंकल्यानंतर $४०,००० चा चेक स्वीकारत होती. ती रक्कम रिचर्डच्या वर्षभराच्या पगारापेक्षाही जास्त होती.
https://www.facebook.com/100044560684437/posts/pfbid02kiVA1EvLPi9SEiDyRut1p68dHPxfLHsCtf3S9LJNJfpheJ13H3H5RHQMTnT9UjNgl/
त्याच्यासाठी तो फक्त एक चेक नव्हता, तर गरिबी आणि निराशेच्या अंधारातून बाहेर पडण्याचा एक तेजस्वी मार्ग होता. त्याच क्षणी, रिचर्डने निर्णय घेतला - माझ्या मुली टेनिसपटू बनतील!

रिचर्डने केवळ स्वप्न पाहिलं नाही, तर ते सत्यात उतरवण्यासाठी तब्बल ७८ पानांची एक तपशीलवार योजना लिहिली. कॉम्प्टनच्या अंधाऱ्या गल्ल्यांमधून आपल्या दोन मुलींना बाहेर काढून टेनिसच्या झगमगत्या दुनियेचं शिखर कसं गाठायचं, याचा तो आराखडा होता. पण या योजनेसमोर आव्हानांचे हिमालय उभे होते:
पहिली अडचण: रिचर्डला टेनिसचा 'ट' सुद्धा माहीत नव्हता.
दुसरी अडचण: हा महागडा खेळ शिकवण्यासाठी त्याच्या खिशात दमडीही नव्हती.
तिसरी आणि सर्वात मोठी अडचण: ज्या मुलींना चॅम्पियन बनवायचं होतं, त्यांचा अजून जन्मही व्हायचा होता!
पुढची पाच वर्षे रिचर्ड टेनिसची मासिकं, व्हिडिओ कॅसेट गोळा करून स्वतः टेनिस शिकला. आणि मग, त्याच्या योजनेनुसार, व्हीनस आणि सेरेना या दोन लहान मुलींच्या हातात टेनिसची रॅकेट आली. तो आता फक्त पिता नव्हता, तर त्यांचा प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि संरक्षकही होता.
परिस्थिती इतकी बिकट होती की, खेळाची साधी साधनं घेणंही परवडत नव्हतं. रिचर्ड श्रीमंतांच्या टेनिस क्लबबाहेरच्या कचरापेटीत फेकून दिलेले जुने, वापरलेले टेनिस बॉल गोळा करायचा आणि ते एका शॉपिंग कार्टमध्ये भरून सरावासाठी आणायचा. याच जुन्या चेंडूंवर त्या मुलींनी सार्वजनिक कोर्टवर स्वप्नांचा सराव सुरू केला.
तो बाप आपल्या मुलींसाठी एखाद्या पोलादी ढालीसारखा उभा राहिला. सरावादरम्यान स्थानिक गुंडांपासून मुलींना वाचवताना त्याला अनेकदा मारहाण झाली. एकदा कोर्ट सोडण्यास नकार दिल्यामुळे, गुंडांनी त्याचे नाक, जबडा आणि बोटं मोडली, अनेक दात पाडले. त्या रक्ताच्या थारोळ्यातही त्याचा निश्चय अटळ होता. त्या रात्री त्याने आपल्या डायरीत लिहिलं, "आजच्या दिवसानंतर, इतिहास या 'दात नसलेल्या' माणसाला धैर्याचा एक स्तंभ म्हणून ओळखेल."
टेनिस हा तेव्हा प्रामुख्याने गोऱ्या लोकांचा खेळ मानला जायचा. रिचर्ड जेव्हा आपल्या कृष्णवर्णीय मुलींना घेऊन स्पर्धांसाठी जायचा, तेव्हा लोकांच्या विचित्र नजरा, टोमणे आणि अपमान सहन करावा लागायचा. एकदा मुलींनी निरागसपणे विचारलं, "बाबा, हे लोक आमच्याकडे असे का बघतात?"
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================

त्यावर त्या पित्याने दिलेलं उत्तर होतं : "कारण त्यांनी तुमच्यासारखी सुंदर माणसं याआधी कधी पाहिलीच नाहीत."
काळ पुढे सरकला... आणि वर्ष आलं २०००. विम्बल्डनच्या मैदानावर, लंडनच्या राजघराण्यासमोर आणि जगभरातील प्रतिष्ठित लोकांसमोर एक उंच, कृष्णवर्णीय मुलगी फायनल खेळण्यासाठी उतरली. ती होती रिचर्डची मोठी मुलगी - व्हीनस विल्यम्स.
तिची ताकदवान सर्व्हिस आणि विजेच्या वेगासारखं फूटवर्क पाहून जग अचंबित झालं. तिचा प्रत्येक शॉट इतका ताकदवान होता, जणू प्रत्येक चेंडू वेदनेने किंचाळत होता. ती फक्त चेंडू मारत नव्हती, तर गरिबी, अपमान आणि वर्णद्वेषाला कोर्टबाहेर फेकून देत होती.
जेव्हा व्हीनस विजयाच्या जवळ पोहोचली, तेव्हा तिने स्टँड्समध्ये उभ्या असलेल्या आपल्या वडिलांकडे पाहिलं. तो बाप हातवारे करून, ओरडून तिला प्रोत्साहित करत होता. तोच आवाज, जो तिला नेहमी सांगायचा, "एक दिवस आपण विम्बल्डन जिंकू... आणि ते फक्त आपल्यासाठी नाही, तर अमेरिकेतील प्रत्येक असहाय आणि गरीब माणसासाठी जिंकायचं आहे."
प्रतिस्पर्ध्याचा चेंडू नेटला लागला आणि इतिहास घडला. कॅमेऱ्यांनी रिचर्डला टिपलं - त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि चेहऱ्यावर २० वर्षांच्या संघर्षाचा विजय दिसत होता. व्हीनस विल्यम्सने तिचं पहिलं ग्रँड स्लॅम जिंकलं होतं.
पुढे जाऊन, त्याची धाकटी मुलगी, सेरेना, २३ ग्रँड स्लॅम जिंकून इतिहासातील महान टेनिसपटू बनली.
त्यांच्या टेनिस कोर्टवरील यशापेक्षाही, कोर्टाबाहेर त्यांनी जे सहन केलं, ते त्यांच्या प्रवासाचा सर्वात प्रभावी भाग आहे. त्यांच्या शरीरयष्टीमुळे त्यांना "विल्यम्स ब्रदर्स" असं हिणवण्यापासून ते वर्णद्वेषी टिप्पणी करण्यापर्यंत, या दोन्ही बहिणींनी प्रचंड धैर्याने आणि संयमाने वंशवादाचा सामना केला. त्यांच्या वडिलांनी दिलेली शिकवण त्यांच्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरली: "तुमच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर फक्त टेनिस कोर्टवर तुमच्या रॅकेटने द्या." या दोन बहिणींच्या प्रेरणादायी संघर्षाने जगभरातील कृष्णवर्णीय लोकांना आणि खेळाडूंना प्रेरणा दिली.

जेव्हा एखादी व्यक्ती एकटीच, कोणतीही साथ नसताना, एखादं ध्येय गाठण्याचा दृढनिश्चय करते, तेव्हा नियतीलाही त्या एका व्यक्तीच्या निश्चयापुढे झुकावं लागतं. तुम्हाला फक्त तुमचं ध्येय निवडायचं आहे, तुमचा संकल्प दृढ करायचा आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःला झोकून द्यायचं आहे.
लक्षात ठेवा, वेडी स्वप्नं पाहणाऱ्यांना ती पूर्ण करण्याचा मार्ग दिसत नसतो, ते स्वतःच पायवाटा तयार करत जातात... आणि त्याच पायवाटा पुढे जाऊन इतिहासाचे महामार्ग बनतात!
"मंज़िल उन्हीं को मिलती है,
जिनके सपनों में जान होती है,
पंखों से कुछ नहीं होता,
हौसलों से उड़ान होती है।"

( रिचर्डच्या या कथेवर आधारित "King Richards" नावाचा एक सिनेमाही नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे. तो नक्की पहा !)


सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !