चौदा वर्षांचे व्हिडिओ आणि एकच ध्येय — मातृभाषेतून शिकवायचं!

चौदा वर्षांचे व्हिडिओ आणि एकच ध्येय — मातृभाषेतून शिकवायचं!

नेटभेटच्या युट्युब चॅनेल मध्ये पहिला व्हिडिओ पोस्ट केला त्याला चौदा वर्षे पूर्ण झाली. (युट्युबने आठवण करून दिली म्हणून लक्षात आले!)

चौदा वर्षे ....खूप मोठा काळ आहे. चौदा वर्षांत १३१२ व्हिडिओ म्हणजे साधारण वर्षाला शंभर व्हिडिओ मी बनविले...म्हणजे सरासरी दर ३-४ दिवसात एक व्हिडिओ मी बनवला. (सर्वच व्हिडिओ आता युट्युबवर उपलब्ध नाहीत. बरेचसे व्हिडिओ युट्युबवरून काढून नेटभेट लर्निंग पोर्टल मध्ये अपलोड केले आहेत.)

जरी पहिला व्हिडिओ २०११ ला बनविला होता तरी खऱ्या अर्थाने युट्युबमध्ये गंभीरपणे काम करायला सुरुवात केली २०१६ ला. तोपर्यंत मी माझा चेहरा व्हिडिओ मध्ये दिसणार नाही असेच व्हिडिओ बनवत होतो. ते सगळे व्हिडिओ म्हणजे मी केलेले प्रयोग होते.

२०१५ ला पूर्णवेळ व्यवसाय सुरु केला त्यानंतर एक वर्षाने युट्युब मध्ये पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये मी स्वतः दिसलो. २०११ साली एक गुगलचे invite आले होते. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी काही रिजनल कन्टेन्ट तयार करणाऱ्या ब्लॉगर्सना युट्युब कडे वाळविण्यासाठी आमंत्रित केले होते. गुगलचे चकाचक ऑफिस, त्यांनी केलेले अत्यंत प्रोफेशनल प्रेझेन्टेशन आणि ज्या युट्युबकडे आपण टाईमपास म्हणून बघतो त्यावर पडद्यामागे किती काम चालतं ते पाहून मी भारावून गेलो होतो.

अर्थात तेव्हा पूर्णवेळ नोकरी मुळे मी काही फारसा वेळ देऊ शकलो नव्हतो. आणि मला स्वतःला कधी युट्युबर व्हावेसे वाटलेही नाही. लिखाणात जो आनंद मिळतो तो आजही व्हिडिओ मध्ये मिळत नाही. पण भविष्याचा मीडिया व्हिडिओच असणार आहे हे कळले होते म्हणून अधून मधून व्हिडिओ बनवत राहिलो.

त्यामागे जाहिरातीतून पैसे कमावणे हा माझा उद्देश नव्हता. माझ्यासाठी युट्युब एक प्रयोगशाळा होती. वेगवगेळ्या फॉरमॅट मध्ये व्हिडिओ बनवायचे (स्क्रिनकास्टिंग, ऍनिमेशन, स्लाईडशो, टॉल्किंग हेड, live streaming असे अनेक प्रकारचे व्हिडिओ मी बनविले.) . त्यासाठी लागणारं तंत्र शिकून घ्यायचं हा ध्यास होता. या प्रयत्नात मी एवढं शिकलो की पुढे व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ SEO, युट्युब मार्केटिंग हे विषय शिकवायलाही लागलो.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी

https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2

येथे क्लिक करा.

================

सुरुवातीला तर साधा दोन मिनिटांचा व्हिडिओ बनायला पण दोन दिवस जायचे. मोबाईल कॅमेऱ्यावर रेकॉर्ड करायचो. बऱ्याच वेळा असं झालंय की मी पूर्ण व्हिडिओ शूट केला पण व्हिडिओ रेकॉर्डिंगचं बटणच ऑन करायला विसरून गेलो. कित्येकदा व्हिडिओ रेकॉर्ड झाला पण ऑडिओ झाला नाही. बोलताना अडखळणं आणि मग पुन्हा रेकॉर्डिंग सुरु करणं हे तर नित्याचंच झालं होतं. या चुकांमुळे मी स्वतःलाच असंख्य शिव्या दिल्या असतील. (त्यापैकी काही रेकॉर्ड झाल्या ज्या एडिटिंग करताना कळल्या !) . पण मी ही पूर्ण प्रोसेस एन्जॉय करत होतो.

मी व्हिडिओ साठी विषयही वेगवगेळे हाताळले. मॅनेजमेंट, स्टार्टअप, प्रॉडक्टिव्हिटी, टेक्नलॉजी, मोटिव्हेशनल, पर्सनल फायनान्स , स्टॉक मार्केट अशा अनेक विषयांची सरमिसळ चॅनेलवर झाली.

एका विषयवार फोकस नव्हता म्हणून कदाचित माझे स्बस्क्रायबर्स फारसे वाढले नाहीत. सध्या ३ लाख चाळीस हजार आहेत. ठीकठाक आकडा आहे. मात्र मी यूट्यूबच्या माध्यमातून १ लाखाहून जास्त ग्राहक आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग पोर्टल साठी आणू शकलो ही जमेची बाजू !

एकदा मी प्रयोग म्हणून आमचा एक कोर्स ज्याची किंमत आठ हजार रुपये होती त्यातील सर्वच्या सर्व व्हिडिओ युट्युब मध्ये विनामूल्य अपलोड केले. मला वाटलं लोकांना मदत होईल. पण प्रत्यक्षात त्या व्हिडिओना जास्त प्रतिसाद आला नाही. ते व्हिडिओ मोठे होते (३० मिनिटे ते ३ तास) हे एक प्रमुख कारण. त्यावर बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्या की छोटे व्हिडिओ बनवा. एवढे मोठे व्हिडिओ बघायला वेळ नाही. आणि दुसरं मुख्य कारण होतं की हे व्हिडिओ त्यांच्यासमोर आपोआप आले होते. त्यांना हवे होते असे नाही. विनासायास, विनामूल्य एखादी गोष्ट मिळाली की त्याची किमंत राहत नाही. मग मी ते व्हिडिओ युट्युब मधून काढले आणि पुन्हा कोर्स स्वरूपात विक्री सुरु केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कारण ज्यांनी तो कोर्स विकत घेतला त्यांना तो विषय शिकण्याची गरज वाटली होती, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते, पैसे मोजले होते.

या चौदा वर्षात युट्युबचे अल्गोरिदम खूपच बदलले. आता तर लॉन्ग फॉर्म कन्टेन्ट मागे पडून शॉर्ट्सचा जमाना आला आहे. शॉर्ट्स /रील्स हा प्रकार काही मला जमला नाही. आवडलाही नाही. अर्थात ते करण्याचा प्रयत्नही मी केला. त्यातला खाचाखोचाही शिकलो पण अमलात नाही आणल्या.

आता ठरवलंय .. आपल्याला आवडतं तसं लॉन्ग फॉर्म कन्टेन्ट बनवायचं. फार लोकांनी नाही बघितलं तरी चालेल. पण जो बघेल त्याला विषय पूर्णपणे कळला पाहिजे. अल्गोरिदम च्या मागे धावण्यात अर्थ नाही. जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त विषय सोप्या मराठीतून शिकविता यावेत हा मूळ उद्देश होता. त्या उद्देशाशी प्रामाणिक राहून जे करता येईल ते करण्याचा यापुढे प्रयत्न करत राहीन.

युट्युबमध्ये Netbhet हा चॅनेल शोधा. एखादा व्हिडिओ पहा. आवडला तर चॅनेल सबस्क्राईब करा.

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

What would you like to learn today?