गुंतवणुकीची चमक खरी की तात्पुरती?

गुंतवणुकीची चमक खरी की तात्पुरती ?

सध्या सोन्याच्या भावाप्रमाणेच चांदीचा भाव देखील वेगाने वाढतोय. बरेच जण चांदीकडे गुंतवणुकीचा आदर्श पर्याय म्हणून पाहत आहेत. पण चांदी खरेच गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे का ? चांदीच्या वाढीचा हा 'जोश' दीर्घकाळ टिकेल का?

चांदीच्या दरात होणारी वाढ प्रामुख्याने दोन कारणांमुळे झाली आहे. पहिले कारण म्हणजे चांदीच्या मागणीत झालेली वाढ. चांदी हा धातू अतिशय चांगला विद्युतवाहक (Conductor) असल्यामुळे चांदीचा वापर तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोलर पॅनल्स, इलेक्ट्रिक वाहनं (EVs) आणि त्यांच्या बॅटरीज, मोबाईल चिप्स, 5G नेटवर्कचे घटक तसेच वैद्यकीय उपकरणे अशा अनेक ठिकाणी चांदी गरजेची आहे. या वाढत्या औद्योगिक मागणीमुळे भाव वाढतोय, यात शंका नाही. पण... फक्त या एका गोष्टीवर आधारित गुंतवणुकीचा मोठा निर्णय घेणे धोकादायक ठरू शकते.

चांदीच्या वेगवान भाववाढीचे दुसरे कारण आहे FOMO. Fear Of Missing Out म्हणजेच काहीतरी निसटून जाण्याची भीती. सध्याच्या भावात चांदी विकत घेण्याची संधी हातातून निसटू नये म्हणून लोक खरेदी करत आहेत. भाव वाढतोय म्हणून लोक खरेदी करत आहेत आणि खरेदी होत असल्याने भाव आणखी वाढत आहेत. अशी ही एकमेकात गुंतलेली साखळी आहे. या साखळीत उडी मारण्यापूर्वी, आपण स्वतःला प्रामाणिकपणे विचारायला हवे: “मी विचारपूर्वक गुंतवणूक करतोय... की फक्त इतरांना पाहून धावत सुटलोय?”

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी

https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2

येथे क्लिक करा.

================

काहीजण सोने परवडत नाही म्हणून चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात. आपल्या मनामध्ये सोने चांदी ही जोडी एकत्रच बसलेली आहे. पण प्रत्यक्षात सोने आणि चांदीचे वागणे बिलकुल वेगळे आहे. सोन्याला 'सुरक्षित गुंतवणूक' (Safe Haven) मानले जाते, कारण जगातील सेंट्रल बँका (उदा. RBI) सोन्याचा मोठा साठा (रिझर्व्ह) ठेवतात. यामुळे सोन्याला कायम आर्थिक स्थिरता आणि मागणी असते. याउलट, चांदी ही कोणतीही बँक किंवा सरकार रिझर्व्ह म्हणून ठेवत नाही. तिचा भाव लोकांच्या भावनेवर आणि उद्योगाच्या मागणीवर अवलंबून असतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, सोने म्हणजे आर्थिक सुरक्षा, तर चांदी ही तांब्या किंवा ॲल्युमिनियमसारखीच एक 'औद्योगिक कमोडिटी' आहे.

ज्यांनी चांदीमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांनी 1980 आणि 2011 चा इतिहास लक्षात घ्यायला हवा. 2011 मध्ये चांदीचा भाव प्रचंड वाढला होता, पण नंतर तो केवळ 8 दिवसांत जवळपास 25% कोसळला! या मोठ्या धक्क्यानंतर, पुढील 13 वर्षांत चांदीने सरासरी फक्त 3% वार्षिक परतावा दिला आहे, जो FD पेक्षाही कमी आहे. "आता लवकरच भाव वाढतील" असे म्हणत गुंतवणूकदारांनी 13 वर्षे वाट पाहिली आहे. हे दर्शवते की तात्पुरत्या उत्साहाने घेतलेला गुंतवणुकीचा निर्णय किती महागात पडू शकतो.

चांदीत चढ-उतार (Volatility) खूप जास्त असतात. जर सोनं 10% ने वाढले, तर चांदी कधीकधी 20% पर्यंत वाढू शकते; पण जर सोनं 10% ने घसरले, तर चांदी कधीकधी थेट 40% पर्यंत कोसळते! ही जोखीम दीर्घकालीन स्थिर गुंतवणुकीसाठी योग्य नाही. कदाचित नजीकच्या काळात चांदीचे दर आणखी वाढूही शकतील. पण दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा एक आदर्श पर्याय असेलच असे नाही.

तुमचे मत काय आहे? तुम्ही चांदीत गुंतवणूक केली आहे का? ती गुंतवणुकीत टिकेल की नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा!

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

What would you like to learn today?