There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
' तुमच्या नशीबात तुम्ही तीच व्यक्ती होणं लिहीलेलं असतं जे तुम्ही स्वतः व्हायचं ठरवलेलं असतं..!'
तुम्ही अलीकडच्या काळात स्वतःसाठीच म्हणून खास महत्वाची अशी कोणती गोष्ट केली आहे ? जरा आठवून बघा बरं ..
स्वतःत गुंतवणूक करणं ही एक सातत्याने करायची गोष्ट आहे आणि याचे चिक्कार फायदे आहेत.
पण स्वतःत गुंतवणूक करायची म्हणजे नेमकं काय करायचं असतं..?
कसली गुंतवणूक ? आणि ही गुंतवणुक आपण स्वतःत करतोय का, आपल्याही नकळत ?
चला तर मग आज जाणून घेऊया, हा स्वतःत गुंतवणूक करण्याचा फंडा नेमकं काय सांगतो..
मला स्वतःला ही एक कल्पना फार आवडते, ज्यानुसार असं म्हटलं आहे, की आपल्या प्रत्येकाकडे इतरांपेक्षा काही ना काही विशेष वेगळी गोष्ट असतेच आणि ही गोष्ट जगाला भरभरून देण्यासाठीच खरंतर आपला जन्म झालेला असतो असं म्हटलं जातं. माझा या कल्पनेवर विश्वास आहे.
जर तुम्ही स्वतःतील ही खास गोष्ट ओळखून त्यावर मेहनत केली, म्हणजेच ती गोष्ट तुमच्याकडून आणखी उत्तम होईल यासाठी स्वतःवर मेहनत घेतलीत, तीच गोष्ट वाढेल यासाठी विशेष प्रयत्न केलेत तर तुमच्या कल्पनेपेक्षाही फार अधिक चांगलं फळ तुम्हाला त्याचं मिळेल. ही मेहनत, हे विशेष प्रयत्न म्हणजेच तुम्ही स्वतःवर केलेली गुंतवणूक.
गुंतवणूक म्हणजे काय, तर असं काहीतरी ज्यात भविष्यात वाढ होईल आणि ज्याचे उत्तम परिणाम तुम्हाला मिळतील किंवा त्या गोष्टीचं मूल्य भविष्यात अधिक वाढत जाईल.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
स्वतःत गुंतवणूक कशी करायची ?
नवीन कौशल्य शिका - तुम्ही नवीन कौशल्य शिकू शकता किंवा तुमच्यात जे उपजतच कौशल्य असेल त्याचंच शास्त्रोक्त शिक्षण घेऊ शकता. तुम्ही स्वतःचा जनसंपर्क वाढवू शकता. स्वतःच्या तब्ब्येतीची विशेष काळजी घेऊन छान शरीर कमावू शकता.. किंबहुना, तुम्ही हे सगळंच करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, देवानं जी देणगी तुम्हाला दिली आहे ती तुम्ही अधिक समृद्ध कशी करता येईल याचा सतत विचार करून त्यानुरूप त्यासाठी अहोरात्र मेहनत करू शकता. लक्षात ठेवा, स्वतःत जे गुंतवाल ते भरभरून वाढेल, आणि म्हणूनच जर तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या गोष्टी सातत्याने केल्यात तर एक ना एक दिवस तुम्हाला त्याचे उत्तम परिणाम दिसतील आणि त्या मेहनतीची गोड फळेही चाखायला मिळतील.
स्वतःला ओळखा - स्वतःत गुंतवणूक करणं ही वरवर पाहिली तर एक सामान्य गोष्ट वाटते. कधीकधी तर या छोट्याशा गुंतवणुकीला अक्षरशः दररोज दिवसभरातले पाच मिनीटंही पुरतात किंवा आयुष्यही लागतं. म्हणूनच, सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं काम म्हणजे, तुम्हाला स्वतःच्या कोणत्या खास गोष्टीसाठी ही गुंतवणूक करायची आहे ते स्वतःच्या मनाशी विचार करून नीट आणि नेमकं ठरवणं. त्यासाठी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला नीट ओळखणं.. स्वतःला ओळखणं !
स्वतःचं व्यक्तिमत्त्व कसं ओळखायचं..?
थोडासा वेळ काढा आणि विचार करा की तुमच्याकडे इतरांपेक्षा वेगळी अशी कोणती कौशल्य आहेत, किंवा असे कोणते गुण आहेत ज्यामुळे तुम्ही इतरांमध्ये निराळे उठून दिसता. या प्रश्नाचं चिंतन करताना जी जी उत्तरे मनात सहजरित्या येतील ती लक्षात ठेवा.
काही माणसं हे इतरांसाठी झिजतात, त्यातच त्यांचा खरा आनंद असतो आणि तोच त्यांचा उत्तम गुण असतो. तर काहीजण नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यात, समजून घेण्यात व ते वापरण्यात अत्यंत तरबेज असतात. काही जणांना पशुपक्ष्यांचा लळा असतो, ते त्यांची काळजी घेतात, त्यातच त्यांना खरा आनंद गवसतो. अगदी अशाच प्रकारे, तुमच्यातही काहीतरी खास गोष्ट आहेच, ती तुम्हाला ओळखता यायला हवी. तेच तुमचे वैशिष्ट्य असेल. स्वतःचं व्यक्तिमत्त्व खुलवणं यालाच तर म्हणतात की ज्यात तुमचे स्वतःचे नैसर्गिक गुण उजळवण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करता आणि सतत प्रयत्न करून तुम्ही ती गोष्ट दिवसागणिक अधिकाधिक उत्तम करत जाता.
तात्पर्य - स्वतःत गुंतवणूक करणं म्हणजे स्वतःतील खास अशी कौशल्य विकसीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत रहाणं. त्यासाठी वेळ देणं.
लक्षात ठेवा - तुम्ही तुमच्या संपत्तीसाठी लायक आहात, तुम्ही तुमच्या प्रयत्नांसाठी लायक आहात.. तुम्ही लायक आहात.. !
- राल्फ वाल्डो एमर्सन
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com