There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
विश्वास विरुद्ध विज्ञान — कोण खरोखर विचार करतो?
इसवी सन पूर्व ४८० मध्ये, पर्शियाचा राजा झेर्क्सिसने ग्रीसवर आक्रमण करण्याची तयारी केली. त्याच्याकडे पाच लाख सैनिकांचा मोठा फौजफाटा होता, ज्याला बोस्पोरस सामुद्रधुनीतून (दोन समुद्रांना जोडणारा निमुळता जलमार्ग) पलीकडे न्यायचे होते. त्यासाठी त्याने आपल्या अभियंत्यांकडून एक प्रचंड, एक किलोमीटर लांबीचा पूल बांधून घेतला.
रात्रीच्या वेळी अचानक एक भयंकर वादळ आले आणि समुद्राने तो पूल पूर्णपणे नष्ट केला. झेर्क्सिसला इतका राग आला की त्याने बोस्पोरसच्या समुद्रधुनीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या सर्वात शक्तिशाली योद्ध्यांना बोलावले आणि त्यांना ३०० वेळा समुद्राला चाबकाने फटके मारायला लावले. त्यानंतर त्यांनी लाल गरम सळ्या समुद्रात खुपसल्या. आणि मग पायात घालायच्या बेड्या आणि साखळदंड त्यात फेकले. हे सर्व करताना ते सतत घोष करत होते:
“हे कटू समुद्रा, तू तुझ्या स्वामीचे नुकसान केले आहेस, म्हणून तो तुला ही शिक्षा देत आहे. न्यायाच्या दृष्टिकोनातून तुला कोणतेही अर्पण किंवा बलिदान दिले जाणार नाही, कारण तू केवळ एक गढूळ आणि खारट जलमार्ग आहेस.”
ही शिक्षा ऐकून त्या राजा आणि सैनिकांवर हसायला आलं ना ? आता हा शुद्ध मूर्खपणा वाटत असला तरी त्तेव्हा अडीच हजार वर्षांपूर्वी, हे सर्व पूर्णपणे तर्कसंगत वाटत होते. झेर्क्सिस हा जगाने पाहिलेला सर्वात शक्तिशाली शासक होता, तो देवच आहे असा त्यांना विश्वास होता. त्याचे पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण होते. समुद्राने त्याचा आदेश मानला नव्हता आणि म्हणून त्याला धडा शिकवणे आवश्यक होते—या दृष्टिकोनातून ते सर्व तर्कशुद्ध होते.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://chat.whatsapp.com/Iz08IE1R6si24kxsY6gUdm
येथे क्लिक करा.
================
त्यावेळची पद्धत अशीच होती. राजा सर्वशक्तिमान असतो आणि त्याच्या आदेशावर कोणीही प्रश्नचिन्ह उभे करू शकत नाही हा समाजमान्य नियम होता. लोकांनी उत्तर स्वीकारले होते, प्रश्न विचारायचा असतो हेच मुळात ठाऊक नव्हते. आणि तेव्हा कोणी प्रश्न विचारले असतेच तर शिरच्छेद नक्की होता.
संपूर्ण इतिहासात, जगभरात सगळीकडेच अशा अंधश्रद्धांनी प्रत्येक गोष्टीवर राज्य केले. जेव्हा आपण "विश्वास" ठेवतो तेव्हा मिळालेलं /आधीच अस्तित्वात असलेलं उत्तर स्वीकारतो. तेव्हा तर विज्ञान हा शब्द पण अस्तित्वात नव्हता.
जेव्हा लोकांनी गोष्टींच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली, तेव्हा वैज्ञानिक विचारांचा उदय झाला.
वैज्ञानिक पद्धतीचा सर्वात प्रसिद्ध पुरस्कर्ता फ्रान्सिस बेकन होता. त्याने प्रयोगांना सर्वात जास्त महत्त्व दिले. केवळ इतरांनी स्वीकारले आहे म्हणून कोणत्याही गोष्टीचा डोळे झाकून स्वीकार करू नका. त्यावर प्रश्न विचारा आणि, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नवीन ज्ञान तपासण्यासाठी आणि उघड करण्यासाठी प्रयोग वापरा. उत्तराने नाही, तर प्रश्नाने सुरुवात करा.
याचे दोन मूलभूत नियम होते: अनुभवाधिष्ठितता (Empiricism) आणि संशयवाद (Scepticism).
अनुभवाधिष्ठितता: आपण जे प्रत्यक्षात निरीक्षण केले आणि अनुभवले तेच स्वीकारणे.
संशयवाद: सिद्ध होईपर्यंत प्रत्येक गोष्टीवर शंका घेणे.
आज आपण वैज्ञानिक पद्धतीला फार महत्त्व देतो. (देतोय ना ?). विज्ञान प्रश्नांवर आधारित आहे, तर Religion प्रश्न न विचारण्यावर आधारित आहे. विज्ञान म्हणतं मी उत्तर शोधत आहे, तर Religion म्हणतं माझ्याकडे सर्व उत्तरे आहेत.
हजारो वर्षांपूर्वीचे, झेर्क्सिस आणि त्याच्या अनुयायांचे वागणे किती मूर्खपणाचे होते यावर आपण हसतो. हसतो कारण आपल्याला वाटतं की आपण कधीही तसे वागणार नाही. पण आपण नेमके तसेच वागतो: समाजाकडून स्वीकारले जाण्याची इच्छा एवढी प्रबळ असते की आपण सध्याचे प्रचलित विचार तसेच्या तसे स्वीकारतो. खूप जास्त प्रश्न विचारले तर आपल्याला स्वीकारले जाणार नाही, अशी भीती वाटते. म्हणून आपण गटाचे अनुसरण करतो. आपले जीवन प्रश्नातून नाही, तर उत्तरातून जगतो.
आपण झेर्क्सिसच्या अनुयायांसारखेच वागतो....फक्त आपल्यावरही काहीशे वर्षांनंतर लोक हसणार आहेत याची कल्पनाही आपल्या मनाला शिवलेली नसते !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !