There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
2003 चा विम्बल्डन मिक्स्ड डबल्स टेनिसचा उपउपांत्य सामना. भारताचे लिअँडर पेस आणि मार्टिना नवरातिलोव्हा यांची जोडी खेळत होती. सामन्याच्या सुरुवातीलाच लिअँडरला ताप आला होता. डोकं प्रचंड दुखत होतं. डोक्याच्या मागच्या बाजूला एक वेगळीच सणक जाणवत होती. पण ती विम्बल्डन सिरीज जिंकणे दोघांसाठी महत्वाचे होते. कारण सर्वाधिक वय असलेल्या जोडीने विम्बल्डन जिंकण्याचा विक्रम होऊ शकला असता. मार्टिनासाठी ही विम्बल्डन जिंकणे महत्वाचे होते कारण या विम्बल्डन विजयांनंतर तिची सर्वाधिक २१ विम्बल्डन विजेतेपदाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी होणार होती. लिअँडरने आपल्या पार्टनरसाठी तशाही परिस्थितीत खेळण्याचे ठरवले.
ही जोडी सामना जवळपास जिंकत आली होती. पण खेळाला काही मिनिटे शिल्लक असताना शेवटच्या सेटमध्ये एक जोरदार फटका खेळण्यासाठी लिअँडरने उडी घेतली. पण अचानक त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि तो खाली पडला. मार्टिनाने त्याला सावरलं. त्याला उचलून बाजूला बसवलं. डॉक्टर्स धावत आले. लिअँडरने त्यांना सांगितले की मला काहीच दिसत नाहीये. दोन मिनिटे शांत बसल्यानंतर त्याला हळूहळू पुन्हा दिसायला लागलं. डॉक्टरने काही औषधं दिली. आणि लिअँडरला सांगितलं की आता पुढे खेळणं तुझ्यासाठी धोकादायक होऊ शकतं.
लिअँडरने मात्र सामना खेळायचं ठरवलं. त्याने डॉक्टरला विनंती केली की सात - आठ मिनिटात हा सामना संपेल तेवढा वेळ मला खेळू दे. सामना संपल्यानंतर मला दवाखान्यात ने. लिअँडर आणि मार्टिनाने तो सामना जिंकला. त्यानंतर लिअँडर हॉस्पीटल मध्ये गेला तिथे तपासणी केल्यानांतर आढळले की त्याच्या मेंदूमध्ये मागील भागात ट्युमर आहे.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWK
येथे क्लिक करा.
================
त्याही परिस्थितीत पुढे डॉक्टरांच्या परवानगीने लिअँडरने पुढे खेळण्याचे ठरवले. सेमी फायनल आणि नंतर फायनल देखील जिंकले. विम्बल्डन जिंकणाऱ्या सर्वाधिक वयस्कर जोडीचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. आणि दुसऱ्याच दिवशी लिअँडर आपल्या ट्रेनिंग बेसवर फ्लोरिडा मध्ये परतला. विम्बल्डनच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी न्याहारी करत असताना पुन्हा एकदा लिअँडरच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि काही काळासाठी पुन्हा काहीच दिसेनासे झाले. त्याच्या फ्लोरिडामधील कोचने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे त्याला ट्युमर कॅन्सर असल्याचे निदान झाले. पुढील सहा आठवडे त्याच्यावर कॅन्सरची ट्रीटमेंट झाली. ३० MRI, ३० सिटीस्कॅन आणि पाच बायोप्सी झाल्यानंतर लक्षात आले की कॅन्सरचे निदान आणि ट्रीटमेंट चुकली होती.
खाण्यातून शरीरात गेलेल्या एका विषाणूमुळे लिअँडरला हा आजार झाला होता. त्यासाठीची औषधे पुढील सहा आठवडे घ्यावी लागली. त्यादरम्यान जड औषधे आणि स्टिरॉइड्स मुळे लिअँडरचे वजन खूप वाढले. एकूणच यासाठी चार महिने लिअँडरला हॉस्पिटल मध्ये घालवावे लागले. त्यानांतर लगेचच तीन महिन्यांनी लिअँडरला ऑलिम्पिक सामन्यांमध्ये खेळायचे होते. ही त्याची चौथी ऑलिम्पिक वारी होती. आणि लहानपणीच आपल्या वडिलांना मी चारवेळा ऑलिम्पिक मध्ये खेळेन असे लिअँडरने वचन दिले होते. (लिअँडरचे वडील वेसी पेस १९७२ मध्ये भारतासाठी हॉकी खेळले होते. आणि त्यांनी ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल देखील मिळवले होते. त्याची आई जेनिफर पेस हिने १९७२ मध्ये ऑलिम्पिक मध्ये बास्केटबॉल साठी भारताचे प्रतिनिधित्व केले होते !)
प्रचंड मेहनत करून लिअँडरने स्वतःला पुन्हा ऑलिम्पिक मध्ये खेळण्याइतके तयार केले. फिटनेस सुधारला. यादरम्यान त्याला सर्वाधिक प्रेरणा दिली ती मार्टिना नवरातिलोनाने ! लिअँडर आजारी होता त्याकाळात मार्टिना US Open आणि ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये कुणाही वेगळ्या पार्टनर बरोबर खेळू शकली असती. पण कॅन्सर सारख्या आजाराशी लढण्याची (लिअँडर कॅन्सरग्रस्त आहे हीच बातमी टेनिस क्षेत्रात पसरली होती !) प्रेरणा लिअँडरला मिळावी म्हणून जोपर्यंत लिअँडर पूर्णपणे बरा होऊन खेळायला सुरुवात करत नाही तोपर्यंत प्रोफेशनल टेनिस मध्ये कोणताही मिक्स्ड डबल्स सामना न खेळण्याचा निर्णय तिने घेतला.
सध्याच्या काळात जिथे कोणी कोणासाठी एक मिनिट थांबायला तयार नसतो तिथे मार्टिनाने तिच्या पार्टनरसाठी केलेला त्याग असामान्य असाच म्हणावा लागेल. आणि मार्टिनाचा विश्वविक्रम आपल्यामुळे अडू नये म्हणून आजारी असतानाही सामना खेळून तो जिंकण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लिअँडरचे देखील करावे तितके कौतुक कमीच !
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWK
येथे क्लिक करा.
================
तुम्ही खूप लोकांना प्रसिद्ध होताना, श्रीमंत होताना, यशस्वी होताना पहिले असेल ...पण तेच लोक दीर्घकाळ टिकून राहतात जे आपल्या क्षेत्रात एक्स्पर्ट होण्यासोबतच एक चांगला "माणूस" बनण्याचा प्रयत्न करतात ! आपल्याआधी इतरांचा विचार करतात !!
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !