आयमी मुलिन्स

आयमी मुलिन्स (Aimee Mullins) जन्माला आली तेव्हा तिच्या पायामध्ये शिन बोन (shinbone - गुडघा आणि घोट्याला जोडणारं हाड) नव्हतं. डॉक्टरांनी तिच्या पालकांना सांगितलं — "तिला कधीही चालता येणार नाही आणि तिचं जीवन सुरळीत व्हायचं असेल तर तिचे दोन्ही पाय गुडघ्यापासून खाली कापावे लागतील."
कल्पना करा, एका नवजात बाळासाठी हे किती कठीण असेल. पण आयमीचं खऱ्या अर्थाने जीवन तिथून सुरू झालं.
त्यानंतर पाच वर्षांची असताना आयमीला पायाची हाडे वेडीवाकडी वाढत असल्याने पुन्हा ऑपरेशन करावे लागले. ऑपेरेशन नंतर तिला मांड्यांचे स्नायू मजबूत व्हावेत म्हणून फिजिओथेरपी साठी रोज हॉस्पिटलमध्ये जावं लागत असे. आणि जाडजूड रबरी पट्ट्या वापरून व्यायाम करावा लागत असे. ते करताना प्रचंड वेदना व्हायच्या. रोज ती ओरडायची, रडायची, झुंज द्यायची — "मी हे नाही करू शकत!, मला खूप दुखतंय, मला सोडा !"
त्यातच तिची शाळा पण बुडत होती. व्हीलचेअर वर बसलेली, दोन्ही पाय नसणारी आणि उपचारासाठी गैरहजर राहणारी आयमी "नॉर्मल" नव्हती म्हणून तिच्या शिक्षिकेने पण तिला इतर मुलांसोबत न शिकविण्याची विनंती तिच्या पालकांना केली. लहान मुलांसाठी त्यांचे शाळेतील मित्रमंडळी हेच विश्व असतं ते पण हिरावून घेतलं जात होतं. शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही आघात आयमीला सहन करावे लागले.
या सगळ्याचा राग तिच्या फिजिओथेरपी सत्रांमध्ये निघायचा. तिला ते हॉस्पिटल एखाद्या तुरुंगासारखे वाटायचे आणि रबरी पट्ट्या साखळदंडासारख्या. तिला त्या पट्ट्यांची चीड यायची.
एक दिवस, अशाच एका फिजिओथेरपी सत्रामध्ये तिच्या डॉक्टरांनी तपासताना तिच्याकडे पाहिलं, चष्मा काढला, आणि म्हणाले —
“अरे वा आयमी, मला आश्चर्य वाटतंय ! तू इतकी ताकदवान मुलगी झाली आहेस की आता तू माझे rubber bands तोडून टाकशील असं वाटतंय!
आणि बघू तुझी ताकद आणखी किती वाढते ते. जर तू ते तोडलेस, तर तुला $100 बक्षीस देईन.”
आणि त्या दिवशी आयमीचं मन बदललं.


तिला समजलं — ती कमकुवत नाही, उलट रोज थोडी थोडी मजबूत होत चाललीये. आता त्या जखडून ठेवणाऱ्या रबरी पट्ट्यांची तिला चिड येत नव्हती. उलट त्या रबरी पट्ट्याच तिला घाबरत आहेत असे तिला वाटू लागले. ती दिवसेंदिवस सराव करत राहिली — अधिक ताकदीने, अधिक आत्मविश्वासाने.
हा बदल पैशांच्या आमिषाने केलेला नव्हता तर आयमीच्याच भाषेत सांगायचं तर "तिला पहिल्यांदाच झालेल्या तिच्या ताकदीच्या साक्षात्कारामुळे" हा बदल झाला होता.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================

हीच आयमी पुढे पॅरा ऑलिंपिक मध्ये धावण्याच्या आणि लांब उडीच्या स्पर्धेत भाग घेणारी ऍथलिट बनली. फॅशन क्षेत्रात मॉडेल बनली, चित्रपटात अभिनय करणारी कलाकार बनली आणि अमेरिकेतील एक प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ता बनली.

तिच्या टेड टॉक मध्ये ती म्हणते:
“Language calls reality into existence.”
भाषा वास्तव निर्माण करते.
शब्द खरे होतात. शब्द एखाद्याची ताकद वाढवतात किंवा घायाळ करतात. आपण जे बोलतो/ऐकतो ते आपले विचार बनतात आणि तेच विचार आपले अनुभव तयार करतात.
ती चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत सांगते - जगण्याच्या शर्यतीत फक्त ताकदवान किंवा जलद प्राणी जिंकत नाहीत.
तर परिस्थेतीशी ‘जुळवून घेणारे’ प्राणीच ही शर्यत जिंकतात.
(“It isn’t just the strongest or the fastest that survive.
It’s the most adaptable that survive.”)
म्हणूनच ती स्वतःला “अपंग” म्हणवून घेण्यास नकार देते.
ती म्हणते, "मी वेगळी आहे, पण कमी नाही!"
कारण "अपंग" हा शब्द मर्यादा दाखवतो. त्या शब्दामुळे सतत काहीतरी कमी आहे, तू परिपूर्ण नाहीस असा संदेश मिळतो. (त्यासाठीच मराठीमध्ये दिव्यांग असा नितांतसुंदर शब्द वापरला जातो !)
आणखी पुढे जाऊन आयमी एक महत्वाचा विचार मांडते. की खरं अपंगत्व शरीराचं नसतंच , तर मनाचं असतं. ज्याचं मन अधू झालं आहे तो अपयशी होतो. आणि शब्दच मनाला अधू करतात. कायमचं ! अगदी शरीराने बळकट असलेल्यांच्या मनालाही शब्द अधू करू शकतात !
मंडळी, आयमीच्या या उदाहरणावरून आपण काही बोध घेऊ शकतो का ?
आपण मुलांशी बोलताना किंवा त्यांच्या मर्यादांबद्दल बोलताना कितीतरी वेळा अशी भाषा वापरतो:
"तू हे नाही करू शकत..."
"तुझं दांडगटपण कधीच कमी होणार नाही..."
"तु काय शाळेच्या स्पर्धेत जिंकणार?"
"गणितात तू अगदी "ढ" आहेस..."
यातून आपण त्यांच्या मनात मर्यादा रूजवतो. त्यांना आपण दया, अपेक्षाभंग, किंवा उपेक्षा दाखवतो.
आपण अपयश किंवा अडचण म्हणजे अपंगत्व मानतो.
(आणि हे फक्त मुलांसोबत बोलताना नव्हे तर स्वतःबरोबर बोलतानाही हीच चूक करतो.)
पण खरंतर आपल्याला आयमीच्या डॉक्टरसारखं करायचं आहे.
मुलांच्या लपलेल्या सामर्थ्यावर प्रकाश टाकायचा आहे,
त्यांना मर्यादेपेक्षा मोठं पहायला शिकवायचं आहे,
त्यांना "तू करू शकतोस!" हे सांगायचं आहे.
मग ती मुलं अधू नाही, तर अवलिया बनतील.


आयमी म्हणते एक काळ होता जेव्हा मला इतर मुलांसारखं "नॉर्मल (सामान्य)" व्हायचं होतं. माझी तेवढीच ईच्छा होती. पण आता "असामान्य" विचारांची ताकद कळल्यानंतर मला "नॉर्मल" होणं अगदीच फिकं वाटतं !
असामान्य विचारांनी जग जिंकता येतं.
आपल्या मुलांनाही तसंच आयुष्य हवंय — रंगीबेरंगी, आत्मविश्वासपूर्ण, आणि मर्यादा पार करणारं !

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !