समस्या नव्हे, दृष्टीकोन बदला

एका कंपनीमध्ये तेथील कर्मचारी लिफ्ट खूप हळू चालत असल्याची तक्रार करत होते. मजल्यांवरून ये-जा करण्यासाठी खूप वेळ लागत होता, ज्यामुळे लोकांचा कामातील वेळ वाया जात होता आणि त्यांची चिडचिड होत होती. लोक लिफ्ट लवकर चालेल या आशेने बटणे वारंवार दाबत असत.
(मोबाईल फोन येण्याच्या आधीची गोष्ट!)
कंपनी व्यवस्थापनाने या समस्येवर तोडगा काढायचे ठरवले. त्यांनी लिफ्ट बनवणाऱ्या कंपनीला बोलावून त्यांचा सल्ला मागितला. तज्ञांनी लिफ्टचे सर्वेक्षण केले आणि एक अत्यंत महागडा उपाय सुचवला. त्यांनी सांगितले की, "आम्ही अधिक मजबूत केबल्स, एक अधिक शक्तिशाली मोटर आणि अत्याधुनिक प्रणाली बसवून ही समस्या कायमची सोडवू शकतो." हा उपाय लिफ्टला अधिक वेगवान बनवणार होता.
व्यवस्थापन या महागड्या उपायावर विचार करत असतानाच, एका कनिष्ठ अधिकाऱ्याने एक साधा पण वेगळा प्रश्न विचारला: "कर्मचाऱ्यांचा जेवणाच्या वेळी किंवा कॉफी पिताना कितीतरी जास्त वेळ वाया जातो मात्र तेव्हा कोणी तक्रार करत नाही. मग लिफ्ट मध्ये वेळ जातो त्याचीच एवढी तक्रार का होत असेल बरे?"
त्याच्या लक्षात आले की इतर वेळी कर्मचारी खात असतात किंवा बोलत असतात... म्हणजे गुंतलेले (engaged)असतात. मात्र लिफ्टमध्ये ते engaged नसतात, त्यामुळे वेळ गेलेला जाणवतो.
https://www.facebook.com/100044560684437/posts/pfbid024atM4xaVyetSdSYkQck12d3W7YS9eyeAVV76MHXprbeYfkPNN4cTr7e4L3EwsACsl/
त्याला एक उपाय सुचला - जर आपण लिफ्टमध्ये जमिनीपासून छतापर्यंत मोठे आरसे लावले तर काय होईल? जेणेकरून मजल्यांवरून वर-खाली जाताना कर्मचारी स्वतःला पाहू शकतील — आपले रूप न्याहाळू शकतील, केस किंवा कपडे व्यवस्थित करू शकतील?"
हा उपाय अत्यंत कमी खर्चाचा होता, पण त्यामुळे मूळ समस्या सुटेल का? लिफ्टचा वेग तर तेवढाच राहणार होता. आश्चर्य म्हणजे, या उपायाने केवळ समस्येचे निराकरण झाले नाही, तर तक्रारी पूर्णपणे थांबल्या.
एकदा लिफ्टमध्ये आरसे लावले गेल्यानंतर कोणीही तक्रार केली नाही. लिफ्टचा वेग पूर्वीइतकाच होता, पण लोकांचा अनुभव पूर्णपणे बदलला होता. आता लिफ्टमध्ये शिरल्यावर लोकांचे लक्ष 'किती वेळ लागतोय' या विचारावरून हटून स्वतःच्या प्रतिमेवर केंद्रित झाले. लोक स्वतःला आरशात पाहू लागले, आपले कपडे, केस व्यवस्थित करू लागले. त्यांना त्यांच्या अधीरतेवर आणि कंटाळ्यावर मात करण्यासाठी काहीतरी करण्यासारखे मिळाले. त्यांचे मन दुसऱ्या गोष्टीत गुंतल्यामुळे वेळेचा विचार मागे पडला. समस्या लिफ्टच्या वेगात नव्हतीच, तर लोकांच्या मानसिक अवस्थेत होती. समस्या 'वेळेची' नव्हती, तर 'वेळेच्या जाणिवेची' होती.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================

कंपनीने लक्षणांवर (symptoms) उपचार करण्याऐवजी मूळ कारणावर (root cause) काम केले. आपणही आपल्या जीवनातील समस्यांचे विश्लेषण करताना हेच करायला हवे. जर तुम्हाला कामाचा ताण जाणवत असेल, तर खरी समस्या जास्त काम आहे की तुमचे वेळेचे नियोजन (Time Management) चुकतेय? जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा राग येत असेल, तर समस्या त्या व्यक्तीच्या वागण्यात आहे की तुमच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षांमध्ये? जेव्हा आपण खऱ्या समस्येच्या मुळाशी जातो, तेव्हाच आपल्याला आरशासारखा साधा पण प्रभावी उपाय सापडतो.
आपल्या आयुष्यातही अनेक "हळू चालणाऱ्या लिफ्ट्स" असतात. जसे की, करिअरमध्ये अपेक्षित प्रगती न मिळणे, नातेसंबंधात सुधारणा होण्यासाठी वेळ लागणे, किंवा एखादे ध्येय साध्य होण्यास विलंब लागणे. या परिस्थितीत आपण अनेकदा बाह्य परिस्थितीला दोष देतो. "माझा बॉस चांगला नाही," "नशीब साथ देत नाही," "परिस्थितीच बिकट आहे" अशा तक्रारी करतो. पण या लिफ्टच्या गोष्टीप्रमाणे, खरी समस्या अनेकदा बाह्य जगात नसते, तर आपल्या दृष्टिकोनात असते. आपण समस्येकडे कसे पाहतो (Power Of Perspective) यावर सर्वकाही अवलंबून असते. जर आपण आपला दृष्टिकोन बदलला, आपले लक्ष निराशेच्या भावनेवरून हटवून काहीतरी सकारात्मक किंवा विधायक गोष्टीवर केंद्रित केले, तर तोच 'वेळ' कमी त्रासदायक वाटू लागतो.
म्हणून, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल की आयुष्याची लिफ्ट खूप हळू चालली आहे, तेव्हा तक्रार करण्याऐवजी किंवा अधीर होण्याऐवजी, क्षणभर थांबा आणि स्वतःच्या आत डोकावून पाहा. कदाचित तुम्हाला फक्त एका 'वैचारिक आरशाची' गरज असेल, जो तुम्हाला दाखवून देईल की खरी शक्ती परिस्थिती बदलण्यात नाही, तर दृष्टिकोन बदलण्यात आहे !


सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !