उजेड देणाऱ्या बल्बचा "काळा" इतिहास !

Tue Sep 13, 2022

थॉमस एडिसन ने १८७८ मध्ये light Bulb चं पेटंट घेतलं आणि Lighting या एका नव्या उद्योगक्षेत्राची सुरुवात झाली. लवकरच यामध्ये अनेक तांत्रिक सुधारणा होत गेल्या आणि जगभर मागणी झपाट्यानं वाढली.

मागणी वाढली तशा या मागणीला पुरवठा करणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात आल्या आणि स्पर्धा देखील वाढली. अमेरिकेची GE , जर्मनीची OSRAM , PHILIPS ही डच कंपनी , जपानची Tokyo Electric अशा अनेक कंपन्या या वाढत्या बाजारपेठेचा मोठा घास घेण्यासाठी प्रयत्न करत होत्या. तेव्हाच Phobeus या कार्टल चा जन्म झाला.

लाइटिंग क्षेत्रात झपाट्याने प्रगती व्हावी, नवे तंत्रज्ञान विकसित व्हावे या उद्देशाने जगातील बहुतांशी मोठ्या कंपन्यांनी एकत्र येऊन काम करायचे ठरवले. १९२४ मध्ये जिनिव्हा येथे त्यांची पहिली परिषद भरली. Convention for the Development and Progress of the International Incandescent Electric Lamp Industry असं भरगच्च नावही त्याला मिळालं. लाईट बल्बचा आकार आणि होल्डर स्टॅंडर्ड (एकसारखा) करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण सर्वच निर्णय काही ग्राहकांच्या फायद्यासाठी होते असे नाही.

या सर्व कंपन्यांना लक्षात आले होते की जसजसं तंत्रज्ञान विकसित होईल आणि बल्ब चं आयुष्यमान सुधारेल तसं विक्री कमी होऊ लागेल. आणि म्हणून बल्ब चं आयुष्य वाढविण्यापेक्षा कमी करण्यासाठी संशोधन सुरु झालं. या कार्टल चं नाव होतं Phobeus. लॅटिन भाषेत याचा अर्थ होतो "प्रकाशित" !

सर्व कंपन्यांनी मिळून एक करार केला की प्रत्येकाने आपल्या बल्बचं आयुष्यमान कमी म्हणजे १००० तासांपर्यंतच ठेवायचं. यासाठी जिनिव्हा येथे एक लॅब उभारण्यात आली आणि प्रत्येक उत्पादक कंपनीला आपल्या उत्पादनाचे सॅम्पल्स या लॅब मध्ये पाठविणे बंधनकारक केले. या लॅब मध्ये बल्बचे आयुष्यमान तपासले जायचे जर ते ८०० ते १२०० तासांपर्यंत असेल तर ठीक , पण जास्त असले तर मोठा फाईन आकारला जायचा. बल्ब ची गुणवत्ता कमी कशी करायची, आणि बरोबर १००० तासांच्या आत बल्ब काम करायचा बंद झाला पाहिजे यावर संशोधन करण्यासाठी Phobeus कार्टल ने खूप खर्च केला. किती विरोधाभास आहे बघा. तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी स्थापन झालेल्या संस्थेने प्रत्यक्षात उलट काम केले.

कार्टल सुरु होण्याआधी बल्ब साधारणपणे २५०० तास चालत असे , कार्टल अस्तित्वात आल्यानंतर बल्ब चे आयुष्यमान सुमारे १००० तास झाले. यामुळे साहजिकच विक्री वाढली आणि या कंपन्यांनी प्रचंड नफा मिळवला.


जवळजवळ २० वर्षे लाईट बल्ब मध्ये काहीही सुधारणा होऊ न देता Phobeus कार्टल ने ग्राहकांचं आणि तंत्रज्ञानाचं प्रचंड नुकसान केलं. पुढे १९४० ला या कार्टलच्या करतुदी जनतेसमोर आल्या.


आता Phobeus अस्तित्वात नाही आणि कुणाला हे नाव लक्षात राहण्याचही कारण नाही. पण planned obselence हा कॉन्सेप्ट त्यांनी निर्माण केला आणि तो आजही वापरला जातो आहे. planned obselence म्हणजे प्रॉडक्ट केव्हा वापरातून बाद होईल हे आधीच ठरवून त्यानुसार उत्पादन करणे. मोबाईल कंपन्या, consumer electronics कंपन्या अगदी सॉफ्टवेअर कंपन्या देखील ग्राहकाला ठराविक वर्षांनंतर नवीन उत्पादन घ्यावंच लागेल असं डिझाईन करतात. कारण जर असं केलं नाही तर त्या कंपन्याची विक्री कमी होऊन आपोआपच दिवाळखोर होतील.


आता LED लाईट्स वापरल्या जात आहेत. LED लाईट्सचे साधारण आयुष्यमान पन्नास हजार तास इतके असते. म्हणजे दररोज आठ तास जरी लाईट चालली तरी १७-१८ वर्षे खराब होणार नाही. थोडक्यात LED lights ची विक्री भविष्यात कमी होत जाईल. ज्या कंपन्यांनी LED lights बनविण्याच्या क्षेत्रात भरपूर गुंतवणूक केली असेल त्यांना भविष्यात हे आव्हान मिळणारच आहे. किंवा कदाचित जगाच्या पाठीवर कुठेतरी आणखी एखादे कार्टल यावर उपाय शोधून बसले असेलही !


सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !