There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
दोन गावं, काही माकडं आणि काही बकऱ्या यांची ही दंतकथा तुम्हाला गुंतवणुकीचा निर्णय घेण्याबद्दल बरंच काही शिकवून जाईल.
एका गावात एकदा एक माणूस आला. त्याला त्या गावातून काही माकडं खरेदी करायची होती. एका माकडासाठी तो 100 रूपये द्यायला तयार होता. गावकऱ्यांनी आपल्या आणि शेजारच्या गावातली सगळीच्या सगली माकडं पकडली आणि त्या माणसाला प्रत्येकी 100 रूपये या भावाने सगळी विकून टाकली.
थोड्याच दिवसांनी त्या गावात आणखी एक माणूस आला आणि त्याने गावकऱ्यांकडे पुन्हा माकडांची मागणी केली. हा माणूस एका माकडासाठी पूर्वीच्या माणसाहून अधिक म्हणजे तब्बल 200 रूपये खर्चायला तयार होता. एवढी रक्कम मिळणार म्हणून गावकरी क्षणभर खूश झाले पण तितक्यात त्यांच्या लक्षात आले की आता गावात तर एकही माकड नाही. गावातली आणि लगतच्या गावातील सगळी माकडं आता त्या पूर्वीच्या माणसाच्या मालकीची झाली आहेत हे त्यांना आठवलं, म्हणून सगळे गावकरी त्या माणसाकडे गेले आणि ती माकडं परत मागू लागले. सगळी माकडं परत मिळवण्यासाठी त्यांनी त्या माणसाला सगळे पैसेही परत करण्याचं अमीष दाखवलं पण तरीही माणूस काही माकड परत द्यायला तयार होईना. गावकऱ्यांनी पुन्हा त्याची मनधरणी केली आणि प्रत्येक माकडाच्या बदली त्याला 150 रुपये देण्याचं लालुचही यावेळी दाखवलं. सुरुवातीला 150 रुपये, मग 175 रुपये आणि नंतर थेट 199 रुपयाला माकड परत घेण्यापर्यंत बोली लागली, पण तरीही तो माणूस काही कोणत्याही किंमतीत गावकऱ्यांना माकडं परत करायला तयार होईना. खरंतर, त्याला त्या माकडांचा काहीच फायदा नाहीये हे देखील एव्हाना सगळ्यांना लक्षात आलं होतं पण तरीही तो काही तयार होईना. शेवटी, त्यांनी प्रत्येक माकडासाठी 200 रुपये मोजायची तयारी दाखवूनही त्याने नकारच दिला.
गावकऱ्यांना या माणसाच्या अशा वर्तनाचं फार आश्चर्य वाटलं. त्यांना प्रश्न पडला की हा या व्यवहाराला नकारच का देतोय.. अखेरीस एका गावकऱ्याला असं वाटलं की कदाचित आपल्या गावात आता आणखी कोणी माणूस येईल आणि माकडांसाठी पूर्वीच्या दोघांपेक्षाही जास्त रक्कम आपल्याला देऊ करेल. त्याने ही गोष्ट इतरांना सांगताच सगळे गावकरी मनोमनी त्या दिवास्वप्नाने हरखून गेले आणि त्यांनी पुन्हा त्या माणसाकडे जाऊन त्याला प्रत्येक माकडासाठी 300 रूपये खर्चण्याची तयारी दाखवली. एवढा भारी सौदा समोरून चालून आलाय म्हटल्यावर यावेळी मात्र तो माणूस आनंदाने माकडं विकायला तयार झाला. त्याने ती सगळी माकडं गावकऱ्यांना विकून टाकली आणि तो पुन्हा आपल्या गावी जाऊन सुखाने जीवन कंठू लागला.
आता इकडे गावकरी त्या दुसऱ्या माणसाची वाट पाहू लागले. दिवसरात्र, मोठ्या उत्सुकतेने गावकरी वाट पहात होते की आता दुसरा माणूस येईल आणि माकडं घेऊन जाईल ..पण दुर्दैवाने तो माणूस आलाच नाही. गावकरी मात्र प्रतिक्षाच करत राहीले .. पण थांबा, एवढ्यावरच तात्पर्य काढू नका कारण ही गोष्ट इथे संपत नाही.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
या गावालगतच आणखी एक गाव होतं. या गावात एके दिवशी एक माणूस आला आणि त्याने त्या गावातील बकऱ्या खरेदी करण्याची तयारी दर्शवली. एका बकरीसाठी तो तब्बल 1000 रुपये मोजायला तयार होता. बकऱ्यांना एवढा चांगला भाव मिळतोय हा विचार करून गावकऱ्यांनी त्याला सगळ्या बकऱ्या विकून टाकल्या. या गावातही तसंच घडलं, काही दिवसांनी आणखी एक माणूस आला आणि त्याने 2000 रुपयांना एक बकरी या दराने गावातील सगळ्या बकऱ्या खरेदी करण्याची इच्छा दर्शवली. आता गावात एकही बकरी नसल्याने ते गावकरी पुन्हा त्या पहिल्या माणसाकडे गेले, आणि भाव करता करता अखेरीस एका बकरीसाठी तब्बल 3000 रुपये मोजण्याची त्यांनी तयारी दर्शवल्यावर तो माणूस तयार झाला. गावकऱ्यांनी बकऱ्या परत मिळवल्या आणि ते त्या दुसऱ्या माणसाची वाट पहात बसले, या गावातही तेच घडलं, ती दोन्हीही माणसं जी निघून गेली ती पुन्हा कधीच परत आली नाहीत.. गावकरी मात्र प्रतीक्षाच करत राहिले.
पण .. या दोन्हीही गोष्टीत एक छोटासा फरक आहे.
'माकडं' ही 'बकऱ्या' नव्हती...! अर्थात, बकऱ्या जसजशा मोठ्या झाल्या, त्या गावकऱ्यांना पौष्टीक असं दूध देऊ लागल्या आणि गावकऱ्यांना त्यांना मारून खाताही येई. म्हणजेच काय की जरी बकऱ्या विकल्या गेल्या नाहीत तरीही गावकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं होतं असं आपण म्हणू शकत नाही.
पण, माकडांचे मालक झालेले गावकरी मात्र तेवढे भाग्यशाली नव्हते, कारण ही सगळी डी-मॅट माकडं नव्हती, म्हणून गावकऱ्यांना प्रत्येक घरात किमान एक एक माकड सांभाळावं लागलं. त्यांना रोज भरपूर खायला द्यायला लागलं आणि वर त्यांचा गोंधळ आणि ओरडाआरडाही सहन करावा लागला. जेव्हा गावकऱ्यांना लक्षात आलं की ही माकडं आपल्या काहीच कामाची नाहीत तेव्हा त्यांनी त्या माकडांना सोडून दिलं, आणि आपलं झालेलं नुकसानही विसरून जाण्याचं ठरवलं आणि आपल्या या कथेचं हेच खरं तात्पर्य आहे.
स्टॉक मार्केटमध्ये हे असंच आहे. इथे काही चांगल्या कंपनींचे शेअर्स महाग आहेत आणि काही अगदी बेकार कंपनींचे शेअर्ससुद्धा महाग आहेत. जर तुम्ही स्वतः विचार न करता अशा बेकार कंपनीसाठी कितीही रक्कम उधळायला तयार झालात आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्यापेक्षाही आणखी कोणी मूर्ख भविष्यात आपल्याला भेटेल जो आपल्याकडून असे शेअर्स विकत घेईल.. तर इतकंच लक्षात घ्या, की किमान तुम्ही बकऱ्या विकत घ्याल.. माकडं नाही.. !
काय, आलं नं लक्षात ... ?
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com