आर्थिक नियोजनाची सुरुवात करताय .. ? मग हे मुद्दे लक्षात ठेवायलाच हवेत ..! 

(#Friday_Funda)

आपल्याला शाळाकॉलेजेसमध्ये सगळे विषय शिकवतात पण जीवनावश्यक असलेलं आर्थिक नियोजन मात्र आपल्याला कोणीही शिकवत नाही, त्यासाठी स्वतःला ओळखून स्वतःच्या आर्थिक गरजा आणि आपले एकूण उत्पन्नाच्या तूलनेत होणारे खर्च, आपल्यावरील आर्थिक जबाबदारी या सर्वांचा सर्वंकश विचार करून मग आपल्याला हे स्वतःचं गणित बसवावं लागतं. मात्र, अनेकांना हेच गणित कसं बसवायचं ते लक्षात येत नाही. म्हणूनच, आज अशा सर्वांसाठी हा लेख, ज्यांना आर्थिक नियोजनाची घडी व्यवस्थित बसवायची आहे, त्यांनी या मुद्द्यांचा जरूर विचार करावा -

1. स्वनियंत्रण ठेवायला शिका -
स्वतःवरती नियंत्रण ठेवण्याची एक कलाच आहे खरंतर, आणि ही कला ज्यांनी जितक्या लवकर आत्मसात केली त्यांची आर्थिक बाजू तितक्या लवकर बळकट झाली असं एक निरीक्षण आहे. कसं ते बघा हं, हल्ली आपण फटाफट क्रेडीट कार्ड किंवा ऑनलाईन पेमेंटने वाट्टेल तशी शॉपिंग करतो, त्यात बरीच खरेदी ही अकारणच केलेली अनावश्यक अशी असते. तुम्ही जर नंतर बँक स्टेटमेंट काळजीपूर्वक पाहिलंत तर तुम्हालाही ते जाणवेल. क्रेडीट कार्डवरून घरबसल्या विनाकष्ट शॉपिंग करणं हे इतकं सोपं झालंय की प्रत्यक्षात हीच वस्तू आणण्यासाठी किती खर्च झाला असता ते कष्ट आपण लक्षातही घेत नाही आणि भराभर स्वॅप करत आपली हौस पुरवत जातो. म्हणूनच मित्रांनो, खर्चाच्या बाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिका.
मग हे नियंत्रण कसं ठेवायचं, कसं कळेल की कोणता खर्च आवश्यक आहे आणि कोणता अनावश्यक ..?
तर त्यासाठी Timothy Keller चं हे वाक्य लक्षात ठेवा - " Self control is the ability to do the important thing over the urgent "

2. तुमचं आर्थिक भविष्य कसं असेल याचा विचार करा -

जर तुम्ही अव्वाच्यासव्वा खर्च करत राहिलात आणि त्या तुलनेत तुमचं इनकम फारसं नसेल तर तुमचं आर्थिक भविष्य कसं असेल याचा एकदा विचार करून पहा. जर तुम्हाला आर्थिक नियोजन कसं करावं याविषयी अजिबात माहिती नसेल तर काही पुस्तकं वाचा, अभ्यास करा. लक्षात घ्या, दर वीकेंडला पैसे उडवणाऱा उनाड तरूण आणि आर्थिक नियोजन करणारा एक जबाबदार तरूण या दोन्हीही व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतःच, पण एकाच वेळी तुम्ही या दोन्हीही व्यक्ती होऊ शकणार नाही.. हे लक्षात घ्या.

3. पैशाच्या वाटा शोधा -
आपल्याकडे एक म्हण आहे, 'आय पाहून व्यय करावा ..!' म्हणजे काय की तुमचं अर्थार्जन जितकं आहे त्या तुलनेतच किंबहुना त्यापेक्षा कमी खर्च करावा, पण बरेचदा हे शक्य होत नाही कारण आपल्याकडे पैसा येण्यापूर्वीच तो कुठे कुठे खर्च करायचाय याचं नियोजन झालेलं असतं. मग हा बॅलन्स कसा साधायचा, तर त्यासाठीच पैशाच्या वाटा शोधा.. म्हणजे पैसा नेमका कुठे कुठे खर्च होणार आहे ते आधी एका कागदावर लिहून काढा आणि मग त्यातील अनावश्यक ठिकाणी खर्च होत असलेल्या पैशाच्या मार्गांवर फुली मारून टाका.. नुसती कागदावरच नव्हे तर प्रत्यक्षातही बरं का ..!

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

4. तात्काळ खर्चासाठी काही रक्कम पूर्वनियोजित वेगळी काढून ठेवा -
आपण कितीही प्लॅन केलं तरीही आर्थिक गणित नीट बसतंच असं नाही, याचं कारण अचानक, तात्काळ उद्भवणारे खर्च. कधी अपघातासाठी, कधी अचानक आजारपणं, कधी लग्नमुंजी, कधी अचानक आलेले पाहुणे .. अशा हज्जारो गोष्टी ज्या आपल्या नियोजनात नसतात पण ऐनवेळी हे खर्च निघतात, म्हणून त्यासाठी दरमहा काही रक्कम बाजूला काढून ठेवत चला. बँकेत तुम्ही अशा काही रकमेच्या एफडीसुद्धा करून ठेऊ शकता.

5. निवृत्ती नंतरचं आर्थिक नियोजन -
नोकरी करणाऱ्यांसाठी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. निवृत्तीनंतरचं आर्थिक नियोजन आधीच करून ठेवायला हवं. कारण, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी पैसे मागायला कोणापुढेही हात पसरावे लागले नाही पाहिजेत हे लक्षात ठेवा, या जगात आपल्याजवळ पैसा असतो तोवरच आपल्याला किंमत असते ही काहीशी दुःखद पण खरी गोष्ट आहे. म्हणून, आज जे कमावताय त्यातलेच पैसे वृद्धापकाळासाठी बाजूला ठेवायला लागा. वॉरेन बफेट तर म्हणतात, “Spend what is left after saving.”

6. कर भरण्याला गांभीर्याने घ्या -
अनेकदा आपण टॅक्स भरण्याला फारसं महत्त्व देत नाही, परंतु, त्याकडे लक्ष देणं, आपला टॅक्स किती आणि कसा कधी भरावा लागेल या सगळ्याबाबत माहिती असणं हे सगळं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला ते जमत नसल्यास ऑनलाईन टॅक्स कॅलक्यूलेटर्स वापरू शकता.

7. आरोग्याची काळजी घ्या -
आता तुम्ही म्हणाल, अचानक हे काय.. तर खरंय मित्रांनो, 'Health is wealth' असं म्हणतात ते खरंच आहे. स्वतःची काळजी घेतली नाहीत तर सगळा पैसा सतत दवाखान्यांमध्येच खर्च होत राहील म्हणून आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com