"अशी असते लीडरशीप...!"

स्वतःबरोबरच संपूर्ण टीमला केले जगप्रसिद्ध
एका यूट्यूबरचा लोकल ते ग्लोबल प्रवास

"हल्ली काय सगळेच जणं यूट्यूब चॅनल सुरू करतात !", असे उद्गार सहज ज्यांच्या तोंडी येतात, त्यांना कदाचित या माध्यमाची ताकद माहिती नसते किंवा, या माध्यमाद्वारे आपणसुद्धा ठरवलं तर आपलं अवघं जग बदलून टाकू शकतो हे देखील त्यांच्या गावी नसतं. पण, हे प्रत्यक्षात घडलं ते एका तरूणाच्या यूट्यूब चॅनलच्या बाबतीत, आणि त्याच्या यूट्यूब चॅनलवर खुद्द यूट्यूबनेच नंतर स्वतंत्र माहितीपट तयार केला एवढं अमाप यश त्याला त्याच्या प्रामाणिक कष्टांनी मिळवून दिलं.तेलंगणातील 'लांबाडीपल्ली' गावचा होतकरू तरूण 'श्रीकांत' याने आपलं एमटेक पूर्ण केलं. आता रोजगारासाठी तो नोकरी शोधत असतानाच त्याच्या मनात आलं की आपलं गाव इतकं सुंदर आहे तर गावाकडल्या संस्कृतीची, इथल्या माणसांची, इथल्या मातीची ओळख जगाला करून देता येईल की यूट्यूबच्या माध्यमातून आणि त्याने 'माय व्हिलेज शो' नावाने एक यूट्यूब चॅनल सुरू केलं. सुरुवातीला त्याला केवळ 10 हजार सबस्क्राईबर्स मिळवायचे होते. इतकं छोटसं लक्ष्य समोर ठेऊन त्याने कामाला सुरुवात केली. सुरुवातीला त्याच्या व्हिडीओजना फारसे व्ह्यूज मिळत नव्हते. मग त्याला कल्पना सुचली की त्याच्याजवळ असलेल्या साधनसामग्रीतून तो आणखी चांगले व्हिडीओज शूट करू शकतो, आणि चक्क रोजगारनिर्मितीही करता येऊ शकते. मग त्याने अक्षरशः लगानमधल्या भुवनने ज्याप्रमाणे एकेक करत आपली टीम तयार केली तशी एकेक माणसं आणि त्यांच्यातले अभिनय कौशल्य हेरत स्वतःची टीम तयारी केली. या टीममध्ये शेतात दिवसभर मोलमजूरी करणारी गंगव्वा नावाची एक वृद्ध महिलाही त्याने जोडून घेतली.

आता टीम तयार झाल्याने आणखीनच जोश आला. विविध विषय, गावाकडल्या समस्या, तिथल्या महिलांची प्रगती, तिथलं जनजीवन, तिथे होणारे विनोदी किस्से अशा हरप्रकारच्या व्हिडीओजनी एकेक करत श्रीकांतचे यूट्यूब चॅनल जोमाने सुरू झाले. गावाकडली इंटरनेटची समस्या हा विषय असलेला त्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आणि त्यानंतर त्याच्या यूट्यूब चॅनलचे व्ह्यूज प्रचंड वाढले.

आता ही टीम अगदी प्रोफेशनली काम करू लागली. पात्रांचे संवाद, लाईट्स, एडीटींग, साऊंड हे सगळं तंत्रज्ञान वापरून व्हिडीओ अपलोड करताना श्रीकांतने गावाकडच्या समस्यांचीही जगाला ओळख करून दिली. तसंच, गावातील माणसांबद्दल एकंदरीतच असलेले लोकांच्या मनातील गैरसमज, जसं की ते शिकलेले नसतात, त्यांना फार काही येत नाही वगैरे आपल्या व्हिडीओजच्या माध्यमातून दूर केले.
यूट्यूबनेही श्रीकांतच्या चॅनलची दखल घेतली आणि चक्क एक दिवशी यूट्यूबची टीम दिल्लीवरून श्रीकांतच्या गावात अवतरली. त्यांनी श्रीकांत, त्याची टीम कसं काम करतात आणि माय व्हिलेज शो चॅनलविषयी माहितीपट बनवला.

सर्वात सुंदर गोष्ट या चॅनलने दिली ती गंगव्वाला .. तिला या चॅनलवर काम करता करता स्वतःचं घर बांधता आलं.. शिवाय तिला तेलुगु बिगबॉस सीझन 4 मध्येसुद्धा आमंत्रित केलं गेलं. 60 वर्षांच्या गंगव्वाला अल्पावधीतच इतकी प्रचंड लोकप्रियता मिळाली की अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये आणि माध्यमांमध्ये ती झळकली. या टीममधल्या आणखी एका कलाकाराला नेटफ्लिक्सच्या एका शोमध्येसुद्धा काम मिळालं. माय व्हिलेज शो ला यूट्यूबकडून मिळणारं सिल्व्हर आणि गोल्ड बटनसुद्धा मिळालं तेव्हा तर या संपूर्ण टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला. अल्पावधीतच नामांकीत माध्यमांनीही त्यांची दखल घेतली.

अपुऱ्या संधी, रोजगाराच्या समस्या, तंत्रज्ञानाचा अभाव, आर्थिक सुबत्ता नाही आणि अशा कित्तीतरी अन्य समस्या असतानाही, एका ध्येयवेड्या तरूणाने आपला वेळ, मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर आपल्या गावाचं नाव जगाच्या पटलावर आणलं. शिवाय, पुढे जाताना तो एकटा गेला नाही, तर त्याच्या सोबत्यांनाही तो पुढे घेऊन गेला...

याला म्हणतात टीमवर्क आणि याला म्हणतात लीडरशिप !
गावाक़डल्याच एका तरूणाची ही जिद्दीची आणि वेगळ्या वाटेची खरीखुरी कथा तुम्हाला कशी वाटली...? आवडल्यास जरूर शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटबॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा ...

धन्यवाद
टीम नेटभेट
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy