गोलपेक्षा मोठं ध्येय – माणुसकी!

ही गोष्ट आहे लॉरेन्स लेम्यू नावाच्या एका खेळाडूची. तो कॅनडाचा एक नाविक (sailor) होता आणि त्याचं एकच स्वप्न होतं - ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं. वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर अखेर तो दिवस उजाडला. 24 September 1988 या दिवशी दक्षिण कोरियामधील सोल ऑलिम्पिकमध्ये तो शर्यतीसाठी समुद्रात उतरला होता.
शर्यत सुरू झाली. हवामान छान होतं आणि लॉरेन्सची बोट वेगाने पुढे जात होती. पण शर्यत सुरु असताना अचानक वाऱ्याचा वेग वाढला आणि समुद्रही खवळू लागला. बोट पुढे हाकणे कठीण होऊ लागले होते. मात्र लॉरेन्सला याची चिंता नव्हती. त्याचे बोटीवरील नियंत्रण उत्तम होते. बघता बघता तो शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. ऑलिम्पिक पदक आता अगदी दृष्टिपथात होतं. आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण होणार, या विचाराने तो रोमांचित झाला होता.
पण तेवढ्यात त्याला काहीतरी वेगळंच दिसलं.
थोड्याच अंतरावर, समुद्राच्या खवळलेल्या लाटांमध्ये एक बोट उलटली होती. सिंगापूरचे दोन खेळाडू मदतीसाठी धडपडत होते. त्यांचे प्राण धोक्यात होते. त्यापैकी एकाला गंभीर दुखापत झाली होती. रक्तस्त्राव होत होता.
आता लॉरेन्ससमोर एक मोठा प्रश्न होता. एकीकडे होतं त्याचं आयुष्यभराचं स्वप्न - ऑलिम्पिक पदक. आणि दुसरीकडे होते दोन अनोळखी माणसांचे प्राण. त्याने काय करायला हवं होतं?
लॉरेन्सने एका क्षणाचाही विचार केला नाही.


================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================


त्याने आपली शर्यत अर्धवट सोडली आणि आपली बोट त्या बुडणाऱ्या खेळाडूंच्या दिशेने वळवली. लाटा आणि वाऱ्याशी झुंज देत त्याने त्या दोघांनाही वाचवलं आणि आपल्या बोटीवर घेतलं. बचाव पथक येईपर्यंत तो त्यांच्यासोबत थांबला.
हे सगळं झाल्यावर तो पुन्हा शर्यतीत परतला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तो शर्यतीत २२व्या स्थानी आला. त्याच्या हातातून पदक निसटलं होतं. त्याचं स्वप्न भंगलं होतं.
पण खरी गोष्ट तर पुढे घडणार होती.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष स्वतः लॉरेन्सला भेटायला आले. त्यांनी लॉरेन्सच्या गळ्यात सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक घातलं नाही, तर एक विशेष पदक घातलं. ते होतं 'पिअर डी कुबर्टिन पदक' - जे खिलाडूवृत्ती आणि मानवतेचं सर्वोच्च प्रतीक मानलं जातं.
ते म्हणाले, "तू पदक जिंकलं नाहीस, पण तू तुझ्या त्यागाने आणि धैर्याने ऑलिम्पिकच्या खऱ्या मूल्यांचं दर्शन घडवलं आहेस."
पदकं अनेक जण जिंकतात, पण मनं जिंकणारे लॉरेन्ससारखे खेळाडू विरळेच असतात. आपल्या आयुष्यातही असे क्षण येतात, जेव्हा आपल्याला आपलं ध्येय आणि माणुसकी यांपैकी एकाची निवड करावी लागते. पण .....
मित्रांनो, क्षणभर थांबून कल्पना करा की लॉरेन्सच्या जागी आपण आहोत. अशावेळी आपण काय केले असते. मला माहित आहे की आपल्या सर्वांचे उत्तर असेल की आपणही पदकापेक्षा जीव वाचवण्याला प्राधान्य देऊ ! पण मंडळी बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षात करणं वेगळं ! जेव्हा माणूस घाईत असतो किंवा त्याच्यासमोर कुठेतरी पोहोचण्याचे उददीष्ट असते तेव्हा बहुतांश लोक मदत करण्यासाठी थांबत नाहीत. (आणि सध्या तर आपण २४ तास , १२ महिने घाईतच असतो!). मी हे केवळ मला वाटतंय म्हणून सांगत नाही. तर अनेक मानसशास्त्रीय प्रयोगांनी हे सिद्ध झालंय.


प्रिन्स्टन विद्यापीठातील 'गुड सॅमरिटन' (Good Samaritan) प्रयोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका प्रसिद्ध मानसशास्त्रीय प्रयोगात, धर्मगुरू बनण्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले.
पहिला गट: या गटाला 'गरजूंना कशी मदत करावी' (The Good Samaritan) या विषयावर भाषण तयार करायला सांगितले. त्यांच्या डोक्यात पूर्णपणे मदतीचे आणि सहानुभूतीचे विचार होते.
दुसरा गट: या गटाला एका सामान्य व्यावसायिक विषयावर (उदा. नोकरीच्या संधी) बोलायला सांगितले. या विषयाचा मदतीशी काहीही संबंध नव्हता.
यानंतर, प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना एक - एक करून भाषण देण्यासाठी दुसऱ्या इमारतीत जायला सांगितले गेले. इथे एक गंमत होती. या दोन्ही गटांतील काही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की, 'तुम्हाला खूप वेळ आहे, आरामात जा.' तर काहींना, 'तुम्हाला उशीर झाला आहे, ताबडतोब पोहोचा!' असे सांगून घाई करायला लावली.
पण खरी परीक्षा त्यांच्या मार्गात होती. रस्त्यात, एक व्यक्ती (जो प्रयोगाचाच एक भाग होता) आजारी असल्याचे नाटक करून बसवली होती, जिला मदतीची खरोखर गरज होती.
आता निकालाची खरी गंमत पाहा.

असे वाटले होते की ज्यांच्या डोक्यात 'मदत कशी करावी' यावर विचार चालू होते, ते विद्यार्थी जास्त मदत करतील. पण तसे अजिबात झाले नाही! भाषणाचा विषय कोणताही असो, त्याचा मदतीवर काहीही परिणाम झाला नाही.
मदतीवर परिणाम झाला तो फक्त एकाच गोष्टीचा - ती म्हणजे वेळेची घाई.
ज्यांच्याकडे भरपूर वेळ होता, त्यांच्यापैकी ६३% विद्यार्थी त्या गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी थांबले.
पण ज्यांना उशीर झाला होता, त्यांच्यापैकी केवळ १०% विद्यार्थीच थांबले.
विचार करा, उरलेले ९०% विद्यार्थी, ज्यांच्यापैकी काही 'मदत कशी करावी' यावर भाषण द्यायला जात होते, ते त्या गरजू व्यक्तीकडे दुर्लक्ष करून, अक्षरशः त्याला ओलांडून पुढे निघून गेले. त्यांच्या डोक्यात मदतीचे उदात्त विचार होते, पण घाई आणि दबावामुळे त्यांची कृती मात्र वेगळीच घडली.
लॉरेन्स लेम्यूची गोष्ट आणि 'गुड सॅमरिटन' प्रयोग आपल्याला एकाच महत्त्वाच्या सत्याची जाणीव करून देतो. आयुष्याच्या शर्यतीत धावताना, ध्येयाच्या दिशेने वेगाने जात असताना, आपल्या आजूबाजूला मदतीसाठीचा एखादा आवाज अनेकदा आपल्याला ऐकू येतच नाही. आणि कधीकधी ऐकू आला तरी घाई आणि दबावामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. लॉरेन्सचं मोठेपण यातच आहे की, ऑलिम्पिक पदकाच्या प्रचंड दबावाखाली असतानाही त्याने माणुसकीचा आवाज ऐकला. त्याने शर्यत हरूनही आयुष्य जिंकलं.

किसी की मुस्कुराहटों पे हो निसार,
किसी का दर्द मिल सके तो ले उधार,
किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार,
जीना इसी का नाम है।

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !