तुमच्या स्वप्नातला जॉब मिळविण्यासाठी मुलाखतीची तयारी अशी करा... ! (#Career_Wednesday)

अनेक हुशार विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो की त्यांना स्वतःला कधीच नीट व्यक्त करता येत नाही, आणि हीच समस्या, नेमकी जॉबसाठी मुलाखत देताना डोकं वर काढते. मुलाखतीसाठी पॅनलच्या वा कोणाही अधिकाऱ्यांच्या समोर बसल्यावर या हुशार मंडळींचीसुद्धा अक्षरशः त त प प होते. एकीकडे हुशार विद्यार्थ्यांची ही गत, तर जरा सुमार विद्यार्थ्यांना तर केवळ त्यांच्यातला आत्मविश्वास तारून नेतो.
म्हणूनच, मुलाखतीसाठी कशी तयारी करायची याबद्दल आजच्या लेखातून हे सविस्तर मार्गदर्शन -

 1. कंपनीचा अभ्यास करा -

तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी मागण्यासाठी जात आहात त्या कंपनीचा नीट अभ्यास करा. यामुळे तुम्हाला मुलाखतीदरम्यान कंपनीबद्दलची नीट व पुरेशी माहिती असल्याने तुम्ही कंपनीच्या उद्दीष्टांना व ध्येयधोरणांना डोळ्यासमोर ठेऊन त्यानुरूपच उत्तरे द्याल. तसंच, कंपनीची उत्पादने कोणकोणती आहेत, कंपनी कोणत्या सेवा ग्राहकांना पुरवते, कोणत्या क्षेत्रात कंपनी आहे व मार्केटमध्ये कोणत्या स्थानावर आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला मुलाखतीपूर्वीच माहिती असली पाहिजे.

2. कार्य -

ज्या कंपनीत तुम्ही ज्या पदासाठी नोकरी मागायला जात आहात, त्या पदाची व त्या पदाच्या जबाबदारीची तुम्हाला नेमकी माहिती हवी. तसंच, मुलाखतीदरम्यान तुम्ही तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला माहिती असलेल्या जबाबदाऱ्या व तुमचे कार्य याबाबतचे प्रश्न विचारूनही नीट माहिती मिळवून घेतली पाहिजे. यामुळे प्रत्यक्ष कामाला जेव्हा सुरुवात कराल तेव्हा तुमच्या मनात कोणताही गोंधळ नसेल व तुम्ही तुमचे काम चोखपणे करू शकाल.

3. कंपनीच्या वेबसाईट व ब्लॉगवरील माहिती अभ्यासा -

कंपनीची माहिती काढण्यासाठी कंपनीचा ब्लॉग वा वेबसाईट असल्यास त्यावरची माहितीही नीट वाचून काढा. कंपनीतील वातावरण कसे आहे, कंपनीतील तुमचे सहकारी, कंपनीचे मॅनेजर्स या सगळ्याबाबत नीट माहिती करून घ्या. तसेच तुम्हाला त्याबाबत काही प्रश्न पडले तर ते मुलाखतीदरम्यान प्रांजळपणे विचारून घ्या.

4. स्वतःची मूल्य कधीही विसरू नका -

तुमची मूल्य जपा त्याचप्रमाणे कंपनीचीही मूल्य जपण्याची जबाबदारी तुमच्याच खांद्यावर आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे आधी कंपनीची व तुमची वैयक्तिक मूल्य जुळतात की नाही याचाही विचार करून मग त्या कंपनीत नोकरीसाठी जा. बरेचदा कंपनीची मूल्य व व्यक्तिगत आपली मूल्य न जुळल्याने नंतर आपणच त्या ठिकाणी काम करताना कंटाळून जातो, म्हणूनच, ही बाब गंभीरपणे घ्या.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

5. स्वतःला योग्य प्रकारे प्रस्तुत करा -
तुमच्याजवळ असलेली कौशल्य, तुमचे ज्ञान या सगळ्याचा उपयोग तुम्ही कंपनीसाठी नेमका कशाप्रकारे करू शकता याचा नीट विचार करून, तुमच्याजवळच्या वहीत त्याची नोंद घ्या. प्रत्यक्ष मुलाखतीदरम्यान स्वतःला फोकस करणे अनेकांना फार जड जाते, तसेच नोकरी म्हणजे स्वतःतील गुणांना एकप्रकारे कंपनीकरिता विकणे ही कल्पनाच काही जणांना विचित्र वाटते वा नकारात्मक वाटते.. परंतु, तसा विचार करू नका, कारण, कितीही झालं तरीही, तुमच्याजवळील कौशल्यांचा वापर करूनच तुम्ही जीवन सुखाने जगू शकणार आहात आणि नोकरीमध्ये तुम्ही जितका तुमच्या कौशल्यांचा वापर कराल तितका तुमचाच अधिक फायदा असतो हे लक्षात घ्या. त्यामुळे स्वतःच्या गुणांचं, कौशल्यांचं समतोल कौतुक वा सादरीकरण मुलाखतीदरम्यान करण्यात काहीही चूक नाही हे लक्षात ठेवा.

6. प्रत्यक्ष मुलाखतीच्या दिवशी या गोष्टी लक्षात ठेवा -

• मुलाखतीचे स्थळ, त्याचा पत्ता नेमका माहिती करून घ्या. तुमच्या डायरीत त्याची नेमकी नोंद लिखित स्वरूपात केलेली असू देत.
• मुलाखतीच्या वेळेपूर्वीच त्या जागी पोहोचा. उशीरा पोहोचू नका, तसंच अगदी लवकरही पोहोचून तिथे रेंगाळत बसू नका.
• मुलाखतकर्त्यांचे फोन नंबर किंवा कंपनीचे फोन नंबर तुमच्याजवळ नीट सेव्ह करून ठेवा. तुम्ही मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचलात की त्यांना फोन करून वा टेक्स्ट मेसेज करून कळवा.
• तुमच्या रेझ्युमेची हार्डकॉपी व त्याच्या दोन तीन प्रती सोबत असू देत. तसंच मेलवरही पीडीएफ स्वरूपातील तुमचा रेझ्युमे तुमच्याजवळ असू देत.

7. प्रत्यक्ष मुलाखतीदरम्यान -

• तुमच्या रेझ्युमेवर आधारित प्रश्नांसाठी तयारी करून जा.
• विशेषतः जर तुमच्या रेझ्युमेमध्ये दीर्घकालसाठी तुम्ही गॅप घेतलेली दिसत असेल, एक नोकरीसोडल्यावर दुसरी नोकरी लागेपर्यंत मध्ये बराच अवधी गेलेला असेल तर या मधल्या काळाबाबतचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्याची उत्तरं तयार ठेवा.
• प्रामाणिक रहा पण चतुरसुद्धा रहाच -
अनेक पेचात पाडणारे प्रश्न तुम्हाला मुलाखतीदरम्यान विचारले जात असतात. अशा वेळी तुम्ही प्रामाणिकपणे त्यांची उत्तरं देताना, स्वतःची छबीही नकारात्मक दिसणार नाही याची काळजी घेऊन चतुराईने अशी उत्तरे दिली पाहिजेत. यासाठीच आधी मॉक इंटरव्ह्यूची तयारी करा.
उदाहरणार्थ- समजा तुम्हाला विचारलं, की तुम्ही यापूर्वीची नोकरी काही महिन्यातच सोडलेली तुमच्या रेझ्युमेवरून दिसतंय याचं काय कारण होतं..
आणि या प्रश्नाचं खरं उत्तर असेल, की तुम्ही तुमच्या कटकट्या बॉसला कंटाळून नोकरी सोडली, तरीही प्रत्यक्ष मुलाखतीदरम्यान हे उत्तर सांगून तुम्ही तुमचीही नकारात्मक छबी दाखवाल हे लक्षात घ्या. त्यामुळे अशा प्रश्नाचं उत्तर देताना चतुराईने द्या.

8. मुलाखतीचा शेवटचा प्रश्न -

बरेचदा मुलाखततर छान होते पण नेमका हा कनक्लूडींग प्रश्न समोर येतो आणि आपली विकेट काढतो. कारण, तोवर आपण आनंदाच्या भरात आलेलो असतो, सगळी मुलाखत उत्तम झाली असल्याने आपल्याला आता नोकरी मिळाल्यातच जमा आहे असं आपल्याला वाटायला लागलेलं असतं आणि आपण केव्हाच हवेत गेलेलो असतो. त्यामुळे, मुलाखतीत शेवटच्या प्रश्नापर्यंत नीट गंभीरपणे विचार करून उत्तरं द्या.
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com