नैतिकतेने बांधलेला अणुऊर्जा प्रकल्प

नैतिकतेने बांधलेला अणुऊर्जा प्रकल्प

२०११ मध्ये जपानमध्ये एक महाविनाशक त्सुनामी आली. या आपत्तीत जवळपास २०,००० लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे ४,५०,००० लोक बेघर झाले. या त्सुनामीने सर्वांत मोठा धोका निर्माण केला तो म्हणजे “फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पाचा.”

त्सुनामीमुळे त्या प्रकल्पाचे प्रचंड नुकसान झाले आणि अणुगळतीचा धोका निर्माण झाला. रिअॅक्टर बिल्डिंग्जना गंभीर इजा झाली, हायड्रोजन स्फोट झाले, रेडिएशन लीक झाले आणि सुमारे १,५०,००० लोकांना स्थलांतरित करावे लागले.

आधी ९.० मॅग्निट्युडचा भूकंप झाला आणि त्यानंतर ही त्सुनामी आली — ही दुहेरी नैसर्गिक आपत्ती होती. या घटनेनंतर संपूर्ण जगाला फुकुशिमा बद्दल माहिती झाली. पण त्याच वेळी, फुकुशिमापासून सुमारे ६० मैल अंतरावर “ओनागावा अणुऊर्जा प्रकल्प” होता.

महत्त्वाचे म्हणजे हा प्रकल्प भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून आणखी जवळ होता. तरीही त्या प्रकल्पाचे काहीच नुकसान झाले नाही. उलट, त्सुनामीमुळे बेघर झालेल्या शेकडो लोकांना आसरा देण्याचे कार्य ह्याच प्रकल्पाने केले.

हा प्रकल्प तोहोकू इलेक्ट्रिक कंपनीचा होता आणि त्यामागे एक द्रष्टे व्यक्तिमत्त्व उभे होते — यानोसुके हिराई, त्या वेळीचे कंपनीचे उपाध्यक्ष.

हिराई हे सिव्हिल इंजिनीअर होते. त्यांचे मत असे होते की —

“कोणताही प्रकल्प बांधणे एवढ्यावरच काम संपत नाही; त्याचे भविष्यातील परिणाम आणि जबाबदारीही आपलीच असते.”

बालपणी त्यांनी एका मंदिराला भेट दिली होती. ते मंदिर हजारो वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीतील मृतांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधले गेले होते. कदाचित त्याच क्षणी समुद्रकिनाऱ्याजवळच्या धोका जाणण्याची जाणीव त्यांना झाली असावी.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी

https://chat.whatsapp.com/Ip4ab5E7gGU52GQS3uC7pq

येथे क्लिक करा.

================

ओनागावा प्रकल्पासाठी सुरुवातीला जी जागा ठरवली होती, ती समुद्राजवळ होती. पण हिराई यांनी ती जागा बदलून समुद्रापासून आणखी दूर आणि सुमारे ५० फूट उंचावर हलवली.

त्यांनी ओळखले होते की त्सुनामीपूर्वी समुद्राचे पाणी मागे जाते — त्यामुळे अणुभट्टीच्या कुलिंगसाठी (थंडाव्यासाठी) त्यांनी मोठा रिझर्व्हायर (जलसाठा) बांधून घेतला, जेणेकरून आपत्तीच्या काळातही पाण्याचा पुरवठा खंडित होऊ नये.

हिराई यांनी प्रकल्पाभोवती ५० फूट उंच समुद्रभिंत (Seawall) बांधण्याचा आग्रह धरला. त्या काळात ३० फूट उंच भिंत पुरेशी मानली जात होती. अनेकांना हा खर्च अनाठायी वाटला, पण हिराई आपल्या मतावर ठाम राहिले. लोकांना समजत नव्हते की त्यांना त्सुनामीची एवढी भीती का वाटते, कारण बहुतेकांना वाटत होते की भूकंपाचा विचार केला की पुरे.

ओनागावा प्रकल्प १९८४ साली पूर्ण झाला. त्यानंतर दोन वर्षांनी, १९८६ मध्ये हिराई यांचे निधन झाले.

त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल २५ वर्षांनी, २०११ च्या त्सुनामीने त्यांच्या दूरदृष्टीचे मूल्य सिद्ध केले.

हजारो लोकांचे प्राण त्यांच्या निर्णयांमुळे आणि सजगतेमुळे वाचले.

मी एमबीए करत असताना आमचे एक प्राध्यापक म्हणाले होते —

“कागदोपत्री बरोबर काम करणे म्हणजे compliance — ते सर्व कर्मचारी करतात.

पण त्या पलिकडे जाऊन चांगल्या-वाईट परिणामांची नैतिक जबाबदारी घेणे — हेच खरे नेतृत्व आहे.”

आज आपल्याकडे करोडोंचे गैरव्यवहार कागदोपत्री बरोबरच होताना दिसतात पण त्याची नैतिक जबाबदारी मात्र कोणीही घेताना दिसत नाही.

(Side Story - फुकुशिमा प्रकल्पाच्या अपघातांनंतर जी चौकशी समिती नेमण्यात आली. त्यांनी त्यांच्या अहवालात म्हंटले आहे की हा अपघात नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित आपत्ती आहे असेच मानण्यात यावे. कारण या शक्यता विचारात घेणे आणि हा अपघात थांबवणे शक्य होते.

हीच जपानी मानसिकता — जबाबदारीची, तयारीची आणि नैतिकतेची — साऱ्या जगाने शिकून घ्यायला हवी!)

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

What would you like to learn today?