रिलायन्सने कोणालाही लक्षात नसलेला कॅम्पा कोला हा Dead Brand का विकत घेतला ?

लहानपाणी ज्याच्यावर अन्याय झालाय असा हिरो मोठा होऊन बदला घेतो या धर्तीवरचे अनेक चित्रपट आपण पहिले असतील पण ज्याच्यावर अन्याय झाला आहे असा एक ब्रँड पुढे आपल्या अन्यायाचा बदला घ्यायला तयार झालाय अशी गोष्ट अभावानेच पाहायला मिळते. मित्रहो, रिलायन्स मुळे आपल्याला ही गोष्ट पहायला मिळणार आहे. रिलायन्स ने नुकताच कॅम्पा कोला हा सॉफ्ट ड्रिंक ब्रँड २२ करोडला विकत घेतला आणि या दिवाळीत हा ब्रँड नव्याने लाँच देखील होणार आहे. तुम्ही आम्ही कधी या ब्रँडचे नावही ऐकलेले नाही. पण तुमच्या आई-बाबांना विचारून पहा , कदाचित त्यांना हा ब्रँड आठवत असेल.


कॅम्पा कोला हा ब्रँड pure drinks या कंपनीने १९७७ साली तयार केला. Pure Drinks या कंपनीनेच पहिल्यांदा कोका कोला भारतात आणले होते. ते कोका कोलाचे भारतातील एकमेव मॅन्युफॅक्चरर्स आणि डिस्ट्रिब्युटर्स होते. पण पुढे भारत सरकारने परदेशी कंपन्यांना ४०% भागीदारी भारतीय कंपन्यांना देण्याची सक्ती केली तेव्हा कोका कोलाने भारतातून काढता पाय घेतला आणि पुढे १७ वर्षे कोका कोला भारतातून बाहेरच होते. ही रिकामी जागा भरायसाठी Pure Drinks ने स्वततःचा ब्रँड बाजारात आणला आणि त्याचेच नाव होते कॅम्प कोला. कॅम्पा कोला दिसायला आणि चवीला एकदम कोका कोला सारखेच होते. कोका कोलाची स्पर्धा नसल्याने कॅम्पा कोला चांगलाच बिझनेस करत होते. पण नंतर जेव्हा कोक आणि पेप्सी भारतात परत आले तेव्हा त्यांनी भरपूर पैसा, जबरदस्त मार्केटिंग आणि डिस्ट्रिब्युशनच्या बळावर कॅम्पा कोलाला बाजारातून बाहेर काढले. हळूहळू कॅम्पा कोला संपत गेला आणि शेवटी १९९९ ला कायमचा बंद झाला.


मग आता रिलायन्स या ब्रॅण्डला पुन्हा नव्याने का लाँच करत आहे ? कारण हा ब्रँड कधीच संपला आहे. ब्रँड संपलेला असला तरी एक गोष्ट कॅम्पा कोला कडे अजूनही आहे .... ती म्हणजे कोका कोलाच्या जवळ जाणाऱ्या चवीचा फॉर्म्युला !
रिलायन्स आता मोठ्या प्रमाणावर FMCG मध्ये उतरत आहे. यासाठी त्यांना अनेक मोठेमोठे ब्रॅण्ड्स आणावे लागतील. पेप्सी आणि कोक सारख्या मोठ्या ब्रॅण्ड्सबरोबर टक्कर घेणे सोपे नाही. रिलायन्सने हा प्रयत्न आधीच करून पाहिला आहे. त्यांचा YEAH नावाचा एक सोडा ब्रँड पण आहे. मात्र तो कुणालाच ठाऊकही नाही. सॉफ्ट ड्रिंक कॅटेगरी मध्ये नवे ब्रॅण्ड्स आणणे सोपे नाही हे रिलायन्सला ठाऊक आहे. त्यामुळे नवे ब्रॅण्ड्स उभे करण्यापेक्षा आधीच बाजारात असलेले ब्रॅण्ड्स आणण्यावर रिलायन्सचा भर आहे.


