असा रंगला नेटभेटचा स्वर-सृजन महोत्सव 2022 सोहळा

रांगोळ्यांनी सजलेले प्रवेशद्वार, अत्तरांच्या सुगंधाचा मंद दरवळ आणि सभागृहात अतिशय प्रसन्न वातावरणात संपन्न होत असलेला सोहळा... असे सुरस आणि सुरेल वातावरण होते यंदाच्या आमच्या स्वर-सृजन महोत्सवाचे!
नेटभेट ईलर्निंग सोल्यूशन्स आणि अनाहत म्यूझिक थेरपीतर्फे पुण्यातील एमईएस स्कूलच्या ऑडीटोरियममध्ये दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी झालेल्या या संगीत महोत्सवाचे प्रमुख अतिथी म्हणून पुण्यातील सुप्रसिद्ध पॅथेलॉजिस्ट डॉ.मंदार परांजपे, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका सावनी शेंडे, पोलिस प्रशिक्षक महेंद्र शिंदे आणि सध्या गाजत असलेल्या 'पावनखिंड' आणि आगामी 'शेर शिवराज' या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक देवदत्त मनीषा बाजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे खास आकर्षण होते ते म्हणजे 'नेटभेटच्या ट्रेनर्सची थेटभेट'. यावेळी नेटभेटवर विविध विषय घेऊन आपल्या समोर इंटरनेटच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटण्याची संधीही नेटभेटच्या पुण्यातील फॉलोअर्सना मिळाली.
नेटभेटवरून श्री.संतोष घाटपांडे व सावनी घाटपांडे वेळोवेळी घेत असलेल्या स्वानंदासाठी संगीतच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात विविध हिंदी मराठी एकल व समूहगीते गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली.
या सर्व विद्यार्थ्यांची आणि प्रशिक्षकांची मनोगतं ऐकणं हे खरोखरीच फार आनंदाचं होतं, कारण, 'स्वानंदासाठी संगीत' या कार्यशाळांमधून आणि त्याचबरोबर 'नेटभेट'मुळे त्यांच्या जीवनात कसा आणि किती मोठा सकारात्मक बदल घडला हे प्रत्येकजण व्यक्त करत होता, तर दुसरीकडे नेटभेटच्या प्रशिक्षकांनाही या प्लॅटफॉर्ममुळे जगभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे किती सुलभ झाले आहे हे व्यक्त करत असतानाचा त्यांचा आनंद बघणेही खरोखरीच समाधानकारक होते.
कार्यक्रमाप्रसंगी नेटभेटचे संस्थापक सलिल सुधाकर चौधरी यांनी आपल्या या स्टार्टअपच्या अभिनव कल्पनेविषयी आणि या माध्यमातून आपण करत असलेल्या कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली, तसेच आपले उद्दीष्टही सांगितले.
कार्यक्रमादरम्यान एकीकडे जेव्हा गाणी सादर होत होती तेव्हाच रंगमंचावर रामनवमीनिमित्त प्रभू श्रीरामचंद्रांचे लाईव्ह पेंटींग नेटभेटचे ट्रेनर श्री भरत पार्टे सर साकारत होते.
तब्बल चार तास रंगलेल्या या सोहळ्याने खरोखरीच नवे मैत्र फुलवले आणि नेटभेटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनाहत म्यूझिक थेरपीचे संतोष घाटपांडे व सावनी घाटपांडे आणि नेटभेट ईलर्निंग सोल्यूशन्सच्या टीमने परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची काही क्षणचित्रे खास आपल्यासाठी -

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy