There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
हल्लीचा जमाना फार फार स्पर्धात्मक झालेला आहे. तुमची एक छोटीशीही चूक तुम्हाला फार महागात पडू शकते हे तुम्ही जाणताच. अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिथे जगभरात बेरोजगारी वाढलेली आहे, अशा वेळी जेव्हा एखाद्याला एखाद्या ठिकाणाहून नोकरीसाठी मुलाखतीचे बोलावणे येते तेव्हा त्याला वा तिला अत्यंत आशावादी वाटू लागते. मात्र, मुलाखतीचे दडपणही मनावर तितकेच आलेले असते. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या पाच चुकांविषयी ज्या मुलाखतीदरम्यान तुम्ही टाळायलाच हव्यात -
1. नजर चोरू नका -
जेव्हाही मुलाखत द्यायला जाल तेव्हा अत्यंत आत्मविश्वासपूर्ण असा तुमचा वावर हवा. मुलाखत घेणाऱ्या पॅनलसमोर कधीही नजर चोरू नका. तुमचे म्हणणे आत्मविश्वासाने मांडा. लक्षात घ्या, नजर तेच चोरतात ज्यांच्या मनात काहीतरी सल असतो किंवा कसलंतरी दडपण असतं. जेव्हा मुलाखत घेणारी व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारते तेव्हा तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिल्यास ते अधिक परिणामकारक ठरतं व तुमचा आत्मविश्वास त्यातून झळकतो. समजा, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर क्षणभर नजर दुसरीकडे नेऊन पुन्हा मुलाखत घेणाऱ्यांच्या नजरेला नजर भिडवून तुम्ही, तुम्हाला अमुक प्रश्नाचं नेमकं उत्तर माहिती नसल्याचं प्रामाणिकपणे व प्रांजळपणे सांगा. त्यामुळे तुमचं स्वच्छ मन व प्रामाणिकपणा अधोरेखित होईल आणि त्यानेच तुमची वेगळी छाप पडेल.
2. खुर्चीवर ताठ बसा -
आपली देहबोली सांभाळणं हे मुलाखतीदरम्यान विशेषतः फार महत्त्वाचं असतं. याचं कारण, आपल्या देहबोलीतून आपण खरे कसे आहोत ते आपण प्रकट करत असतो. खुर्चीवर एकदम रिलॅक्स बसणं, किंवा सोफ्यावर एकदम आरामात टेकून बसणं असं बॉडीपोश्चर हे खूप कॅज्युअल वाटू शकतं. यामुळे तुमचं एकदम वाईट इम्प्रेशन मुलाखत घेणाऱ्यावर पडतं व त्यांना एकंदरीतच तुमचा कामाचा एटीट्यूडच कॅज्युअल वाटू शकतो. त्यामुळे तुमची देहबोली खूप गांभीर्याने घेणं अत्यावश्यक आहे. खुर्चीवर हाताची घडी घालूनही बसल्यास समोरच्यांना तुम्ही काहीतरी दडवत आहात अशी भावना निर्माण होऊ शकते, त्यामुळे लक्षात घ्या, एकदम ताठ, हाताची घडी घालून वगैरे बसू नका तसंच अगदी आरामातही बसू नका. तुमच्या देहबोलीतून एक छान समतोल असं तुमचं व्यक्तीमत्व दिसू द्या.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
3. सतत मान हलवणे टाळा -
तुम्हाला मुलाखत घेणाऱ्यांपैकी कोणीही जेव्हा प्रश्न विचारू लागतो तेव्हा तुम्ही साधारणपणे तोंडाने होकार नकार देण्याऐवजी मान हलवून मानेनेच होकार, नकार देता.. जे ठीकच असतं, पण अनेकांना सतत मान हलवूनच बोलण्याची सवय असते. तसं करू नका. विशेषतः समोरच्याच्या प्रत्येकच बोलण्यावर होकारार्थी मान हलवण्याची काही जणांची सवय असते. त्यामुळे ते सतत अगदी होयबा असल्यासारखे मान हलवत रहातात. असे करणारे उमेदवार मुलाखतीदरम्यान कधीही पुढे सिलेक्ट होऊ शकत नाहीत याचं कारणचं हे असतं की अशा उमेदवारांना स्वतःच मत नाही हे त्यांच्या या देहबोलीवरून थेट सिद्ध होतं.
4. थरथरत्या हाताने केलेले हस्तांदोलन -
कोणालाही पहिल्या भेटीत आपलंस करण्याचं किंवा त्या व्यक्तीच्या मनावर राज्य करण्याचं गुपित तुमच्या त्याच्याशी झालेल्या पहिल्या हस्तांदोलनात दडलेलं असतं. तुम्ही जर का घाबरत घाबरत, बिचकतच समोरच्याशी हस्तांदोलन केलंत तर ते त्या व्यक्तीला लगेच जाणवतं आणि मुख्य म्हणजे तुमच्यात आत्मविश्वासाची कमी आहे हे देखील समोरची व्यक्ती लगेच ओळखून घेते. तुमच्या हातात जेव्हा समोरची व्यक्ती हात देते तेव्हा त्या व्यक्तीला तुमच्या हस्तांदोलनातून जबाबदार नि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तीमत्त्वाची भेट व्हायला हवी असते. जेव्हा तुम्ही तो विश्वास समोरच्याला केवळ हस्तांदोलनातून देऊ शकता तेव्हा तुमचा जॉब पक्का होण्याचे चान्सेस कैक पटींनी वाढतात.
5. चुळबुळ करू नका -
अनेकजण मुलाखतीला गेले की त्यांना खूप ताण येतो, त्यापायी ते आपल्या हातापायांची वा शरीराची अकारणच खूप हलचाल करायला लागतात. सतत हातातील पेन वा पेन्सिलशी चाळा करत रहाणे, सतत पाय हलवत रहाणे, सतत खुर्चीवर मागेपुढे होत रहाणे किंवा कान खाजवणे असल्या कोणत्याही एखाद्या सवयीवर ते अवलंबून रहातात. एकंदरीतच मुलाखतीदरम्यान जो शांतपणा व स्वस्थपणा हवा, जो आत्मविश्वास दिसावा तो त्यांच्यात दिसतच नाही व त्यांच्या अशा सवयीमुळे ते स्वतःही एकचित्त असू शकत नाहीत. याचा परिणाम नकारात्मकच होतो व मुलाखत घेणारी व्यक्ती वा पॅनल अशा उमेदवाराला .. मग तो उमेदवार कितीही हुशार का असेना, त्याची वा तिची निवड करताना हजारो वेळा विचार करतो. तसंच, तुमची अशी एखादी सवय ही पूर्ण मुलाखतीचे वातावरण बिघडवू शकते, व त्याचे गांभीर्य कमी करू शकते हे लक्षात घ्या.
मित्रांनो, आलं ना लक्षात, या छोट्याशा सवयीही किती नकारात्मक परिणाम साधू शकतात. म्हणूनच मुलाखतीसाठी जाण्यापूर्वी छान तयारी करून जा. आरशापुढे उभं राहून आपली देहबोली तपासा, व त्यात योग्य त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. सराव केल्याने तुम्हाला देहबोलीत सुधार करणे नक्कीच शक्य होईल.
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com