स्वतःहून मोठ्या क्षणासाठी मागे हटण्याची कला

बहुतेक आई-वडिलांचं एक स्वप्न असतं - आपल्या मुलाने देशासाठी खेळावं. हे स्वप्न सत्यात उतरणं म्हणजे त्यांच्यासाठी आयुष्यातला सर्वात मोठा क्षण असतो. आणि विचार करा, जर तुमची दोन्ही मुलं, तीही जुळी, देशासाठी खेळू लागली तर? हा तर दुग्धशर्करा योगच!
ऑस्ट्रेलियातील वॉ कुटुंब याच स्वप्नात जगत होतं. त्यांची जुळी मुलं - स्टीव्ह आणि मार्क - ऑस्ट्रेलियन प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत होती आणि त्यांची कीर्ती सर्वदूर पसरत होती. लवकरच दोघेही ऑस्ट्रेलियासाठी खेळतील, या आशेने त्यांचे आई-वडील प्रत्येक दिवस जगत होते.
अखेरीस, स्टीव्हने संघात पदार्पण केले. वॉ कुटुंबात आनंदाला उधाण आले, पण मार्कची निवड कधी होणार याची उत्सुकताही तितकीच वाढली. आई-वडिलांचे डोळे निवड समितीच्या निर्णयाकडे लागले होते. आणि मग तो दिवस आला. एक दिवस सराव करून घरी आल्यावर स्टीव्हने जाहीर केले की आगामी ॲशेस कसोटी सामन्यासाठी मार्कची निवड झाली आहे.
वॉ कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. "चला, आज रात्री पार्टी करूया," आई उत्साहाने म्हणाली. अखेर, हा क्षण साजरा करण्यासारखाच होता! किती भाग्यवान आयांना आपली दोन्ही मुलं राष्ट्रीय संघात एकत्र खेळताना पाहता येतात? घराच्या मागच्या अंगणात बार्बेक्यू पार्टीची तयारी झाली. अभिमान, आनंद, स्वादिष्ट जेवण आणि वाईन यांनी संध्याकाळ अगदी परिपूर्ण झाली होती.
गप्पांच्या ओघात, अभिमानाने फुललेल्या आईने सहजच स्टीव्हला विचारले, "बरं, मार्कसाठी संघातून कोणाला वगळण्यात आलं?"
त्यावर, अविचल शांततेने स्टीव्ह उत्तरला, "मला!" (भविष्यात तो या शांत संयमी स्वभावासाठीच ओळखला जाणार होता !)
आयुष्य असंच असतं. चांगली बातमी अनेकदा वाईट बातमीसोबत येते. कधी तुम्ही जिंकता, तर कधी हरता. स्टीव्ह वॉच्या आयुष्यातील हा प्रसंग फक्त क्रिकेटच्या मैदानापुरता मर्यादित नाही. आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात असे क्षण येतात, जिथे आनंद आणि दुःख एकाच पॅकेजमध्ये मिळतात.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs येथे क्लिक करा.
================

कल्पना करा, तुमच्या ऑफिसमध्ये एका मोठ्या पदासाठी बढती (promotion) होणार आहे. तुम्ही आणि तुमचा एक जवळचा मित्र, दोघेही प्रमुख दावेदार आहात. तुम्ही दोघांनीही खूप मेहनत घेतली आहे. अचानक एक दिवस घोषित होतं की तुमच्या मित्राला बढती मिळाली आहे. एका बाजूला मित्राच्या यशाचा तुम्हाला मनापासून आनंद होतो, पण त्याच वेळी स्वतःची संधी हुकल्याचं दुःखही सलत राहतं. संपूर्ण टीम त्याच्या अभिनंदनासाठी पार्टी करत असते आणि तुम्हाला हसऱ्या चेहऱ्याने त्यात सामील व्हावं लागतं. तुमच्या मित्राची प्रगती म्हणजे तुमच्या टीमची प्रगती आहे, पण तुमची वैयक्तिक निराशा लपवणं ही सोपी गोष्ट नाही. एकाच वेळी आनंद आणि विषाद, दोन्ही भावनांचा कल्लोळ मनात सुरू असतो.
किंवा असंही होऊ शकतं की तुम्हाला तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळाली आहे, पण त्यासाठी तुम्हाला तुमचं घर, शहर आणि प्रियजनांना सोडून दुसऱ्या शहरात स्थायिक व्हावं लागणार आहे. नोकरी मिळाल्याचा आनंद मोठा असतो, पण घर सोडण्याचं दुःखही तितकंच खरं असतं.


निराश होणं, वाईट वाटणं किंवा थोडीफार असूया वाटणं हे मानवी स्वभावाला धरून आहे. या भावनांना दाबून टाकण्याऐवजी त्यांचा स्वीकार करा. 'मला वाईट वाटत आहे' हे मान्य केल्याने मनावरचा भार हलका होतो. त्यामुळे या भावनांना तुमच्या वर्तनावर ताबा मिळवणे कठीण होते. वाईट वाटणे स्वाभाविक आहे , वाईट वागणे ऐच्छिक आहे !
स्टीव्हने दाखवलेली शांतता ही त्याच्या व्यावसायिकतेची (Professionalism) ओळख होती. ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आपली प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. आपल्या सहकाऱ्याचं मनापासून अभिनंदन करा. नाराजी किंवा कटुता दाखवण्याऐवजी खिलाडूवृत्ती दाखवा. हीच परिपक्वता तुम्हाला भविष्यात पुढे घेऊन जाईल.
निवड समितीचा निर्णय स्टीव्हच्या हातात नव्हता, पण त्याची प्रतिक्रिया, त्याचा सराव आणि त्याचं भविष्यकालीन प्रदर्शन त्याच्या हातात होतं. त्याने तेच केलं आणि तो पुन्हा संघात परतला, इतकंच नाही तर इतिहासातील महान कर्णधारांपैकी एक बनला. आपल्या बाबतीतही तेच लागू होतं. कोणती व्यक्ती निवडली जाईल हे आपल्या नियंत्रणात नसतं, पण आपली मेहनत, कौशल्य-सुधारणा आणि कामातील योगदान हे सर्वस्वी आपल्याच हातात असतं.
'Win some, lose some' हा खेळाचाच नाही, तर आयुष्याचाही नियम आहे. प्रत्येक लढाई तुम्ही जिंकालच असे नाही. स्टीव्ह वॉने निवड समितीच्या निर्णयावर वाद घातला नाही किंवा तक्रार केली नाही. त्याने तो स्वीकारला. पराभव पचवून, त्यातून शिकून पुढच्या संधीसाठी स्वतःला तयार करणे, हीच खऱ्या विजेत्याची ओळख आहे. (सांघिक मैदानी खेळ यासाठीच महत्वाचे कारण ते "पराभव" पचवायला शिकवतात !)
आयुष्य हे सुख आणि दुःख, यश आणि अपयश, संधी आणि त्याग यांचं एक सुंदर पण गुंतागुंतीचं मिश्रण आहे. तुमचं खरं सामर्थ्य आणि व्यक्तिमत्त्व तुम्ही केवळ यशाचा आनंद कसा साजरा करता यात नाही, तर अशा संमिश्र क्षणांना कसं सामोरं जाता यात दडलेलं आहे. स्टीव्ह वॉ प्रमाणे शांत आणि स्थिर राहून परिस्थिती स्वीकारल्यास, प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवून जातो.
'आनंद' चित्रपटातील माझं आवडतं गाणं या परिस्थितीचं अचूक वर्णन करतं:
ज़िन्दगी, कैसी है पहेली हाए,
कभी तो हँसाए, कभी ये रुलाए।
कभी देखो मन नहीं जागे,
पीछे-पीछे सपनों के भागे,
एक दिन सपनों का राही,
चला जाए सपनों के आगे कहाँ...

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !