There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
80 च्या दशकात सुप्रसिद्ध पार्ले कंपनी, आपल्या पार्ले अॅग्रो ब्रँड अंतर्गत अन्न आणि पेय क्षेत्रात उतरू इच्छित होती. ही कंपनी एक असं पेय बाजारात आणणार होती जे आंब्यापासून बनलेलं असेल, मुख्य म्हणजे रिफ्रेशिंग असेल, आणि मुख्य म्हणजे जे बाराही महिने उपलब्ध असेल. भरपूर संशोधनांती कंपनीने 85 साली बाजारात फ्रूटी नामक पेय आणलं. जेव्हा फ्रूटी बाजारात आली तेव्हा सगळ्यांचं लक्ष्य वेधलं गेलं कारण हे पेय एका वेगळ्या प्रकारच्या पॅकींगमध्ये दुकानात झळकत होतं. टेट्रा पॅक स्वरूपात जे पहिलं पेय बाजारात उपलब्ध झालं ते म्हणजे फ्रूटी..!
त्यावेळी बाजारात जी शीतपेय उपलब्ध होती ती सगळी काचेच्या बाटल्यांमध्ये मिळायची, किंबहुना त्यातील पेय पिऊन झालं की ग्राहकाला त्या बाटल्या दुकानांमध्ये परत नेऊन द्याव्या लागत. फ्रूटी मात्र बाजारात अवतरली ती आपल्या अनोख्या रूपात आणि बाजारात एकच धूम उडाली. याचं कारण, हिरव्या रंगाचं तिचं टेट्रापॅक चटकन विकत घेऊन कोणालाही लगेचंच पुढे आपल्या कामाला लागता यायचं, शिवाय काम करता करता फ्रूटीचा आस्वादही घेता यायचा. पेयाचं पॅकेजिंग बदलणं ही पार्ले कंपनीची खरोखरीच एक स्मार्ट मूव्ह होती.
या एकाच स्मार्ट मूव्हमुळे फ्रूटीने अबालवृद्धांना भुरळ घातली. शालेय विद्यार्थी आणि लहान मुलांना तर फ्रूटीची इतकी आवड लागली, की चक्क दप्तरात फ्रूटी ठेऊन ते शाळेत जातायेताना तिचा आस्वाद घ्यायला लागले. फ्रूटीनेही आपलं मार्केटींग इतकं अनोख्या पद्धतीने केलं होतं, की काहीकाही ठिकाणी तर चक्क झाडांना फ्रूटी लटकलेली ग्राहकांना मिळाली. तोवर हे असं कोणीही केलं नव्हतं. या आऊट ऑफ बॉक्स स्ट्रॅटेजीमुळे फ्रूटी उदंड लोकप्रिय झाली. टेट्रापॅकमध्ये स्ट्रॉ खोचून लगेचंच शीतपेय पीता येतंय ही कृती सहजसोपी असल्याने लोकांना फार आवडू लागली.
गेली तब्बल 35 वर्षांहून अधिक काळ फ्रूटी आपल्या ग्राहकांच्या सेवेत हजर आहे. विशेष म्हणजे, निरनिराळ्या पद्धतीने पॅकेजिंग करून, जाहिराती करून आजही फ्रूटी जनमानसावर अधिराज्य करते आहे. वर्षाकाठी फ्रूटीची तब्बल 1500 कोटींची विक्री होते हा आकडा खरोखरीच उल्लेखनीय आहे आणि थक्क करणारा आहे.
धन्यवाद
टीम नेटभेट
"मातृभाषेतून शिकुया, प्रगती करूया !"