There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
आजच्या काळात आपण स्मार्टफोनशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही, पण हाच फोन आता एका नवीन आणि कदाचित चिंताजनक वळणावर आपल्याला घेऊन जात आहे.
पुढे काय येऊ घातलंय हे एका उदाहरणावरून पाहूया -
समजा तुम्हाला मित्रांसोबत रात्रीच्या जेवणाचा प्लॅन करायचा आहे. यासाठी तुम्ही व्हाट्सअँप वर मित्रांसोबत बोलून वेळ आणि भेटायची जागा ठरवणार, त्यानंतर गुगल किंवा झोमॅटोवर चांगले रेस्टॉरंट शोधणार, तिथली जागा राखून ठेवणार आणि सर्व मित्रांना कुठे यायचे आहे ते कळवणार. याकामासाठी व्हाट्सअँप, गुगल सर्च, गुगल मॅप्स, बुकिंग अँप, पेमेंट अँप असे चार - पाच एकत्र वापरावे लागणार.
यात आपला बराच वेळ आणि ऊर्जा खर्च होते. मात्र, गुगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्टसारख्या जागतिक कंपन्या आता अशा जगाची निर्मिती करत आहेत जिथे तुम्हाला हे फक्त फोनला सांगायचे आहे. "मी उद्या माझ्या या मित्रांसोबत रात्री जेवण्याचा प्लॅन करतोय. आमच्या आवडीचे चांगले रेस्टॉरंट बुक कर." एवढे फोनला सांगायचे आहे. फोनला स्पर्शही करावा लागणार नाही. तुम्ही फक्त एक आज्ञा दिली की तुमचा फोन स्वतःहून मेसेजेस वाचेल, रेस्टॉरंट बुक करेल आणि तुम्हाला व तुमच्या मित्रांना माहिती देईल. यालाच 'एजेंटीक एआय' (Agentic AI) असे म्हटले जात असून, हे केवळ तुमच्या प्रश्नांची उत्तरे देत नाही तर तुमच्या वतीने प्रत्यक्ष कृती देखील करते.
सध्या आपण जे चॅटबॉट्स वापरतो ते केवळ 'प्रतिक्रियाशील' (Reactive) स्वरूपाचे आहेत. तुम्ही काही विचारले की ते उत्तर देतात आणि काम झाले की ते सर्व विसरून जातात. ते एका मर्यादित चौकटीत काम करतात. मात्र, 'एजेंटीक एआय' या चौकटीबाहेर पडते. याला स्वतःची 'एजन्सी' किंवा स्वायत्तता असते. जेव्हा तुम्ही याला एखादे काम देता, तेव्हा ते स्वतःहून आवश्यक पावले उचलते, उपलब्ध साधनांचा वापर करते, स्वतःच्या चुका तपासते आणि काम पूर्ण होईपर्यंत प्रयत्न सुरू ठेवते. यात माणसाचा हस्तक्षेप अतिशय कमी असतो.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://chat.whatsapp.com/IrJLqgnVxWZBgK459jDqpM
येथे क्लिक करा.
================
टेक उद्योगातील दिग्गज जसे की सत्या नाडेला आणि जेन्सन हुआंग यांच्या मते, हे तंत्रज्ञान भविष्यात सॉफ्टवेअर वापरण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकेल आणि अनेक पारंपारिक व्यवसाय मोडीत काढेल.
या तंत्रज्ञानावर होणारा खर्च पाहून कोणाचेही डोळे विस्फारतील. २०२६ या एकाच वर्षात जगातील मोठ्या टेक कंपन्यांनी एआय पायाभूत सुविधांवर तब्बल ६५० अब्ज डॉलर्स खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा आकडा इतका प्रचंड आहे की तो स्वीडनसारख्या प्रगत देशाच्या संपूर्ण वार्षिक उत्पन्न इतका आहे (GDP). भारताच्या संपूर्ण आयटी क्षेत्राचा, ज्यामध्ये टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रोसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश होतो, एकूण वार्षिक महसूल सुमारे २८० अब्ज डॉलर्स आहे. याचाच अर्थ, अमेरिकन टेक कंपन्या केवळ एआयच्या एका कल्पनेसाठी भारताच्या संपूर्ण आयटी उद्योगाच्या दुप्पट रक्कम खर्च करत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, हे तंत्रज्ञान केवळ एक तात्पुरती लाट नसून उद्योग जगातील एक सर्वात मोठे पाऊल आहे.
हे सर्व ऐकायला जरी सोयीचे वाटत असले, तरी त्यामागील धोके अत्यंत गंभीर आहेत. सिग्नल ॲपच्या अध्यक्षा मेरेडिथ व्हिटाकर यांनी याला 'आपला मेंदू बरणीत ठेवणे' (Putting your brain in a jar) असे म्हटले आहे. याचे कारण असे की, हे एआय एजंट प्रभावीपणे काम करण्यासाठी तुमच्या खाजगी आयुष्यात पूर्णपणे प्रवेश करतात. एखादे तिकीट बुक करण्यासाठी या एजंटला तुमचे मेसेजेस, तुमचे लोकेशन, तुमचे कॅलेंडर आणि अगदी तुमच्या बँक कार्डचे डिटेल्स देणे आवश्यक असेल. याला तांत्रिक भाषेत 'रूट परमिशन' म्हणतात, जी सहसा फक्त फोनच्या मुख्य ऑपरेटिंग सिस्टमकडे असते. याचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात संवेदनशील माहिती अशा यंत्रणेला देत आहात जी तुमच्या नियंत्रणात नसून एका परक्या सर्व्हरवर चालते.
टेक कंपन्या हे तंत्रज्ञान लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची घाई करत आहेत. याचे उत्तर त्यांच्यावरील आर्थिक दडपणात दडलेले आहे. सध्याच्या चॅटबॉट्सचा सुरुवातीचा उत्साह आता ओसरू लागला आहे. मॅकिन्सेच्या संशोधनानुसार, ८०% कंपन्यांना एआय वापरूनही त्यांच्या नफ्यात कोणतीही मोठी वाढ दिसलेली नाही. त्यामुळे आता कंपन्या अशा एआयवर भर देत आहेत जे केवळ मदत करणार नाही, तर माणसाचे कामच स्वतः करेल. एनव्हिडियाच्या मते, जगातील अब्जावधी कर्मचारी जे माहितीवर आधारित काम करतात, त्यांच्या कामाचे ऑटोमेशन करणे हे ट्रिलियन डॉलर्सचे मार्केट आहे. हे मार्केट काबीज करण्यासाठीच ही जीवघेणी स्पर्धा आहे.
सेल्सफोर्ससारख्या कंपन्यांनी आधीच हजारो कर्मचाऱ्यांच्या जागी एआय एजंट्स नेमले आहेत, जे ग्राहकांच्या अर्ध्याहून अधिक समस्या स्वतःहून सोडवत आहेत.
यंत्रयुगाच्या सुरुवातीला यूरोपीय देशांनी तंत्रज्ञानात जी सरशी मिळविली त्यामुळे त्यांना संपूर्ण जगावर राज्य करता आले. आता पुन्हा आपण अशाच एका टप्प्यावर आलो आहोत. सध्यातरी अमेरिका आणि चीन असे दोन देश AI तंत्रज्ञानात आघाडीवर आहेत. जसजशी इतर देशांच्या AI प्रगतीमधील दरी वाढत जाईल तसतसे हे दोन देश संपूर्ण जगाला विळखा घालू लागतील. याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतील याची कल्पनाही करणे आपल्याला शक्य नाही.
सरतेशेवटी, एजेंटीक एआय ही एक दुधारी तलवार आहे. एका बाजूला ते आपली उत्पादकता प्रचंड वाढवू शकते, तर दुसऱ्या बाजूला ते पाळत ठेवण्याचे (Surveillance) एक शक्तिशाली साधन बनू शकते. जेव्हा एखादा एआय एजंट मोठी चूक करेल किंवा तुमच्या खाजगी माहितीचा दुरुपयोग होईल, तेव्हा त्याची जबाबदारी कोणाची असेल, याचे उत्तर अजून कोणाकडेही नाही. आर्थिक नफ्यासाठी कंपन्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून हे तंत्रज्ञान आपल्यावर लादत आहेत. हे तंत्रज्ञान म्हणजे कामाचे उज्ज्वल भविष्य आहे की गोपनीयतेचा अंत, हे आपण या तंत्रज्ञानाला किती मोकळीक देतो यावर अवलंबून असेल. यासाठी Data Privacy बद्दल सजग राहणे हाच सध्या आपल्या हातातील एकमेव उपाय आहे.
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !