अपयशी होण्याचे हमखास मार्ग

प्रसिद्ध गुंतवणूकदार चार्ली मंगर "Inversion" हे मेंटल मॉडेल नेहमी वापरायचे. Inversion म्हणजे उलटा विचार करायचा. उदा. एखाद्या गोष्टीत यश मिळवायचे असेल तर काय करावे याचा विचार करण्याऐवजी अपयशी व्हायचे नसेल तर काय करावे असा विचार करणे.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/IcltwTPXamtKMo5AnUrnCd
येथे क्लिक करा.
================
असा विचार आपल्याला संभाव्य धोक्यांपासून वाचवतो. आणि यशाची शक्यता त्यामुळे वाढते. आज या लेखात आपण हेच मॉडेल वापरून कोणत्याही क्षेत्रात "अपयशी होण्याचे हमखास मार्ग" कोणते आहेत ते पाहूया. ते टाळले की यशाची शक्यता आपोआप वाढेल.

१. प्रयत्न करण्याची हिम्मत नसणे
आपल्याला काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते, पण अपयशाची भीती आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवते. "लोक काय म्हणतील?" हा विचार आपली स्वप्नं अर्धवट सोडायला लावतो. पण, यशस्वी लोक हे अपयशालाही संधी मानून त्यातून शिकतात. त्यामुळे पहिला मोठा बदल म्हणजे – प्रयत्न करण्याची हिम्मत दाखवा.

२. सगळ्यांना खूश करण्याचा प्रयत्न
सर्वांना आनंदी ठेवणे अशक्य आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी कोणीतरी नाराज होणारच. जर तुम्ही प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असाल, तर तुमचं स्वतःचं आयुष्य विसराल. त्यामुळे स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि इतरांच्या अपेक्षांमध्ये अडकू नका.

३. इतरांच्या स्वप्नांची नक्कल करणे
आजकाल सोशल मीडियामुळे आपल्याला वाटतं की आपल्यालाही इतरांसारखं मोठं यश मिळवायला हवं. पण, तुमच्या स्वतःच्या स्वप्नांपेक्षा इतरांची स्वप्नं उधार घेऊन त्यांचा पाठलाग केला, तर आयुष्य भरकटू शकतं. त्यामुळे तुमच्या मनात खरंच काय आहे, ते ओळखा आणि त्यानुसार पुढे जा.

४. प्रतिष्ठेचा विचार आणि पाठलाग करणे
काही वेळा आपल्याला मोठ्या पदवी, मोठे टायटल्स, मोठी नोकरी किंवा प्रसिद्धी यांचा मोह होतो. पण, हे मिळवल्यावरही समाधान मिळत नसेल, तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे प्रतिष्ठेपेक्षा तुमच्या आतून समाधान मिळेल अशा गोष्टींचा विचार करा.

५. सर्व काही एकट्याने करण्याचा अट्टहास
आयुष्यात मोठं काही साध्य करण्यासाठी चांगल्या टीमची आणि योग्य मदतीची गरज असते. पण काही लोकांना "मी सगळं एकटाच करू शकतो" असं वाटतं, त्यामुळे त्यांना योग्य वेळी मदत मिळत नाही आणि ते अधिक तणावाखाली जातात. त्यामुळे गरज असेल तेव्हा मदत मागायला शिकायला हवं.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/IcltwTPXamtKMo5AnUrnCd
येथे क्लिक करा.
================

६. एकाच वेळी खूप जास्त गोष्टींमध्ये लक्ष घालणे.
एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न केल्यास कोणतीच गोष्ट नीट पूर्ण होत नाही. त्यामुळे तुमच्या जास्तीत जास्त उर्जेचा योग्य वापर करण्यासाठी काही निवडक, महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.

जर तुम्हाला तुमच्या संपूर्ण क्षमतेचा विकास करायचा असेल, तर अपयशी होण्याचे हे मार्ग टाळा. आणि त्यावर काम करा.

यशस्वी भव !

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !