चार मेणबत्त्यांची गोष्ट

एका खोलीत चार मेणबत्त्या जळत होत्या. खोलीत शांतता होती आणि त्या एकमेकींशी बोलू लागल्या. 

पहिली म्हणाली, मी शांततेचे प्रतिक आहे, पण या जगात कोणालाच मी नको आहे. सर्वत्र केवळ हिंसा, युद्ध आणि अशांती आहे.. आणि असे म्हणून दुःखी होऊन पहिली मेणबत्ती विझून गेली.

दुसरी म्हणाली, मी विश्वासाचं प्रतिक आहे, पण या जगात आता माझ्यावाचून कोणाचंच अडत नाही... असं म्हणून तीही दुःखी होऊन हळुवारपणे विझून गेली.

तिसरी म्हणाली, मी प्रेमाचं प्रतिक आहे. पण आता या जगात माणसांच्या ह्रदयात प्रेमच उरलेलं नाही. सगळेच जण एकमेकांविषयी मनात मत्सर आणि तिरस्कार बाळगून आहेत. आणि असं म्हणून ती देखील उदास अंतःकरणाने विझून गेली.

इतक्यात तिथे एक लहान मुलगा आला आणि त्या तिन्ही विझलेल्या मेणबत्त्यांना पाहून म्हणाला, ओह काय झालं तुम्ही अशा अर्धवट का विझलात.. तुम्ही तर अखेरपर्यंत जळायला हवं होतंत. आणि असं म्हणून तो रडू लागला

तितक्यात चौथी मेणबत्ती उद्गारली, बाळा रडू नकोस, मी आशेचे प्रतिक आहे. आणि जोवर मी जळतीये तोवर तुला चिंता करण्याची काहीच गरज नाही. कारण जोवर मी आहे तोवर या जगात आपण त्या तिघींनाही पुन्हा पेटवू शकतो.