आणि हो, कॅम्पा कोला कडे एक मोठं शस्त्र अजूनही आहे. ते म्हणजे त्या ब्रँडचं भारतीयत्व ! सध्याच्या आत्मनिर्भरतेच्या लाटेवर आरूढ होऊन हा ब्रँड भारतीयांच्या फ्रीजमध्ये जागा मिळवू शकतो.


==========================================
अदानी ग्रुप भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे का?
4000 करोडचा घोटाळा ज्याबद्दल कोणीच काही बोलत नाही !
खिशाला परवडतील अशा खऱ्या हिऱ्यांची बाजारपेठ (Lab grown diamonds)
जपान मध्ये तरुणांनी अधिक दारू प्यावी म्हणून तिथलं सरकार प्रयत्न करतंय ! का ते जाणून घ्यायचंय ?
या व अशा अनेक विषयांवर लेख प्रकाशित होणार आहेत नेटभेट च्या व्हाट्सअप्प ग्रुपमध्ये ! आजच जॉईन करा. 93217 13201 या नंबर वर JOIN असा मेसेज पाठवा !
किंवा येथे क्लिक करा - https://salil.pro/connect
==========================================

त्याशिवाय भारताची FMCG बाजारपेठ वेगाने वाढत आहे. २०१३ मध्ये भारतीय Grocery FMCG मार्केट ३०० बिलियन डॉलर्सचं होतं, ते २०१९ साली ६०० बिलियन डॉलर्सचं झालं आणि २०२४ पर्यंत ८०० बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त होणार आहे. त्यामुळे जरी कोक बरोबर स्पर्धेत जरी जिंकले नाही तरी कॅम्पा कोलाला चांगला सेल मिळेल.


रिलायन्स रिटेल कडे आधीच १५ लाख दुकानं आहेत त्यामुळे डिस्ट्रिब्युशन वर पूर्ण नियंत्रण आहे. यासोबत रिलायन्सची कमी किमतीत उत्पादने बाजारात आणून स्पर्धकांना आश्चर्यचकित करण्याची क्षमता तर आपल्याला माहीत आहेच. जीओ मोबाईल ने जे केलं तेच रिलायन्स रिटेल FMCG मध्ये करण्याची दाट शक्यता आहे. रिलायन्स रिटेल आणखी एक स्ट्रॅटेजी नेहमी वापरते. त्यांच्या दुकानात मोठ्या ब्रॅण्ड्ससारखेच दिसणारे, जवळपास सारखी पॅकिंग असणारे छोटे private brands ठेवलेले असतात. ग्राहक बऱ्याच वेळा चुकून private brands कार्ट मध्ये टाकून घेऊन जातात. तुम्ही म्हणाल हे एव्हढ्याश्याने काय होतंय... पण मित्रानो अशा प्रकारची ग्राहकांच्या चुकीमुळे होणारी खरेदी पण काही करोड रुपयांच्या घरात आहे.


या सर्व कारणांमुळे रिलायन्सने कॅम्पा कोला हा Dead Brand फक्त २२ करोडला विकत घेतला. या कॅटेगरी मध्ये कोक-पेप्सीला फारशी टक्कर न देता सुद्धा कॅम्पा कोला एवढा बिझनेस रिलायन्सला सहज आणून देईल की २२ करोड सुट्या पैशांइतके वाटावेत. पण अंबानींचा विचार एवढ्यावरच समाधान मानायचा नक्कीच नसेल ! FMCG च्या या महायुद्धात पुढे HUL, ITC, PARLE, TATA, GODREJ अशा अनेक कंपन्या समाविष्ट होतील.... बराच काळ शांत असलेलं हे क्षेत्र रिलायन्स कशाप्रकारे ढवळून टाकेल हे पाहणं नक्कीच interesting असेल !


सलिल सुधाकर चौधरी
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com


Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy