नशिबाचं क्षेत्रफळ

2005 मध्ये, Andy Weir नावाच्या एका व्यक्तीने स्वतः लिहिलेल्या कादंबरीतील एक-एक भाग दर आठवड्याला आपल्या ब्लॉगवर टाकायला सुरुवात केली. तो काही व्यवसायिक लेखक नव्हता. तो स्वतःची स्पेसवर आधारित कादंबरी दर आठवड्याला ऑनलाईन प्रकाशित करत होता — केवळ आनंदासाठी.

ऑनलाईन वाचक हळूहळू वाढू लागले. विज्ञान क्षेत्रातील काही लोकांना ती कादंबरी आवडली. ते त्याला अधून मधून स्पेस ट्रॅव्हल बद्दल तांत्रिक गोष्टींचे मार्गदर्शन करू लागले. त्यानुसार तो पुढील भागांत सुधारणा करू लागला. काही वर्षांनी, एका वाचकाने विचारलं, "हे Amazon वर eBook स्वरूपात टाकू का?" Andy म्हणाला, "हो." त्यांनी पुस्तकाची किंमत ठेवली — फक्त 99 सेंट.

त्या कादंबरीचं नाव होतं — The Martian. ते पुस्तक बेस्टसेलर झालं. पुढे त्यावर एक चित्रपटही बनला. Andy Weir एकदम प्रसिद्ध झाला… लोक म्हणाले, “वा! किती भाग्यवान आहे!” पण खरं कारण वेगळंच होतं....त्यापूर्वी तो एक दशक सतत लिहित होता.

2011 मध्ये, Brian Chesky नावाच्या एका डिझायनरने उत्पन्न वाढवण्यासाठी एक भन्नाट कल्पना वापरली. घरातील एक अतिरिक्त गादीची जागा त्याने भाडेतत्वावर देण्याचे ठरवले. आपल्या प्रमाणेच इतर लोकही त्यांच्या घरातील अतिरिक्त जागा हॉटेलप्रमाणे भाड्याने देऊ शकतील असे त्याला वाटले आणि हीच त्याची बिझनेस आयडीया होती. सुरुवातील कोणी विश्वास ठेवला नाही. गुंतवणूकदारांनी पण थट्टा केली. “अरे, कोण परक्याच्या घरी झोपायला जाईल?”

पण Brian थांबला नाही. त्याने आणि त्याच्या टीमने प्रयत्न चालू ठेवले. हळूहळू काही लोक जोडले गेले. प्रवासी आपले अनुभव शेअर करू लागले. बातम्या व्हायला लागल्या तेव्हा गुंतवणूकदार परत आले.
ती कल्पना आज Airbnb नावाची कोट्यवधींचं मूल्य असलेली आणि जगभर पसरलेली कंपनी बनली आहे.
या दोन्हीही गोष्टींमध्ये “टायमिंग” होतं. थोडं “नशिब” होतं. पण मुख्य म्हणजे — त्यांनी प्रयत्न करत राहून, स्वतःला जगासमोर नेत "नशिबाची" संधी वाढवली होती.


================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================

नशिब म्हणजे फक्त लॉटरी, किंवा अपघाती यश असं नाही.
खरं नशिब म्हणजे — "संधी + दृश्यता" (Opportunity + Exposure)
यालाच म्हणतात:
“जितके अधिक कृतीशील आणि दृश्यमान तुम्ही होता, तितकी तुमची नशिबाशी संपर्क होण्याची शक्यता वाढते.”
आणखी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर Luck = Doing × Telling
Doing = कौशल्य, प्रयत्न, नियमितता, काम
Telling = ते काम लोकांपर्यंत पोहोचवणं, शेअर करणं, नेटवर्क तयार करणं
काही लोक केवळ मेहनत करतात — पण कुणाला कळतच नाही. काही फक्त बोलतात — पण काही करत नाहीत.
पण जेव्हा तुम्ही "करता" आणि "सांगता", तेव्हा नशिबाचं क्षेत्रफळ वाढत जातं.
जसं मच्छीमार समुद्रात जास्त जाळी टाकतो — माशे येणारच याची खात्री नसते, पण जेवढं जाळं मोठं तेवढी संधी वाढते.
मग आपण आपल्या नशिबाचं क्षेत्रफळ कसं वाढवायचं ?
- पूर्ण तयारी होण्याआधीच सुरुवात करा - १००% परिपूर्णतेची वाट न बघता ७०% वरही सुरू करा. कृतीतूनच स्पष्टता येते. जसं धुकं असताना समोर काहीही दिसत नाही पण तरीही चालायला लागलो तर एक एक पाऊल पुढचं दिसायला लागतं.
- फक्त यश नव्हे, प्रवासही शेअर करा - लोकांना तुमची “प्रोसेस” बघायला आवडतो. मागे काय घडलं, तुम्ही काय शिकताय हे शेअर करा.
- जास्त ठिकाणी उपस्थित राहा - सेमिनार आणि वेबिनार अटेंड करा. कमेंटसला उत्तर द्या. नवे कनेक्शन्स जोडा. नशिबाला हालचाल आवडते.
- सोशल मीडियाचा उपयोग "Amplifier" म्हणून करा - ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन — हे तुमचं काम लाखो लोकांपर्यंत पोहोचवणारं Amplifier मशीन आहे. सतत बोलत राहा, स्पष्टपणे बोलत राहा.
- छोट्या छोट्या संधींसाठी ‘हो’ म्हणा - गेस्ट ब्लॉग लिहा, छोटं प्रेझेंटेशन घ्या, कोणी मदत मागितली तर 'हो' म्हणा. मोठं यश लहान पायऱ्यांवरच उभं असतं.
- उपयोगी बना. जनमानसात दिसा. आणि माणुसकी ठेवा. - लोक उपयुक्त, दिलखुलास व्यक्तींना आठवतात. नशिब अशाच लोकांना भेटतं.
आपण समजतो की नशिब "घडतं". पण खरंतर नशिब हा एक आरसा आहे — आपण जगाला किती मूल्य देत आहोत, आपलं काम, आणि आपलं सत्य दाखवत आहोत, याचं प्रतिबिंबच त्या आरशात दिसतं !
कितीतरी लोक स्वप्नं बघतात पण नंतर योग्य वेळेची वाट बघत ती स्वप्न "एखाद्या ड्रॉवरमध्ये" आयुष्यभर पडून राहतात ! Andy Weir ने वाट बघितली नाही. तो लिहत गेला … आणि शेअर करत गेला. Airbnb ने लोकांची “ना” ऐकूनही, दार ठोठावणं बंद केलं नाही.
स्वतःला विचारा:
मी जे काम करतोय, ते लोकांना माहिती आहे का?
मी फक्त बोलतोय, की खरंच काहीतरी करत आहे ?
कारण सत्य एकच आहे:

“तुम्हाला नशिबाच्या मागे धावायची गरज नाही... फक्त नशीब जेव्हा तुम्हाला शोधत येईल तेव्हा त्याला नीट शोधता यावं एवढं तुमच्या कामाचं क्षेत्रफळ मोठं असुद्या !!

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================

लेख आवडला तर नक्की शेअर करा. माझ्या नशिबाचं क्षेत्रफळ वाढायला मदत होईल :-)

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !