There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
जपानपासून जगापर्यंत: हे 'लाबुबू' नावाचं विचित्र खेळणं इतकं लोकप्रिय का आहे?
जपान मध्ये प्रत्येक तरुण मुला-मुलीच्या बॅगला... आणि हो, अगदी प्रत्येकाच्या... एक विचित्र, अजिबात गोंडस नसलेलं खेळणं लटकलेलं दिसतंय. सुरुवातीला जपानमध्ये असलेली ही क्रेझ आता जगभर पसरत आहे.
काही महिन्यांतच संपूर्ण जग पादाक्रांत केलेल्या या खेळण्याचं नाव आहे - लाबुबू (Labubu).
विचित्र नावाचं आणि तितकंच विचित्र दिसणारं हे खेळणं नक्की आहे तरी काय?
आणि लोक याच्यामागे इतके वेडे का झाले आहेत?
चला, या लेखात आपण याच 'लाबुबू'ची पूर्ण कहाणी आणि त्याच्या लोकप्रियतेमागची कारणं जाणून घेऊया.
#१: लाबुबू म्हणजे नक्की काय?
हाँगकाँगचे प्रसिद्ध कलाकार केसिंग लुंग (Kasing Lung) यांनी चीनच्या पॉपमार्ट (Popmart) या लोकप्रिय ब्रँडसोबत मिळून या खेळण्यांची निर्मिती केली आहे. लाबुबू हे त्यांच्या 'द मॉन्स्टर्स' (The Monsters) नावाच्या खेळण्यांच्या सीरीजचा एक भाग आहे.
हे तुमच्या आमच्या नेहमीच्या खेळण्यांसारखं नाही. खेळणी म्हटलं की 'गोंडस' किंवा 'क्यूट' हा शब्द डोळ्यासमोर येतो. पण लाबुबू या व्याख्येत अजिबात बसत नाही.
लाबुबू हे चिडलेल्या, रागीट चेहऱ्याचं आणि खरं सांगायचं तर थोडं विचित्र आणि भीतीदायक दिसणारं खेळणं आहे.
पण तरीही, आज फॅशन जगतावर याने अक्षरशः गारुड घातलं आहे.
#२: प्रत्येकजण झालाय लाबुबूचा चाहता!
अगदी प्रत्येकजण.
ही फक्त सामान्य लोकांची फॅशन नाही, किंवा फक्त श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांची फॅशन नाही. तर ही दोघांचीही आहे!
लाबुबू तुम्हाला शाळेत जाणाऱ्या मुलांच्या साध्या बॅगला लटकलेलं दिसेल, आणि त्याचवेळी हजारो डॉलर्स किमतीच्या महागड्या बॅग्जवरही दिमाखात मिरवताना दिसेल! यावरून त्याच्या लोकप्रियतेचा प्रचंड आवाका आपल्या लक्षात येतो.
जगभरातील मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा अभिमानाने लाबुबू बाळगत आहेत आणि आपल्या कलेक्शनचं प्रदर्शन करत आहेत!
#३: मग यामागचं नेमकं आकर्षण काय?
खरं सांगायचं तर, याचं एक ठोस आणि निश्चित उत्तर कोणालाच माहिती नाही. पण यामागे मानसशास्त्राचा (psychology) मोठा हात आहे, हे मात्र नक्की. चला काही प्रमुख कारणं पाहूया:
१. मिलेनियल्स (Millennials) आणि जनरेशन Z (GenZ) :
मिलेनियल्स (Millennials) आणि जनरेशन Z (GenZ) या पिढ्या लाबुबूच्या प्रेमात पडल्या आहेत. याची दोन प्रमुख कारणं आहेत -
👉१ . बार्बी आणि टेडी बेअरच्या क्युटपणापेक्षा वेगळं काहीतरी ही पिढी शोधत आहे.लाबुबू 'गोंडस'पणाच्या पारंपरिक व्याख्येत बसत नाही. हे एक प्रकारे उपरोधिक (ironical) आणि बंडखोर आहे. त्यामुळे GenZ साठी हे 'कूल' आणि आकर्षक आहे.
👉२ . Brand Fatigue - एकच ब्रँड किंवा उत्पादनाचा तोचतोचपणा हळूहळू कंटाळवाणा होतो. आणि पिढी बदलते तसा ब्रॅण्डचा प्रभाव देखील कमी होतो. उदाहरणार्थ सध्याची पिढी कोक/ पेप्सी ऐवजी स्टिंग ड्रिंक पसंद करते. बॉलीवूड ऐवजी कोरियन सिनेमा आणि इंडिपॉप ऐवजी के - पॉप पसंद करते.
२. लक्झरी फॅशनचे चाहते:
लक्झरी फॅशनमध्ये सध्या बदलाचे वारे वाहत आहेत. फक्त क्लासिक आणि पारंपरिक गोष्टी आता पुरेशा नाहीत. आता काय चालतं? तर - वेगळेपणा (Edge), वेगळे सांस्कृतिक संदर्भ (Cultural relevance) . लाबुबू या दोन्ही गोष्टींची अचूक पूर्तता करतं.
३ लाबुबूची जबरदस्त विक्री आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी!
लाबुबूच्या यशामागे त्याची हुशार विक्री पद्धत आहे.
ओरिजिनल लाबुबू फक्त पॉप-मार्टवरच खरेदी करता येतात आणि ते एका कलेक्शनचा भाग म्हणून विकले जातात. यात वेगवेगळे रंग, वेगवेगळे हावभाव असलेले लाबुबू मिळतात.
पण खरी गंमत इथेच आहे: तुम्ही तुमच्या आवडीचं विशिष्ट लाबुबू खेळणं निवडू शकत नाही.
तुम्हाला एक सीलबंद बॉक्स विकत घ्यावा लागतो. तो उघडल्यावरच तुम्हाला कळतं की तुमच्या नशिबी कोणता लाबुबू आला आहे! या 'ब्लाइंड बॉक्स' (blind box) पद्धतीमुळे:
- बॉक्स उघडण्याचा (unboxing) अनुभव खूप खास आणि रोमांचक बनतो.
- वेगवेगळे लाबुबू जमवण्याची (collecting) उत्सुकता वाढते.
- आपल्याला हवा तो लाबुबू मिळेपर्यंत पुन्हा पुन्हा खरेदी करण्याची इच्छा होते
-
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================
४ सोशल मीडियाची ताकद
सोशल मीडियाने लाबुबू ट्रेंडला जगभर पोहोचवण्यात खूप मोठी भूमिका बजावली. इंस्टाग्राम, टिकटॉक आणि फेसबुकवर #Labubu सारखे हॅशटॅग वापरून लाखो लोकांनी आकर्षक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. 'ब्लाइंड बॉक्स' उघडतानाचे 'अनबॉक्सिंग' व्हिडिओ (unboxing videos) प्रचंड व्हायरल झाले, ज्यामुळे लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सनी त्यांचे लाबुबू कलेक्शन दाखवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्यांच्या लाखो फॉलोअर्समध्येही ही क्रेझ वेगाने पसरली.
आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे खेळणं खूप जास्त महाग नाही. त्यामुळे एक मोठा ग्राहकवर्ग याकडे सहज आकर्षित झाला आहे.
अर्थात, इतर लोकप्रिय गोष्टींप्रमाणेच याचेही डुप्लिकेट आणि नकली प्रकार बाजारात आले आहेत. पण ओरिजिनल लाबुबूची क्रेझ आणि त्याचा मूळ चाहतावर्ग आजही कायम आहे.
आतापर्यंतचा इतिहास पाहता जेवढ्या वेगाने हे फॅड जगभर पोहोचले आहे तेवढ्याच वेगाने ओसरेलही. पण किमान आता तरी... या लाबुबूची जादू लोकांवर अशीच राहील असं दिसतंय!
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !