There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
असं म्हणतात, दुसऱ्यांना जाणून घेणे हे चांगलेच लक्षण आहे पण स्वतःला ओळखणे हे खरे सूज्ञपणाचे लक्षण आहे. मानवाला जगण्यासाठी आवश्यक ते सारं काही निसर्गाने आधीच दिलेलं आहे परंतु, माणसाला त्याचाच अध्येमध्ये विसर पडतो. निसर्गाने आपल्याला अनेक शक्ती दिलेल्या आहेत, आणि ती प्रत्येक शक्ती वापरायची कशी, वापरायची की नाही, कधी वापरायची आणि कधी वापरायची नाही याचे सारे निर्णय निसर्गाने आपल्या हातात दिलेले आहेत. माणूस म्हणून आपल्यात दया, क्षमा, शांती, प्रेम या मूलभूत शक्ती एकवटलेल्या आहेत, पण बरेचदा आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. याच शक्ती वापरून कोणीही माणूस जग बदलू शकतो पण माणसाला ते लक्षात येत नाही.
तुम्ही कितीही दुःखी असा, कितीही उदास तुम्हाला एखाद्या क्षणी वाटत असेल तरीही तुम्ही त्याही क्षणी हसू शकता हे तुम्ही कधी अनुभवलंय ? जेव्हा तुमच्या भवतालचं वातावरण काही कारणाने दुःखी असेल, उदास असेल तेव्हा क्षणात ते वातावरण बदलण्याची आणि तिथे आनंद पेरण्याची शक्ती तुमच्यात आहे.
तुम्ही जे द्याल तेच तुमच्याकडे भरभरून येतं हा निसर्गाचा नियम आहे. जे बीज पेराल त्याचीच फळं चाखाल या न्यायाने आनंद, शांती, सुख, समाधान, समजूतदारपणा याबरोबरच तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनात, राग, द्वेष, मत्सर, गोंधळ, शंका या साऱ्यांचीही बीजं पेरत असता, आणि त्याचीच फळं तुम्हाला चाखायला मिळतात.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
जेव्हा तुम्ही एखाद्या भावनेवर लक्ष्य केंद्रीत कराल, त्या भावनेचे तरंग तुमच्या मनात द्विगुणित होत जातील हे लक्षात ठेवा. कारण, तुमचं मन आपोआपच त्याच भावनेचा सराव मनातल्या मनात सतत करत असतं आणि त्याला ते जमायला लागतं. उदाहरणार्थ, जर तुम्हाला पटकन राग येत असेल तर याचा अर्थ तुमच्या मनाने राग या भावनेचा खूप चांगला सराव केलेला आहे, आणि म्हणूनच तुमचं मन कोणत्याही क्षणी ही भावना चटकन मनातून उमटवू शकतं. अगदी याचप्रमाणे, तुमच्या मनातील अन्य भावनाही काम करत असतात आणि त्या भावनांप्रमाणे तुमचं जीवन घडत असतं.
समजा, तुम्ही अडचणींवर लक्ष्य केंद्रीत केलंत, तर तुमच्या मार्गात सतत अडचणीच येत जातात, जर तुम्ही अडचणीतून मार्ग काढण्यावर लक्ष्य केंद्रीत कराल, तर तुम्हाला अनेक मार्ग सापडत जातील आणि तुमच्यासाठी अनेक संधींची द्वारं खुली होतील.
एक खूप छान वाक्य आहे, जहाज हे कधीही बाहेरच्या पाण्याने बुडत नाही, तर जे पाणी त्याच्या आतमध्ये साचतं त्यामुळे ते जहाज बुडतं. माणसाच्या जीवनाचंही असंच आहे. जहाजाप्रमाणेच मानवी जीवन आहे. माणसाला वाटतं, त्याच्यावर बाह्य गोष्टींचा परिणाम होतो आणि त्याप्रमाणे त्याचं वर्तन ठरतं, पण ते अयोग्य आहे. योग्य काय, तर माणसाच्या आतमध्ये जे घडतं, अंतर्मनातून जे प्रकटतं तेच खरं त्याचं जीवन आहे. म्हणूनच, परिस्थितीला तुम्हाला घडवू देऊ नका, तर तुम्ही तुमच्यायोग्य परिस्थिती घडवा. हार आणि जीत या पारड्यांमध्ये जीवन तोलू नका, कारण ते बाह्य आहे. जेव्हा कोणीतरी जिंकतं तेव्हा कोणीतरी हरतं हा निसर्गनियमच आहे, पण, जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवाल, तुम्हाला कोणी हरवू शकत नाही, शकणार नाही हे सत्य आहे. म्हणून अंतर्मनाची शक्ती ओळखा आणि तुमच्या जीवनात दया, क्षमा, शांती, प्रेम आणि आनंद पेरायला या क्षणापासूनच सुरुवात करा.
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com