मुलांना पॉकेटमनी द्यावा की नाही ?

मागील लेखामध्ये आपण मुलांसोबत पैशांबद्दल बोलावं की नाही हे पाहिलं. अर्थातच पुढील आर्थिक शिस्तीसाठी मुलांना लहानपणापासूनच (वयाच्या सातव्या वर्षांपासून) पैसे वापरणे, खर्च करणे, बचत करणे अशा गोष्टी शिकवायला सुरुवात केली पाहिजे. पण या गोष्टी सांगून नाही शिकविता येत या गोष्टी कृती मधून शिकविण्याच्या आहेत. या लेखात तेच आपण पाहणार आहोत. (मागील लेखाची लिंक )
आपल्या मुलांना पॉकेटमनी द्यावा का ?
पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, त्याचप्रमाणे पैसा हातात आल्याशिवाय तो हाताळावा कसा ते मुलांना कसं शिकता येईल ? म्हणून मुलांना पॉकेटमनी दिला पाहिजे असे माझे मत आहे.
=================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मराठीतून शिकण्यासाठी आजच आमचे व्हॉट्सअ‍ॅप Channel जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/connect येथे क्लिक करा.
=================
पॉकेटमनी म्हणजे केवळ खर्चासाठी मुलांना दिलेले पैसे एवढाच याचा अर्थ नाही. तर मुलांना खर्च, बचत, बजेट, गरज आणि ईच्छा यामंधील फरक शिकविण्यासाठी पालकांनी भरलेली फी आहे असा अर्थ घेऊया.
आणखी एक गोष्ट मुलांना यातून शिकता येईल ते म्हणजे Delayed Gratification. हवी असलेली कुठलीही त्वरित मिळणार असून आपल्या पॉकेटमनी मधील पैसे साठवून नंतरच ती गोष्ट घेता येईल. यासाठी लागणारा self control मुलांना शिकता आला पाहिजे.
१९७२ साली न्यूझीलंड मधील डुनेडीन या शहरातील १००० मुलांचा पुढील ४० वर्षे अभ्यास करण्यात आला होता. त्यात असे लक्षात आले की ज्या मुलांमध्ये लहानपणी कमी self control दिसला होता त्यांच्यामध्येच मोठेपणी अर्थव्यवस्थापनच्या वाईट सवयी आढळल्या.
मुलांना पॉकेटमनी कधी द्यायचा ?
आधी सांगितल्याप्रमाणे वयाच्या सातव्या वर्षांपर्यंत मुलांना पैशांची एक बेसिक समाज येते. काही नवीन खरेदीसाठी पैसे लागतात हे समजते. आणि याच वयात मुलांना बेरीज वजाबाकीचे साधे गणित पण समजते. तेव्हा पॉकेटमनी देण्यासाठी हे योग्य वय आहे.
मुलांना पॉकेटमनी किती द्यायचा ?
साधारण २५ ते १०० रुपये प्रति आठवडा पॉकेटमनी पासून सुरुवात करा. लक्षात ठेवा दर आठवड्याला द्यायचा आहे. त्याच कारण पुढे सांगतो.
जसजशी मुले मोठी होतील तशी पॉकेट्मनीची रक्कम वाढवत न्या.
जर नक्की किती रक्कम द्यायची हे लक्षात येत नसेल तर साधारण गेल्या तीन महिन्यात मुलांच्या गरजा आणि ईच्छा यासाठी तुम्ही किती खर्च केले आहेत त्याचा हिशोब करा. यामध्ये शिक्षणाचा आणि औषधाचा खर्च वगळून इतर खर्च ग्राह्य धरा. आणि त्यावरून दर आठवड्याची रक्कम काढा.

🔴पॉकेटमनी कसा द्यायचा ?
आधी सांगितल्या प्रमाणे दर आठवड्याला पॉकेटमनी द्या. दर आठवड्यात एक दिवस आणि वेळ नक्की करा. आणि न चुकता दर आठवड्याला मुलांना पॉकेटमनी द्या.
पहिल्या पॉकेटमनी सोबत एक नोंदवही पण द्या. ज्यामध्ये मुलांना दर आठवड्याचा खर्च किती आणि कशासाठी झाला ते लिहायचे आहे. मुलांना जास्त आठवायला लागू नये म्हणूनच एक आठवड्याच्या अंतराने पैसे द्या. तसेच दर आठवड्याला पॉकेटमनी दिल्याने या विषयवार संवाद साधण्यासाठी महिन्यातून चार संधी मिळतील.
मुलांना जमत असेल तर एक्सेल शीट किंवा आजकाल मोबाईल मध्ये बरेच अँप्स मिळतात. त्यांचा वापर करूनही हिशोब ठेवता येईल.
🔴पॉकेटमनी कसा वापरायचा ?
सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे !
दर वेळेला पॉकेटमनी मिळाल्यानंतर लगेचच मुलांना त्याचे २०:६०:२० असे तीन भाग करायला सांगा.
२०% Savings - बचतीसाठी (हे पैसे लगेचच पिगी बँक मध्ये जातील.(आम्ही लहानपणी याला गल्ला असे म्हणायचो, योग्य मराठी शब्द माहित नाही !) / मुलं मोठी होतील तेव्हा त्यांना बँक अकाउंट उघडून द्या.
६०% Expenses - खर्चासाठी (हे पैसे खिशात किंवा पाकिटात जातील)
२०% Gratitude - गरजवंतांच्या मदतीसाठी (हे पैसे एखाद्या सामाजिक कामासाठी वापरले जातील. हे पैसे साठवून मुलांच्या हस्ते गरजवंतांच्या मदतीसाठी देण्याची सवय लावा.)
=================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मराठीतून शिकण्यासाठी आजच आमचे व्हॉट्सअ‍ॅप Channel जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/connect येथे क्लिक करा.
=================
🔴आणखी काही महत्वाचे मुद्दे-
▪️ मुलांना पैसे पॉकेटमनी म्हणूनच द्या. घरातील कामाला मदत केली तर त्याबदल्यात कमाई म्हणून पैसे देण्याची चूक करू नका. घरकाम सगळ्यांचे आहे आणि ते जबाबदारी म्हणून सगळ्यांनीच करायचे आहे ही भावना वाढीस लागुद्या. त्यामध्ये पैसे आणू नका.
▪️बऱ्याच वेळेला मुलांना भेट / बक्षीस म्हणून काही अतिरिक्त पैसे मिळतील. ते देखील याचप्रकारे वापरायचे आहेत. शक्यतो, ते पैसे मुलांकडून काढून घेऊ नका. त्यांना वापरायला शिकुद्यात.
▪️ केवळ पॉकेटमनी देऊन आपले काम होत नाही तर मुलांनी त्याचा योग्य हिशोब मांडणे आवश्यक आहे. वहीमध्ये त्यांनी लिहिलेला खर्च अधूनमधून तपासून बघा.
▪️ कधीकधी मुलं तुम्हाला न आवडणाऱ्या वस्तू विकत घेतील. त्याबद्दल त्यांना समजावून सांगा. पण त्या वस्तू हानिकारक/ धोकादायक नसतील तर सहसा विकत घेण्यापासून रोखू नका.
▪️ हिशोबामध्ये थोडीफार चूक असेल किंवा चुकीच्या गोष्टींवर पैसे खर्च केले असतील तरी सयंमाने हाताळा. ओरडू किंवा रागावू नका.
▪️लक्षात ठेवा, मुलांचं पैशासोबत चांगलं आणि आनंदी नातं तयार झालं पाहिजे यासाठी आपण पालक म्हणून ही मेहनत करतोय.

आणि शेवटी फक्त मुलंच खर्चाची नोंद ठेवत आहेत आहेत. आणि आईबाबांना जमाखर्च लिहायची सवयच नसेल तर ही पूर्ण कसरत वाया जाईल. आपल्या खर्चाची वही देखील मुलांना अधूनमधून दाखवत चला. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !!
पुढील लेखात आपण पहिल्या २०% विषयी म्हणजे बचतीविषयी बोलूया.


सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

Salil Chaudhary
A California-based travel writer, lover of food, oceans, and nature.

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy