There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
लग्नघरातील आत्या (बुवा) साडी खरेदी करत असते. तिला जी साडी घ्यावीशी वाटते ती घेत असताना शाहरुख दाराआडूनच आपली पसंती-नापसंती दाखवत असतो. त्यामुळे तिला निर्णय घेणं सोपं जातं खरं ...पण प्रत्यक्षात ती शाहरुखच्या आवडीची साडी खरेदी करते..स्वतःच्या नाही. (तरी बरं तिथे एकच शाहरुख होता. तिथे दहा वेगवेगळे शाहरुख असते आणि प्रत्येकाने वेगवगेळ्या साडीलाच पसंती दिली असती तर आत्याबाईंची खरेदी झालीच नसती !). सध्या आपण सगळेच त्या चित्रपटातील आत्यासारखे झाले आहोत.
हा किस्सा आठवण्याचं कारण म्हणजे आमच्या मित्रांच्या व्हाट्सअँप ग्रुपमध्ये नुकताच घडलेला आणखी एक किस्सा.
सुदामेने एक रील बनविली ती माझ्या एका मित्राने मला व्हाट्सअँप ग्रुपवर पाठविली. त्या रीलवरून प्रचंड वाद झाल्यानंतर सुदामेने ती रील डिलीट केली. पण त्याचबरोबर ती रील माझ्या मित्रानेही ग्रुपवरून डिलीट केली. सुदामे ट्रोल झाला होता पण माझ्या मित्राला कोणी काही बोललेही नव्हते (निदान आमच्या ग्रुपमध्ये तरी !) तरीसुद्धा त्याला तो व्हाट्सअँप फॉरवर्ड डिलीट करावासा का वाटला असेल ?
त्याला आवडला म्हणून त्याने तो पुढे पाठवला होता ना ? मग त्याची आवड तो मनासारखी का नाही अनुभवू शकला ?
काही वर्षांपूर्वी एखादी गोष्ट आवडली की आपण ती आपल्या मनाप्रमाणे अनुभवत होतो.
पायात चपला न घालता गवतावर चालायचं आहे?
कोणतं पुस्तक वाचायचं आहे किंवा चित्रपट पाहायचा आहे?
एखादा गोड पदार्थ खायचा मोह झाला?
एखाद्या जुन्या मित्राचं आमंत्रण स्वीकारायचं आहे?
आपण ते सहजच करू शकायचो.
कुणालाच काही फरक पडत नव्हता.
पण आज परिस्थिती बदलली आहे.
आज जर तुम्ही पायात चपला न घालता फिरलात, तर लगेच कुणीतरी म्हणेल, “असं चालणं आरोग्यासाठी वाईट आहे. इंस्टाग्रामवर कित्येक फिटनेस इन्फ्लुएन्सर्सनी सांगितलंय.”
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
तुम्ही एखादं पुस्तक वाचताय हे सांगितलं तर त्याचा लेखक "कोणत्या" विचारांचा आहे यावरून तुमच्या विचारसरणीचा अर्थ लावला जातो.
एखादा चित्रपट पाहिलात तर त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने गेल्या वर्षी जे विवादास्पद ट्विट केले होते त्याला तुमची अनुमती आहे असा समज आपोआप केला जातो.
तुम्ही गोड पदार्थ खाल्ला असाल तर, “अरे, तुला माहिती नाही का? जास्त गोड शरीराला घातक असतं!” असं कुणीतरी सांगतोच.
तुम्ही रोज वापरत असलेली फेस क्रीम? कुणीतरी सांगेल की त्यात कॅन्सरकारक रसायनं आहेत.
आणि जरी कुणी काही सांगितलं नाही, तरी “इंटरनेटवरील लोक काय म्हणतील?” या भीतीमुळे आपणच आपला आनंद मारून टाकतो.
आपण आता शुद्ध, निखळ अनुभव जगूच शकत नाही.
कारण प्रत्येक गोष्टीभोवती “जास्त माहिती, जास्त संदर्भ, जास्त मतं” जमा झाली आहेत. तुम्ही काहीही करा, प्रत्येकाला त्याविषयी एक मत आहे आणि ते मत तुम्हाला ठणकावून सांगणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकारच झाला आहे.
स्त्रियांच्या कपड्यांबाबत पण लोक समाजमाध्यमात सल्ले देत असतात. कुणाला छोटे कपडे खटकतात , कोणाला टाईट कपडे खटकतात, कोणाला एखाद्या विशिष्ट रंगाचे कपडे खटकतात, कोणाला कपड्यांमधून स्त्रीचा चेहरा दिसला तरी ते खटकते, आणि कोणाला स्त्रिया बाहेर पडल्या तर ते ही खटकते. या एवढ्या वेगवेगळ्या मतांच्या ओझ्याखाली एखाद्याची आवड दबणार नाही तर काय होणार ?
खरा प्रश्न आहे—
आपण खरंच आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी कशा ओळखणार? की आपल्या आवडीनिवडी समाजमाध्यमेच ठरवणार ?
आज सोशल मीडियाच्या आणि इतरांच्या मतांच्या इतक्या प्रभावाखाली आपण इतके जगतोय की, आपली आवड आपली राहिलेलीच नाही. तेच ठरवतात आपण कोणता सिनेमा पाहायचा, कोणते गाणे ऐकायचे, कुठून खायचं, काय विकत घ्यायचं, कोणत्या अकाउंट्सना फॉलो करायचं.
जर आपण त्यांच्या नियमांप्रमाणे वागलो, तर गोंधळच होणार. कारण “आज चांगलं” असलेली गोष्ट उद्या “वाईट” ठरते.
म्हणून एक सोपा नियम—
अनुभव घ्या. त्याचा आनंद घ्या.
काही चुकीचं वाटलं, तर स्वतः ठरवा.
इतरांचं मत नंतर बघा. किंवा बघूच नका.
काही लोकांचं बरोबर असेल, काही चुकीचेही असतील.
पण अंतिम निर्णय तुमचा हवा.
"स्वत:चा आवाज ऐकता येणे" ही आपल्याकडे असलेली एक सुप्त शक्ती आहे. तिला जागरूक केल्याशिवाय ही शक्ती वापरता येत नाही. कितीतरी लोकांचं आयुष्य निघून जातं पण त्यांना "स्वतःचाच आवाज" शेवटपर्यंत ऐकूच येत नाही.
आवडलेला गोड पदार्थ खा. आवडलेला चित्रपट बघा. आवडणाऱ्या ब्रँडचे आवडणारे कपडे घाला. तुम्हाला पाहिजे त्या समारंभाला जा.
जग काही बोलेल, टीका करेल, लेबल लावेल. पण त्या आवाजाच्या गोंगाटातही जर आपण स्वतःचा आवाज ऐकायला शिकलो, तर आपण परत एकदा पूर्वीसारखं गोष्टी एन्जॉय करू शकतो.
“कदाचित सगळं परफेक्ट नसेल. पण हा अनुभव माझा आहे हे जास्त महत्वाचं, नाही का ?”
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !