There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
अनेक कंपन्यांमध्ये अनेक मॅनेजर्स आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना खूश ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. एम्प्लॉयी रेकग्निशन प्रोग्राम राबवून म्हणा, किंवा किमान आपल्या आवडत्या व आपल्या फेव्हरमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी काही काही मोठ्या संधी देऊन म्हणा ते आपल्यावरील जबाबदारी पार पाडत असतात. काही काही मॅनेजर्सना मात्र आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कधीही साधे दोन कौतुकाचे शब्दही उच्चारणं महाकठीण वाटतं. त्यांच्या मते, कंपनी जेव्हा कर्मचाऱ्यांना त्यांच्या वर्तनाचा, कामाचा रिपोर्ट पाठवेल त्यातच सगळं काही आलं.. कोणाच्याही कामाचं वेगळं, विशेषत्त्वाने कौतुक करणं गरजेचं नाही असं या मॅनेजर्सना वाटतं, आणि काही काही मॅनेजर्स अगदी फुटकळ वस्तू वगैरे देऊन कर्मचाऱ्यांना खूश केल्याचं, त्यांचं आपण कौतुक केल्याचं दाखवतात. अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचं कौतुक कसं करायचं हे देखील नीट ठाऊक नसतं, आणि त्यामुळेच तिथले कर्मचारी हे नाखूश असतात. ते केवळ तिथे कामाची ओझी वाहत असतात आणि आला दिवस पार पाडत असतात. ज्या कंपनीतील कर्मचारी आपल्या कामासोबतच आपल्या टीममेंबर्स बरोबर खूश रहात असतील, त्यांना जिथे आदर व सन्मान मिळत असेल, त्यांच्या कामाची प्रशंसा होत असेल अशा कंपनीतील कामाचा आऊटपुट हा नेहमी अधिक चांगला असतो. म्हणूनच अशा काही छोट्या गोष्टी ज्या केल्याने तुमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना कौतुकास्पद वागणुक दिली जाईल व त्यांना आनंद मिळेल अशा काही गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
1. अभिवादन -
ज्याप्रमाणे कर्मचारी तुमच्याशी संवाद साधताना, किंवा तुम्ही कंपनीत समोर दिसल्यावर तुम्हाला नम्रपणे अभिवादन करतात, त्याप्रमाणेच तुम्हीही दररोज नियमीतपणे एखाद्या विशिष्ट शैलीत तुमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना अभिवादन करा. किमान ज्या ज्या कर्मचाऱ्यांशी तुम्ही संपर्कात याल त्यांना गुडमॉर्निंग, गुडआफ्टरनुन वगैरे म्हणून त्यांच्याशी कनेक्ट व्हा. कधी कधी कंपनीत प्रवेश करताच समोर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना साधं हॅलो म्हणलं तरीही कर्मचाऱ्यांना तुमच्याप्रती विश्वास व आदर निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर तुमच्या कर्मचाऱ्यांना ते काय करत आहेत किंवा त्यांचं काम कसं सुरु आहे याबाबत वेळोवेळी विचारा. तुमच्या दैनंदिन कामकाजात कर्मचाऱ्यांसाठी थोडा वेळ नियमीतपणे राखून ठेवा व यावेळेत त्यांची चौकशी करा.
2. समतोल राखून फीडबॅक द्या -
कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आपल्या मॅनेजर्सकडून हे जाणून घ्यायचे असते की त्यांचे काम कसे सुरु आहे आणि ते त्यांच्या कामात अधिक सुधारणा कशाप्रकारे करू शकतात. कामाचा फीडबॅक मिळाल्यानंतर आपोआपच कर्मचाऱ्यांना आपण कंपनीत गरजेचे, महत्त्वाचे आहोत अशी भावना निर्माण होते व ते अधिक जबाबदार होतात. म्हणूनच, नुसतं कौतुक, तोंडदेखलं कौतुक करून तुम्हाला कर्मचाऱ्यांचं मन जिंकता येणार नाही हे लक्षात ठेवा, त्याऐवजी, जेव्हा तुम्ही कंपनीतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाविषयी वेळोवेळी एक संतुलीत फीडबॅक द्याल, तसंच, त्यांनी कुठे कुठे सुधारणा केल्यास त्यांचं काम अधिक उत्तम होईल असा फीडबॅक द्याल तेव्हा त्यांना अधिक उमेद निर्माण होईल. अनेक मॅनेजर्स एक मोठी चूक करतात ती म्हणजे, कर्मचाऱ्यांना एकाचवेळी दोन्हीही फीडबॅक म्हणजेच, सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्हीही फीडबॅक देतात. याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही. असं केल्याने कर्मचारी केवळ कन्फ्यूझ होतात. हार्वर्ड बिझनेस स्कूलने केलेल्या एका संशोधनानुसार असे आढळून आले की जे कर्मचारी उत्तम काम करतात त्यांना आपल्या मॅनेजर्सकडून आलेल्या नकारात्मक प्रतिक्रिया अधिक लक्षात रहातात आणि याउलट ज्यांना कामात प्रगती करायची होती अशा कर्मचाऱ्यांना आपल्या मॅनेजर्सकडून स्वतःविषयी, स्वतःच्या कामाविषयी केवळ सकारात्मक गोष्टीच ऐकायच्या होत्या. म्हणूनच मॅनेजर्सनीही हे दोन स्वतंत्र फीडबॅक द्यावेत, दोन्हीही फीडबॅक एकाचवेळी देऊ नये.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
3. कंपनीतील उत्कर्षाच्या संधी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सांगत चला -
कंपनीत कर्मचाऱ्यांना त्यांचे करिअर डेव्हलप करण्यासाठी आणखी कोणकोणत्या संधी आहेत, त्यांबद्दल वेळोवेळी त्यांना सांगत चला. जेव्हा मॅनेजर्सकडून अशी माहिती एखाद्या कर्मचाऱ्याला मिळते तेव्हा त्याच्या मनात हा ठाम विश्वास असतो, की मॅनेजरने आपलं काम व आपली क्षमता ओळखूनच आपल्याला भविष्यातील संधींविषयी माहिती दिली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना अप्रिशिएट केल्याची भावना निर्माण होते. केवळ कौतुकाचे शब्द पुरेसे नसतात, तर कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीत आपली किती व कशी प्रगती होईल याबाबतची माहिती मिळणंही आवश्यक असतं. यामुळे आपल्या क्षमतांना व गुणवत्तेला या कंपनीत वाव आहे याचा ठाम विश्वास कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण होतो.
4. कामातील लवचिकता द्या -
कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामातील स्वातंत्र्य व काम करण्यातील लवचिकता मिळाल्यास खूप आनंद होतो. त्यामुळेच, कंपनीतील मेहनती, विश्वासू कर्मचाऱ्यांना कामातील स्वातंत्र्य व लवचिकता द्या. समजा एखाद्या कर्मचाऱ्याने उशीरापर्यंत काम केले असेल तर त्याला दुसऱ्या दिवशी थोडंसं उशीराने कामावर येण्याची परवानगी मॅनेजरकडून मिळाल्यास त्याला निश्चितच तीच आपल्या कामाची पावती असल्याचं जाणवतं. किंबहुना, मॅनेजरकडून मिळणारं हे स्वातंत्र्य म्हणजेच आपल्या कामाचं खूप मोठं कौतुक आहे हे कर्मचाऱ्यांना लक्षात येतं.
5. वरील सर्व गोष्टी या तुमच्या सवयीचाच भाग बनवा -
ज्याप्रमाणे अनेक कंपन्यांमध्ये दररोज सकाळी मॅनेजर्स व कर्मचाऱ्यांची एक मीटींग होते, त्याप्रमाणेच वरील सर्व लहान लहान गोष्टी या कंपनी मॅनेजर्सने आपल्या अंगवळणीच पाडून घ्याव्यात. याखेरीज काही मॅनेजर्स आपल्या कर्मचाऱ्यांना अप्रिशिएट करण्यासाठी चहा, कॉफी देतात, कधी काही खाऊ देतात तर कधी थँक यू कार्ड्सही देतात, अशा कंपनीतील कर्मचारी व मॅनेजर्समधील नाते दृढ व उत्तम असते तसेच यामुळे कंपनीतील वातावरणही उत्साही व आनंदी रहाते.
एकंदरीतच काय की कर्मचाऱ्यांना अप्रिशिएट करण्यासाठी एखादी ऑटोमॅटीक व्यवस्था कंपनीत राबवण्यापेक्षा प्रत्यक्षात तुम्ही जर या लहानसहान गोष्टी न चुकता करत राहिलात तर त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम कर्मचाऱ्यांवर होतो हे कायम लक्षात ठेवा.
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com