"खरा विद्यार्थी तोच, जो अखेरपर्यंत शिकत राहतो"

चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यूला कौरवांनी कपटाने मारले. यात पुढे असलेल्या जयद्रथाचा दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी वध करण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने केली. तेव्हापासून जयद्रथ घाबरला. कौरव गटात जयद्रथाला संध्याकाळ पर्यंत वाचवायचे कसे यावर चर्चा सुरू झाली.

द्रोणाचार्य सेनापती होते. तेच अर्जुन आणि जयद्रथाचे गुरु देखील होते.

घाबरलेला जयद्रथ रात्री द्रोणाचार्यांच्या तंबूत गेला आणि त्याने द्रोणाचार्यांना विचारले की मी अर्जुनाला कसा हरवू शकतो?

द्रोणाचार्यांनी सांगितले की तुला जिवंत रहायचे असेल तर उद्या अर्जुनासमोर जाऊ नकोस. उद्या त्याला थोपवायचं कसं ते आम्ही पाहू. द्रोणाचार्यांच्या उत्तराने व्यथित झालेला जयद्रथ म्हणाला "गुरुजी मी आणि अर्जुन आम्ही दोघेही तुमचे शिष्य. जशी त्याने धनुर्विद्या तुमच्याकडून शिकली तशीच मीही तुमच्याकडूनच धनुर्विद्या शिकलो. मग असं काय झालं की आज तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे आणि मला त्याच्यापासून लपावं लागत आहे?

द्रोणाचार्यांनी सांगितलं जयद्रथा, तुम्ही दोघेही माझे शिष्य. मी दोघांनाही समभावानेच शिकवलं. पण तू मी शिकवले ते अंतिम मानून सराव करायचास आणि अर्जुन मी शिकविले ती सुरुवात मानून सराव करायचा. तो त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचा, खोलात जायचा, प्रयोग करायचा, त्याचं कधी समाधान व्हायचंच नाही.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2

येथे क्लिक करा.

================

माझ्याकडील शिक्षण झाल्यावर तू पूर्णपणे राज्यकारभारात गुंतलास. पण अर्जुन इतर अनेक गुरूंकडून शिकतच गेला. नवनवीन अस्त्रे आपल्या भात्यात समाविष्ट करत गेला.

थोडक्यात अर्जुन श्रेष्ठ आहे कारण त्याची शिकण्याची आणि सरावाची जिज्ञासा वाढत गेली आणि तुझी शिकण्याची इच्छा कमी कमी होत गेली.

आता आपण ज्याच्यासोबत लढत आहोत तो अर्जुन माझा विद्यार्थी काही काळासाठी होता...पण तो धनुर्विद्येचा विद्यार्थी कायमचा आहे.

ज्याने शिकणं संपवलं तो संपलाच म्हणून समज !

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!