अवघे बोलू कौतुके !

उत्तम काम किंवा कार्य केल्याबद्दल प्रशंसेचे चार शब्द आपण बोलतो त्याला कौतुक असे म्हणतात. वरवर दिसायला सामान्य पण प्रत्यक्षात मात्र असामान्य असा प्रकार म्हणजे कौतुक ही गोष्ट होय !

सर्व साधारण पणे प्रत्येक माणसात काही न काही गुण आणि दोष असतात. कौतुक करण्यात कंजुषपणा दाखवणे हा माणसाचा सर्वात मोठा दोष होय. वास्तविक कौतुक करायला ना खर्च, ना कष्ट तरीसुद्धा कौतुक करण्याच्या बाबतीत माणूस कुचराई करत असतो.

येथे प्रश्न निर्माण होतो तो हा की, कौतुक करण्यात माणूस कंजूषी का दाखवतो? याचे उत्तर असे की, एकतर कौतुक करण्यासाठी मनाचा जो मोठेपणा लागतो तो सामान्यपणे माणसाजवळ नसतो. काही माणसे तर अशी असतात की ते स्वतः इतरांचे कौतुक करीत नाहीच पण दुसऱ्याने जर कोणाचे कौतुक केले तर तेसुद्धा त्यांना खपत नाही. अशी जरी वस्तुस्थिती असली तरी एक गोष्ट मात्र प्रकर्षाने आढळते ती की, प्रत्येक माणसाला त्याचे इतरांनी कौतुक करावे असे मनापासून वाटते.

इतरांनी तुमचे कौतुक करावे असे जर तुम्हाला मनापासून वाटत असेल तर इतरांचे कौतुक करण्यास आपण शिकले पाहिजे.
दुसऱ्यांचे कौतुक केल्याने आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. पहिला म्हणजे ज्या माणसाचं आपण कौतुक करतो त्याच्याबरोबर आपले संबंध खूप सुधारतात. त्या माणसाला धन्यता वाटते. आणि मुख्य म्हणजे आपल्याबद्दल चांगले शब्द ऐकल्याने अधिक चांगलं काम करण्याचं प्रोत्साहनही आपोआप मिळतं.
एवढेच नव्हे तर त्या माणसाचं कौतुक झाल्यामुळे इतरांना सुद्धा उत्तम काम करण्याची स्फूर्ती मिळते. आणि एकंदर सकारात्मक ऊर्जा वातावरणात दिसून येते.

मात्र कौतुक करण्यात कोणत्याही प्रकारचा दांभिक पणा असता कामा नये. अगदी शंभर टक्के प्रामाणिक पणे कौतुक केले पाहिजे.

===================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
===================

घरासाठी काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या पतीचे किंवा पत्नीचे कौतुक आपण किती वेळा करतो? आपल्या आई वडिलां चे, मुलांचे, मित्रांचे, शेजाऱ्यांची, सहकाऱ्यांचे..... किंवा अगदी नुकताच भेटलेल्या कोणत्याही व्यक्ती चे कौतुक करण्याची संधी आपला कितीतरी वेळा मिळते.... पण आपण बऱ्याच वेळेला ती संधी ओळखतच नाही.

कुठलीही गोष्ट सरावाने साध्य होते तशीच मित्रांनो कौतुक करणे हेदेखील आपल्याला सरावाने जमू शकते. दररोज किमान एका तरी व्यक्तीचे अत्यंत प्रामाणिक पणे कौतुक करेन असे मनाशी ठरवा. आणि मग बघा, आजूबाजूला अशा अनेक संधी आपल्याला दिसायला लागतील.

कोणाचा प्रामाणिकपणा, मनमिळावू पणा, शिस्त, कष्ट, रूप, नीटनेटकेपणा, टापटीप पणा, वक्तशीरपणा, स्मरणशक्ती, हास्य, दातृत्व, कर्तुत्व, विनोदबुद्धी, तर्कबुद्धी, अभ्यास..... अशा कितीतरी गोष्टींबद्दल आपण आसपासच्या लोकांचे पासून कौतुक करू शकतो. समोरासमोर शक्य असेल तेव्हा, आणि जेव्हा शक्य नसेल तेव्हा फोनवर, व्हाट्सअप वर किंवा सोशल मीडियामध्ये नक्कीच आपण हे करू शकतो.

चला तर मग आजच सुरुवात करुया ! "अवघे बोलू कौतुके" !

(आणि हो नेटभेटच्या अपडेट्स ना सबस्क्राईब केल्याबद्दल, आणि हा लेख आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर केल्याबद्दल तुमचं हि खूप खूप मनापासून कौतुक !! :-) )

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy