There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
सत्तरच्या दशकात अमेरिका रशिया यांच्यातील शितयुद्धाचा काळ
अमेरिकेत व्हल्कन नावाचे एक छोटेशे गाव होते. खूपच लहान गाव होते ते. १९५० च्या दशकात कोळसा खाणीच्या तेजीत हे गाव वसले, पण खाणी बंद झाल्यानंतर १९७० पर्यंत ते ओस पडले. तिथे फक्त २० कुटुंबे राहत होती.
हे गाव टग नदीच्या काठी होते. नदीच्या एका बाजूला वेस्ट व्हर्जिनिया आणि दुसऱ्या बाजूला केंटकी राज्य होते.
गावातील मुलांना शाळेत जाण्यासाठी नदी ओलांडावी लागत असे. पण, जुना पूल पूर्णपणे तुटून पडला होता. त्यामुळे मुलांना शाळेत जाण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागत— त्यांना एका कुलूपबंद रेल्वेच्या कुंपणावरून चढून जावे लागे आणि त्यानंतर मालगाड्यांच्या रेल्वेचा पूल ओलांडून जावे लागे. हे खूप धोकादायक होते, आणि एकदा तर एका मुलाला रेल्वे पूल ओलांडताना झालेल्या अपघातात पाय गमवावा लागला.
व्हल्कन मधील रहिवाशांच्या वतीने बोलण्यासाठी जॉन रॉबिनेट्ट यांची गावकऱ्यांनी निवड केली.
रॉबिनेट्ट यांनी काउंटीच्या अधिकाऱ्यांकडे नवा पूल बांधण्याची विनंती केली. त्यांनी नकार दिला. कारण एवढ्या कमी लोकसंख्येसाठी पूल उभारण्याचे बजेट नाही...आणि इतर महत्वाच्या प्रश्नांपुढे हा गौण प्रश्न आहे.
त्यांनी केंटकी राज्याच्या अधिकाऱ्यांना विचारले. त्यांनीही नकार दिला, "आमच्याकडे त्याहून मोठ्या समस्या आहेत."
त्यांनी वेस्ट व्हर्जिनिया राज्याच्या अधिकाऱ्यांना विचारले. त्यांनीही नकार दिला.
शेवटी, त्यांनी वॉशिंग्टन डीसी येथील केंद्र सरकारला विचारले. त्यांनीही नकार दिला, कारण तेच की एवढ्या छोट्या लोकसंख्येच्या गावासाठी बजेट नाही.
यावरून रॉबिनेट्ट यांना हे स्पष्ट झाले की कुणीही दखल घेत नाही. कारण त्यांचे गाव आणि त्यांचा प्रश्नच इतका लहान आहे की कोणाला दखल घ्याविशीच वाटत नाही. त्यांना कळलं की आपली खरी स्पर्धा इतर मोठ्या प्रश्नांशी आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या पुलाच्या समस्येला इतर समस्यांपेक्षा मोठे करावे लागणार आहे.
१९७७ मध्ये रशिया-अमेरिका शीतयुद्ध शिगेला पोहोचले होते आणि त्यावेळी रशिया हीच एकमेव समस्या होती ज्याची अमेरिकेला काळजी होती. दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सतत संधीच्या शोधात होते.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://chat.whatsapp.com/Ip4ab5E7gGU52GQS3uC7pq
येथे क्लिक करा.
================
रॉबिनेट्ट यांना समजले की खालील स्तरावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात काही अर्थ नाही. त्यांना थेट वरच्या स्तरावरील लोकांना धक्का द्यावा लागणार होता.
त्यांनी चक्क वॉशिंग्टन डीसी येथील रशियन दूतावासाला पत्र लिहिले.
त्यांनी पत्रात व्हल्कन गावातील वाईट परिस्थितीबद्दल सांगितले आणि अमेरिकेला साधा एक पूलही बांधणे परवडत नाही, असे नमूद केले. त्यांनी रशियाकडे गरीब देशांसाठी परदेशी मदत (Foreign Aid) देण्याचा अर्थसंकल्प आहे, याची आठवण करून दिली आणि विचारले, "जे अमेरिका करू शकत नाही, ते रशियन मदतीने पूर्ण होऊ शकते का?"
रशियन हुशार होते. त्यांना ही गोष्ट मोठी प्रचाराची संधी (Propaganda Campaign) आहे हे कळले. अमेरिकेला स्वतःच्याच नागरिकांना मदत करता येत नाही, हे जगभर पसरवण्याची ती संधी होती. त्यांनी तात्काळ इओना अँड्रोव्ह नावाच्या पत्रकाराला व्हल्कनला भेट देण्यासाठी पाठविले.
पण, रशियन दूतावासाला अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याची परवानगी घेणे आवश्यक होते.
जेव्हा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना एका रशियन पत्रकाराला "अमेरिकेतील छोट्याश्या गावात" जाण्याचे कारण कळले आणि त्यांनी व्हल्कनच्या पुलाची कहाणी ऐकली, तेव्हा गोष्टी वेगाने बदलू लागल्या.
या घटनेमुळे संपूर्ण जगात अमेरिकेची खिल्ली उडू शकली असती.
केंद्र सरकारने राज्याला सांगितले: "आत्ताच्या आत्ता ही समस्या सोडवा!"
राज्याने काउंटीला सांगितले: "आत्ताच्या आत्ता ही समस्या सोडवा!"
आणि काही तासांतच रॉबिनेट्ट यांना कळविण्यात आले की, व्हल्कनसाठी नवीन पूल बांधण्यासाठी $१.३ दशलक्ष (आजचे $५.२ दशलक्ष) मंजूर झाले आहेत.
अचानक, त्यांची समस्या मोठी झाली होती !
रॉबिनेट्ट यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या समस्येकडे पहिले आणि छोट्या समस्येला इतरांच्या समस्यांपेक्षा मोठे (प्राधान्यक्रमात वर) करण्याचा मार्ग शोधला.
मित्रांनो ही आहे Power of Reframing. आपल्या प्रश्नांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची किमया !
थोडासा दृष्टिकोनातील बदल अनेक गहन प्रश्नांवर उत्तरे शोधून देऊ शकतो.
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !