गुंतवणुकीसाठी योग्य शेअर्स कसे निवडावे ? 

(#Business_Thursday)

मित्रांनो, आजचा आपला लेख खूप महत्त्वाचा आहे. कारण या एका लेखामध्येच तुम्हाला श्रीमंत करण्याची ताकद आहे. शेअर बाजार जुगाराप्रमाणे न खेळता , अभ्यास पूर्वक विश्लेषण करून योग्य शेअर्स मध्ये योग्य वेळी गुंतवणूक केली तर श्रीमंत होता येते यात वादच नाही.

पण मग असे शेअर्स निवडायचे कसे ? मित्रांनो दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीचे शेअर्स निवडण्यासाठी जे विश्लेषण केले जाते त्यास Fundamental Analysis (मूलभूत विश्लेषण) असे म्हणतात.

स्टॉकचे मूलभूत विश्लेषण कसे केले जाते?
स्टॉकचे विश्लेषण करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी सर्वात सोपा मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे.

📌 STEP 1 - आर्थिक कामगिरी

एखाद्या कंपनीची भूतकाळातील आर्थिक कामगिरी कशी आहे याचा अभ्यास करा. यामुळे त्या कंपनीची प्रगती, मिळकत, नफा कमावण्याबद्दलची विश्वासार्हता आणि कंपनीची मिळालेल्या भांडवलाला हाताळण्याची एकंदर क्षमता याची तुम्हाला कल्पना येईल. एखाद्या कंपनीचा मागील पाच ते दहा वर्षातील डाटा अभ्यासून ही सर्व माहिती तपासता येऊ शकते. त्यासाठी कंपनीचे फायनान्शिअल रेशिओज खालील पद्धतीने तपासता येऊ शकतात.

✔️ Basic EPS - अर्थात एखाद्या कंपनीचा बेसिक अर्निंग रेशिओ. सोप्या शब्दात सांगायचं तर, प्रत्येक शेअर मागे कंपनी किती नफा कमावते हा अंदाज आपल्याला या रेशिओवरून येतो. जेवढा हा रेशीओ जास्त तेवढा चांगला.

✔️ CASH EPS - कंपनी प्रत्येक शेअरमागे किती नगद रक्कम मिळवते हे यावरून समजते. हा देखील जेवढा जास्त तेवढा चांगला.

✔️ Net Profit Margin - यावरून तुम्हाला कंपनीच्या एकूण विक्री व त्यातून मिळालेल्या नफ्याचा अंदाज येईल. नेट प्रॉफीट मार्जिन टक्केवारीमध्ये समजतो. अधिक टक्केवारी म्हणजे कंपनी ग्राहकांकडून भरपूर दर आकारून कंपनीच्या खिशात नफा घालते आहे हे थेट समजते.

✔️ Debt or Equity Capital - यावरून कंपनीचे भांडवल नेमके कसे वापरले जात आहे याचा अंदाज येऊ शकतो. भरपूर कर्ज (Debt) डोक्यावर असलेल्या कंपनीत गुंतवणूक करणे हे केव्हाही धोकादायक असू शकते कारण नफा नाही झाला तरीही कंपनीला कर्जाची परतफेड करणे अनिवार्य असते, आणि यामुळे कंपनीचं अक्षरशः दिवाळं निघू शकतं. त्याउलट कमी कर्ज डोक्यावर असलेली किंवा अजिबात कर्जात न बुडालेल्या कंपनीलाच प्राधान्य द्यायला हवे.

✔️ ROCE (Return on Capital Employed) - एखादी कंपनी आपले भांडवल किती कुशलतेने वापरत आहे हे यावरून समजते. उदाहरणार्थ, समजा एखाद्या कंपनीकडे 100 रूपये भांडवल असेल व त्यावर ती कंपनी 20 रूपये नफा कमवत असेल तर याचा अर्थ कंपनीचा ROCE 20 टक्के आहे. ज्या कंपनीचे ROCE अधिक त्या कंपनीत गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे कारण त्यावरून आपल्याला कळते की कंपनीची आपल्याजवळील मालमत्तेवर उत्तम पकड आहे व कंपनी उत्तमप्रकारे आपला बिझनेस करण्याची क्षमता राखून आहे.

✔️ Dividend per share - यावरून कंपनी प्रति शेअर किती लाभांश देते याचा रेशिओ म्हणजे प्रति शेअर लाभांश. कंपनी आपल्या प्रत्येक शेअरहोल्डरला जो नफा वाटते त्याला लाभांश असे म्हणतात. ज्या कंपनीचा लाभांश सातत्याने वाढत असतो ती कंपनी गुंतवणूक करण्यासाठी उत्तम असते.
(प्रत्येक कंपनीचे आर्थिक अहवाल, आणि वर दिलेले रेशीओ गुगल मध्ये एका क्लिक वर उपलब्ध होतात.)

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

📌 STEP 2 - वार्षिक अहवालांचा अभ्यास -
एखाद्या कंपनीच्या मागील तीन वर्षांच्या वार्षिक अहवालांचा अभ्यास करणे नेहमी फायदेशीर असते. यामुळे कंपनीचे उद्दीष्ट, लक्ष्य आणि त्यानुरूप कंपनीची सुरू असलेली कामगिरी याचा नेमका अंदाज येऊ शकतो. जी कंपनी थेट व विशिष्ट कालमर्यादेत मिळवण्याची उद्दीष्ट समोर ठेऊन काम करताना दिसते ती अधिक व्यावसायिक पद्धतीने काम करत असते.

📌 STEP 3 - भविष्यातील योजना -
प्रत्येक कंपनीच्या आपापल्या अशा काही भविष्यातील योजना व्यवसायासंबंधीच्या असतात. त्यांचा अभ्यास केल्यास त्या कंपनीचे भविष्य नेमके काय व कसे असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

📌 STEP 4 - चोखंदळ विश्लेषण -
एखाद्या कंपनीत गुंतवणूक का करायची याबद्दल चोखंदळपणे विश्लेषण करून ते नीट कारणासह लिहून काढायला हवे. असे म्हटले जाते, जर तुम्ही असे नीट सकारण विश्लेषण लिहू शकला नाहीत तर त्या कंपनीत तुम्ही गुंतवणूक करू नये हेच उत्तम

📌 STEP 5 - योग्य किंमतीची वाट पहा -
सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे, योग्य वेळेची आणि योग्य किंमतीची वाट पहा. अर्थात, गुंतवणूक करताना, एखाद्या कंपनीचा स्टॉक खरेदी करण्यासाठी त्या कंपनीचे शेअर्स उतरेपर्यंत थांबा आणि त्यासाठी जास्त वेळ लागला तरीही थांबा. एकदम पैसे गुंतवू नका. पैसा गुंतवताना योग्य दराने गुंतवा व तो अपेक्षित दर मिळवण्यासाठी योग्य वेळेची वाट पहा. अगदी तसंच स्टॉकची विक्री करतानाही लागू होतं.

तुम्हाला जरी हे सगळं खूप कठीण किंवा वेळखाऊ वाटत असलं तरीही विश्वास ठेवा, हे सगळं करणं, खरंच खूप खूप महत्त्वाचं आहे. कारण या सगळ्याचा जो परतावा मिळेल तो केलेल्या मेहनतीच्या कीतीतरी पटीने जास्त असेल. आणि मुख्य म्हणजे fundamentals चांगले असलेल्या शेअर्स मध्ये तोटा होण्याचा धोका खूपच कमी असतो.

म्हणजे फायदा झाला तर प्रचंड, आणि तोटा झाला तर खूप कमी !!

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy