इतरांच्या स्वातंत्र्याचा सन्मान करायला शिकवणारी एक छोटीशी सत्यकथा
ती आपल्या छोट्याशा 4 वर्षांच्या बाळासह प्रवासाला निघाली होती. सेऊल, कोरिआ ते सॅनफ्रॅन्सिस्को, अमेरिका हा तिच्या बाळाचा पहिलाच विमानप्रवास होता. विमान आकाशात झेपावण्यापूर्वी या आईने सुमारे 200 प्लास्टिक बॅग्स सहप्रवाशांना त्यांच्या जागेवर जाऊन प्रत्येकी एक याप्रमाणे वाटल्या. या बॅगमध्ये काय होतं ठाऊक आहे ? या प्लास्टिक बॅगमध्ये कँडी, च्यूईंगगम आणि चक्क इअरप्लग्स होते. प्रत्येकच प्रवाशाच्या चेहऱ्यावर आश्चर्य झळकत होतं आणि प्रत्येकजण त्या पिशवीत त्याला मिळालेली चिठ्ठी वाचून अगदी हळवा झाला होता.
या चिठ्ठीत लिहीलेलं होतं,
"हॅलो, माझं नाव 'जॅन वू' आहे. मी अवघा 4 महिन्यांचा आहे आणि आज मी माझ्या आईबरोबर अमेरिकेला निघालोय. माझ्या आयुष्यातला हा माझा पहिला विमान प्रवास आहे त्यामुळे मी थोडासा घाबरलोय आणि मी थोडासा बेचैनपण आहे, यामुळेच खरंतर मला रडू येतंय आणि माझ्या रडण्यामुळे कदाचित तुम्हाला माझा राग येईल, तुमची चिडचिड होईल.. पण असं होऊ नये, आणि तुम्ही माझ्यावर रागवू नये म्हणून मी तुमची आधीच माफी मागतो. मी शांत रहाण्याचा, रडून गोंधळ न घालण्याचा प्रयत्न करीन पण कृपया मला शांत होण्यासाठी आणि या प्रवासात स्वतःला अडजस्ट करण्यासाठी थोडासा अवधी द्या. जर तोवर तुम्हाला माझ्या आवाजानी खूपच इरिटेट व्हायला झालं तर मी दिलेल्या बॅगमध्ये इअरप्लग्स आहेत ते वापरा किंवा ही कँडी वा च्यूईंग गम खाऊन सुद्धा तुम्ही तुमचं लक्ष्य माझ्यावरून थोडा वेळ विचलीत करू शकता, तुम्हाला त्यासाठी या बॅगमधल्या वस्तूंची नक्कीच मदत होईल. तुमच्या प्रवासाचा आनंद घ्या..
थँक यू ... !'
मित्रांनो, या एका लहानशा कृतीने त्या आईने सर्व सहप्रवाशांची मनं तर जिंकलीच तसंच, आपल्या बाळाप्रती आपल्या भवतालच्या लोकांना संवेदनशीलही बनवण्यात ती यशस्वी झाली.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, इतरांच्या स्वातंत्र्याचाही आदर करण्याची संस्कृती आपण जपली पाहिजे हेच या आईने संपूर्ण जगाला दाखवून दिलं.