डिजिटल पेमेंट्सपूर्वी आपण पैसे जाणीवपूर्वक खर्च करायचो. पाकीट उघडणे, नोटा मोजणे, त्या दुसऱ्याच्या हातात देणे - प्रत्येक क्रिया आपल्याला खर्चाबद्दल विचार करायला लावायची. अर्थशास्त्रज्ञ याला "पेमेंटची वेदना" (पेन ऑफ पेइंग) म्हणतात - एक मानसिक घर्षण (Emotional Resistence) जे नैसर्गिकरित्या आपल्याला खर्चाबद्दल अधिक जागरूक बनवायचे.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
येथे क्लिक करा.
================
आज, डिजिटल वॉलेट्स आणि UPI मुळे ही जाणीव हळूहळू कमी होत चालली आहे. "कॅशलेस इफेक्ट" आपल्या खर्चाच्या मानसशास्त्राला बदलत आहे. जसजसे आपण कागदी पैशांपासून दूर जात आहोत, तसतसा खर्च करण्यावरचा तो नैसर्गिक अडसर कमी होत चालला आहे. प्रत्येक व्यवहार इतका सुलभ झाला आहे की कधीकधी तो करताना आपल्याला त्याची जाणीवच राहत नाही.
उदाहरणार्थ, पूर्वी रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यावर बिल भरताना आपण नोटा मोजत असताना त्या खर्चाची जाणीव व्हायची. आज फोनवर एक टॅप करून पेमेंट होते आणि आपण पुढे निघून जातो. त्या खर्चाचा विचारही करत नाही.
किंवा ऑनलाइन शॉपिंग करताना, पूर्वी कॅश ऑन डिलिव्हरी असताना वस्तू घेताना पैसे मोजावे लागायचे. आता तर 'बाय नाउ' चे बटण दाबलं की झालं. त्यामुळे अनावश्यक खरेदीचं प्रमाण वाढलं आहे.
व्यापक आर्थिक आणि व्यावसायिक वाढीच्या दृष्टिकोनातून हा बदल अत्यंत रंजक आहे. खर्च करण्यातला अडथळा कमी होत असताना, आपल्या ग्राहक वर्तणुकीत मोठे बदल होत आहेत. कॅशलेस व्यवहारांची सुलभता केवळ पैसे देण्याची पद्धत बदलत नाही - तर ती हळूहळू आपण किती खर्च करतो तेही वाढवत आहे.
छोट्या-छोट्या खरेदीसुद्धा आता सहज होतात. चहा-कॉफीसाठी, छोट्या नाश्त्यासाठी, रिक्षा-टॅक्सीसाठी डिजिटल पेमेंट करताना त्या खर्चाची नोंद मनात राहत नाही. महिन्याअखेर जेव्हा एकूण खर्च बघतो तेव्हा धक्काच बसतो.
या डिजिटल पेमेंट क्रांतीचे दोन पैलू आहेत: एका बाजूला ती आर्थिक विकास आणि सुविधा वाढवते, तर दुसऱ्या बाजूला ती आपल्या जाणीवपूर्वक खर्च करण्याच्या सवयीला आव्हान देते.
म्हणूनच आता जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. दररोजच्या खर्चाची नोंद ठेवणे, मासिक बजेट बनवणे, अनावश्यक खर्च टाळणे या सवयी लावून घ्याव्या लागतील. तंत्रज्ञानाने दिलेल्या सुविधेचा फायदा घेत असतानाच त्याच्या मर्यादाही ओळखल्या पाहिजेत.
यासाठी एक सोपा उपाय आपण आपल्यापुरता करू शकतो. जसे की मी रुपये १ ० ० ० पर्यंतची खरेदी UPI ने करतो. एक हजार ते तीन हजार पर्यंतची खरेदी प्रत्यक्षात असेल तर कॅश आणि ऑनलाईन असेल तर क्रेडिट कार्ड ने करतो आणि तीन हजार पेक्षा जास्तची खरेदी क्रेडिट कार्डने करतो. कोणतीही गोष्ट impulse buy करत नाही. किमान ३ -४ दिवसांचा वेळ घेऊनच खरेदी करतो. ऑनलाईन खरेदी करताना आवडलेली गोष्ट लगेचच विकत न घेता कार्ट मध्ये टाकून ठेवतो. ३ -४ दिवसानंतरही ती घ्यावीशी वाटली तरच विकत घेतो. (बऱ्याचदा कार्ट मधील वस्तूंसाठीचा कुपन कोडही ईमेलमध्ये मिळतो!)
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
येथे क्लिक करा.
================
तुम्ही अनावश्यक खर्च टाळण्यासाठी आणखी काही उपाययोजना करता का ? कमेंट्स मध्ये अवश्य लिहा.
सलिल सुधाकर चौधरी