AI वापरून आपल्याला प्राण्यांसोबत बोलता येईल का ?

लहानपणी टारझन पुस्तक मी कितीतरी वेळा वाचलं असेल. एप्सच्या कळपात वाढलेला टारझन, त्यांच्याशी संवाद साधणारा, सर्व प्राण्यांसोबत प्राण्यांसारखा राहणारा माणूस ही संकल्पनाच मला भारी आवडायची. पुढे टीव्ही वर मोगलीला पाहिले आणि माणसासारख्या बोलणाऱ्या प्राण्यांच्या दुनियेत मी कितीतरी काळ रमलो होतो. हे प्राणी खरंच बोलले असते तर? काय बोलले असते, त्यांची भाषा आपल्याला कळली तर, त्यांच्याशी एखाद्या मित्रासारखं बोलता आलं तर?

माणसाला हे प्रश्न पडतात आणि तो उत्तर शोधतोच.....नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याला प्राण्यांशी बोलता येईल का? नुसतं आपण एकटेच बोलणार असे नव्हे तर प्राणी उत्तर देऊ शकतील का?....नेटभेट च्या प्रिय वाचकमित्रहो, पाहूया या लेखात !

2022 साल आहे आणि तंत्रज्ञानाने आपण चहू बाजूनी घेरलो गेलो आहोत. पण केवळ मोबाईल आणि कम्प्युटर नव्हे तर आपण अनेक intelligent devices च्या सतत सानिध्यात आहोत. स्वयंचलित कार्स, अलेक्सा, सिरी, स्मार्ट वॉचेस किंवा आपल्या फोनवरील जाहिराती सर्व काही Artifical Intelleigence च्या मदतीने चालत आहे. स्वतःच शिकत जाणाऱ्या आणि स्वतःमध्ये आपोआपच नव्या सुधारणा करत जाणाऱ्या या Artifical Intelleigent Smart मशीन्स आहेत.
स्मार्ट वॉचेस आपल्या तब्येतीवर लक्ष ठेवतात, हलचाकींवार लक्ष ठेवतात, रक्तातील साखर मोजतात, स्मार्ट स्पीकर्स दिवसभर आपल्या संपर्कात असतात, आपल्याशी बोलतात, मूड ओळखतात, आपल्यासाठी गाणी वाजवतात, AC चालू करतात. रोबोट्स जेवण बनवत आहेत, रेस्टॉरंट चालवत आहेत, वृद्धांची काळजी घेणारे, घराभोवती पहारा देणारे रोबोट्स आहेत, अगदी एअरपोर्टवर आपले सामान घेऊन जातात, नेटफ्लिक्स मध्ये काय पाहायचं हे AI सांगतं आणि AI लाच आपण युट्युबवर काय पाहणार आहोत ते देखील माहीत असतं.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) केवळ स्वतः विचारच करत नाही तर सतत शिकून (Machine Learning) स्वतःच्या इंटेलिजन्स मध्ये सुधारणा देखील करत राहते.
जवळपास सर्वच क्षेत्रात AI चा वापर सुरू झालाय आणि दिवसांगणिक वाढतोय. आपल्याला कळायच्या आधी येत्या काही वर्षांत आपल्यासाठी बहुतांश निर्णय AI घेणार आहे. आणि हेच AI तंत्रज्ञान आपल्याला प्राण्यांची भाषा समजून त्यांच्यासोबत संवाद साधायला देखील मदत करणार आहे.

प्राणी संवाद साधतात हे तर आपल्याला माहीत आहेच. त्यांचे आवाज असतात पण शब्द नसतात. ते आवाजातून, शारीरिक हालचालीतून संवाद साधतात पण त्यांना चर्चा करण्यासाठी, एकमेकाला समजण्यासाठी भाषा असते का ते आपल्याला अजून माहीत नाही. काही सामाजिक प्राणी बेसिक पेक्षा जास्त काहीतरी बोलतात, संवाद साधतात. उदाहरणार्थ मुंग्या, मधमाश्या, हत्ती, डॉल्फिन्स.

कॅलिफोर्निया मधील ESP (Earth Species Project) या संस्थेने या क्षेत्रात बरंच काम केलं आहे. 2017 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या मते आपली पिढी या जगातून जायच्या आधीच आपण प्राण्यांसोबत बोलणे (त्यांच्या भाषेत किंवा ते आपल्या भाषेत) शक्य होणार आहे.


=====================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
=====================

कोणत्या परिस्थितीत प्राणी कोणते आवाज काढतात त्याचे निरीक्षण करून त्यावरून काय बोलत आहेत असा निष्कर्ष काढणे या तत्वावर आपण आधीपासूनच काम करत होतो. आता मशीन लर्निंग मुळे हेच काम वेगाने होईल. प्राण्यांना लावलेल्या सेन्सर्स चा डेटा मशिन लर्निंग मध्ये फीड होत आहे, त्याचा अर्थ लावला जात आहे, त्यातील पॅटर्न शोधले जात आहेत.

यामध्ये प्राण्यांना वेगवेगळ्या situations दिल्या जातात, तसेच विविध बटण किंवा touch screen च्या साहाय्याने संवाद साधण्याची सोपी उपकरणे दिली जातात. या बेसिक संवादातून मशिन लर्निंग काही पॅटर्न बनवते आणि त्यातून शिकत जाऊन आणखी deep pattern बनवते.अशाप्रकारे हळूहळू त्यांची पूर्ण संवादशैलीच मशीनला आत्मसात करता येईल.
तसेच अनेक प्राणी ग्रुपमध्ये बोलतात (उदा. मेंढ्या, कावळे) ,त्याच्या एकत्रित आवाजातून नेमके कोणता प्राणी काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे हे शोधण्याचा प्रयत्न AI करत आहे.
हे सर्व तंत्रज्ञान बाल्यावस्थेत आहे आणि अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण मानवाने आतापर्यंत केलेली घौड दौड पाहता, प्राण्यांशी संवाद ही अशक्यप्राय गोष्ट नक्कीच नाही.

मनुष्य-प्राणी संवादाचा दुसरा मार्ग म्हणजे प्राण्यांची भाषा समजून घेण्यापेक्षा त्यांनाच आपली भाषा शिकवली तर? नासाने स्पेस मध्ये पाठविलेल्या पहिल्या चिंपांझी ला sign language शिकवायचा प्रयत्न केला होता. तिला तेव्हा 200 signs वापरून बोलता येत होते. हाच विचार पुढे नेत AI आणि EEG हे तंत्रज्ञान वापरून प्रयोग चालू आहेत. EEG हेडसेट प्राण्याला बसवून त्याद्वारे प्राण्यांच्या मेंदूतील लहरी आणि त्यामधील बदल रेकॉर्ड केले जातात आणि AI ला पुरविले जातात. त्या वेव्हज चा अर्थ प्राण्यांच्या मेंदू मध्ये काय आहे हे अजून आपल्याला माहीत नाही. पण हळूहळू याचा उलगडा होत जाईल. AI जेवढे dots connect करेल तेवढे हे कोडे सोपे होत जाईल. आणि एक दिवस आपण आपल्या आवडत्या प्राण्यांशी बोलू शकू. किंवा त्यांना काय बोलायचे आहे ते समजू शकू.

खरा प्रश्न तिथून पुढे निर्माण होतो. आपण प्राण्यांना समजू लागलो तर माणसाच्या वागण्यात कसे बदल होतील? या पृथ्वीतलावर मनुष्यजात संवाद साधणारी एकमेव जमात आहे, हा एकटेपणा दूर झाल्यावर आपण कसा प्रतिसाद देऊ? मला या प्राणिसंग्रहालयातून बाहेर काढा हे जेव्हा वाघाच्या तोंडून ऐकू , किंवा मानेवरचं जोखड टाकून पळून जावसं वाटतं हे शर्यतीतला एक बैल दुसऱ्या बैलाला सांगताना ऐकू तेव्हा आपण काय करणार? असे असंख्य प्रश्न उपस्थित होतील....आणि नवे प्रश्न ज्याला आवडतात अशी मनुष्यजमात नवी उत्तरे शोधू लागेल.

मंडळी नेटभेटच्या वाचकांसाठी आम्ही असेच अनेक उपयुक्त लेख, विडिओ मराठीतून आणत असतो. तेही विनामूल्य ! तुम्ही देखील हे ज्ञान आपल्याकडे न ठेवता पुढे पाठवा... !

धन्यवाद,

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !