१०० वर्षांपूर्वीची वैद्यकीय परिस्थिती. तेव्हा वेळेआधी जन्मलेली चारपैकी तीन बाळं जिवंत राहत नव्हती.
हे तिसऱ्या जगात घडत नव्हतं— तर हे युरोप आणि अमेरिकेसारख्या तेव्हाही प्रगत मानल्या जाणाऱ्या देशांत घडत होतं.
डॉक्टर आणि नर्सेस अशा नाजूक अशक्त बाळांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या हातात जास्त काही नव्हतं.
ही बाळं पूर्ण विकसित नसत, अतिशय लहान आणि कुपोषित असत.
ती स्वतःला उब देण्यासाठी पुरेशी उष्णताही निर्माण करू शकत नसत, त्यामुळे ७५% बाळं मरत.
त्यावेळी वैद्यकीय क्षेत्राने हे नैसर्गिक आहे असे मान्य केले होते.
पण L’Hôpital Paris Maternité येथील डॉ. एतिएन टार्नियर हे अपवाद होते.
त्यांनी एकदा शेतामध्ये कोंबडीला तिच्या अंड्याना उब देताना पहिले. त्यांना वाटले हाच उपाय माणसांच्या बाळांसाठी वापरला तर ?
आणि १८८० मध्ये त्यांनी आणि त्यांचे सहकारी , डॉ.पियरे बुडिन यांनी हेच बाळांवर वापरण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी अशा पेट्या तयार केल्या ज्या उष्णता टिकवून ठेवतील, वर काचेचे झाकण लावले जे प्रकाशकिरण बाळांपर्यंत पोहोचवेल आणि बाळाच्या शरीराला उब देण्यासाठी त्या पेटीत गरम पाण्याची बाटली ठेवली.
हीच सुरुवात होती उपकरणाची ज्याला आपण इन्क्युबेटर म्हणून ओळखतो.
हा प्रयोग यशस्वी ठरत होता. त्यांनी इन्क्युबेटर मध्ये ठेवलेल्या बाळांचा जिवंत राहण्याचा दर खूप जास्त होता. आता हे इन्क्युबेटर सर्वच रुग्णालयात बसवणे आवश्यक होते.
पण वैद्यकीय अधिकाऱ्यांना अशा महागड्या आणि मूर्खपणाच्या उपकरणांमध्ये रस वाटला नाही.
याचं कारण—वेळेआधी जन्मलेली बाळं मरतात हा नैसर्गिक नियम आहे असे ते मानत होते. कोंबडीच्या अंड्यांचा आणि माणसांच्या बाळांचा काय संबंध असा प्रश्न देखील विचारला.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/Ip4ab5E7gGU52GQS3uC7pq
येथे क्लिक करा.
================बराच प्रयत्न करूनही हॉस्पिटल्स मध्ये हे उपकरण लावता येत नव्हते. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांपैकी एक, डॉ. मार्टिन कौनी यांना एक वेगळीच कल्पना सुचली. त्यांनी वैद्यकीय संस्थांकडे न जाता थेट जनतेकडे जाण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी सहा इन्क्युबेटर्स घेतले आणि चक्क १८९६ च्या बर्लिन वर्ल्ड एक्झिबिशन या प्रदर्शनात मांडले. तिथे त्यांनी बर्लिन चॅरिटी हॉस्पिटलकडून वेळेआधी जन्मलेली सहा बाळे मिळविली. हॉस्पिटलने ती दिली, कारण त्यांच्यामते ती तशीही मरणारच होती.
त्यांनी नर्सेस नेमल्या आणि इन्क्युबेटरमधील बाळं जनतेसाठी प्रदर्शनात ठेवली. त्या बाळांना पाहण्यासाठी चक्क तिकीट लावले.
लोकांनी सामान्य बाळांपेक्षा चार पटीने लहान जिवंत बाळं पाहिली.
आणि तत्कालीन वैद्यकीय समजुतींच्या विरुद्ध, सर्व सहा बाळं निरोगी वाढताना दिसली.
त्यांनी हे इन्क्युबेटर्स अमेरिकेतही नेले, तिथेही तितकीच अकाली बाळं मरत होती.
१९०१ मध्ये त्यांनी हेच बफेलो, न्यूयॉर्क येथील पॅन अमेरिकन एक्झिबिशनमध्ये केले.
१९०२ मध्ये पुन्हा वर्ल्ड्स फेअरमध्ये केले.
आश्चर्याची बाब म्हणजे लोक जगातील सर्वात लहान आणि उबदार गुंडाळलेल्या बाळांना पाहायला २५ सेंट देत होते. आणि गरीब कुटुंबे आपली बाळं वाचण्यासाठी ही संधी मिळाल्याबद्दल डॉक्टरांचे आभार मानत होती. ज्यांचा मृत्यू अटळ वाटत होता अशा मुलांना जीवनदान देणारी ही उबदार पेटी एका जादूपेक्षा कमी नव्हती.
कौनी यांचे इन्क्युबेटर प्रदर्शन कोनी आयलंडमध्ये पुढील ४० वर्षे चालू राहिले.
या काळात त्यांनी ८,००० पैकी ६,५०० अकाली बाळांचे प्राण वाचवले.
म्हणजे जिवंत राहण्याचा दर २५% वरून थेट ८५% झाला.
शेवटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मान्य केले की हे उपकरण खरच मुलांना जीवनदान देणारे आहे.
आणि आज इन्क्युबेटर्स संपूर्ण जगभर रुग्णालयांमध्ये जीव वाचवत आहेत.
हे सगळं त्या डॉक्टरांनी पारंपरिक समजुतींकडे लक्ष न देता केले म्हणून शक्य झाले.
त्यांनी निसर्गकडील प्रश्नाला निसर्गाकडूनच उत्तर मिळविलं.
त्यांनी नियम बदलण्यासाठी धोपट मार्ग स्वीकारला नाही.
त्यांनी अशा लोकांकडे आपले उपकरण नेले ज्यांना खरंच त्यांच्या प्रश्नांवर सोल्युशन पाहिजे होते.
त्यांनी ते केले जे करणे त्यांना महत्वाचं वाटत होतं !
जे लोक आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी "जे जे करावे लागेल ते ते सर्व करतात" तेच लोक अडचणींवर मात करतात. बाकी लोक निराश होतात...अडचणींवसमोर गुडघे टेकतात किंवा नशिबाला दोष देत बसतात !!
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !