जीवनात सकारात्मकता जितकी महत्त्वाची आहे तितकंच महत्त्वाचं आहे नकारात्मक गोष्टींपासून, व्यक्तींपासून लांब रहाणं !
आता हेच बघा ना, शाळेत जर तुम्हाला कोणी चिडवलं, समजा तुमच्या दिसण्यावरून किंवा रंगावरून किंवा अन्य कोणत्याही गोष्टीवरून तर आठवा तुम्ही काय करायचात.. ? त्या मित्रांपासून चार हात लांब रहायचात.. अगदी तसंच, तुमचं जीवन जर छान फुलावं असं तुम्हाला वाटत असेल तर नकारात्मक गोष्टींपासून लांब रहायला शिका. त्यासाठी जाणीवपूर्वक स्वतःला विकसीत करा.
आता हीच बाब तुमच्या आत्मसंवादाशीही निगडीत आहे. आत्मसंवाद करताना जर तुम्ही स्वतःच स्वतःला असं सारखं कशाकशावरून कमी लेखत राहिलात, स्वतःच स्वतःला चिडवत राहिलात तर तुमची नकारात्मकता वाढतच जाईल. किंबहुना, या एकाच गोष्टीमुळे खरंतर तुम्ही तुमच्या जीवनाच्या लढाईत उतरण्यापूर्वीच स्वतःला हरवलेलं असेल. छोट्या छोट्या गोष्टीतला नकार पचवता न येणं, आपल्या कल्पना जर कोणाला आवडल्या नाहीत आणि कोणी आपली थट्टा केली तर मनाला लावून घेणं या साऱ्यामुळे नंतर आपलं व्यक्तिमत्व नकारात्मकच होत जातं. म्हणूनच ही अशी नकारात्मक विचारसरणी फार घातक असते. नकारात्मकतेमुळे निराशा आणि ताण आणि चिंता दिवसागणिक वाढतच जातात, तसंच, विचार करण्याची, अडचणींवर मात करण्याची क्षमता हळूहळू हरवत जाते, दृष्टीकोन बाधीत होत जातो आणि परस्पर संबंध खराब होत जातात.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
नकारात्मक व्यक्तींची काही स्वभाववैशिष्ट्ये
✔️ अशा व्यक्तींचं लक्ष केवळ अडचणी आणि अडथळ्यांवर असतं. एखादी समस्या आल्यास ती कशी सोडवायची वा कशी सोडवता येईल याकडे त्यांचं लक्षचं नसतं, त्याऐवजी ते सतत अडचणी व समस्यांचा विचार करण्यातच अडकलेले असतात.
✔️ अशी व्यक्ती नेहमी दुसऱ्यांवर आपल्या चुकांचं खापर फोडत असते. आपल्या चुकांसाठी नेहमी दुसऱ्यांना दोष देत असते.
✔️ हो .. पण .. हा पणच या व्यक्तिंच्या जीवनातील मोठा अडथळा असतो. मी एखादी गोष्ट करू शकतो, करू शकते .. पण, किंवा अमुक एक गोष्ट मला करायची होती .. पण .. अशी यांची समस्यांची गाडी नेहमीच पण नावाच्या अडथळ्यापाशी अडकलेली असते.
✔️ एखादी छोटीशी चूकही यांना फार मोठी वाटते. या छोट्याशा चुकीला ते इतकं महत्त्व देतात की लवकरच या चुकीचा त्यांच्या मनात फार 'मोठा बाऊ' झालेला असतो.
✔️ यांच्या मनात इतरांविषयी आधीच नकारात्मकता निर्माण झालेली असते, आणि एखाद्याविषयी मनात आधीच नकारात्मकता बाळगलेली असली की मग ती व्यक्ती खरंच प्रत्यक्षात कशी आहे हे जाणून घेण्याची नकारात्मक व्यक्तिंना कधीच इच्छाही उरत नाही.
एखाद्या विचाराचं नेहमी सामान्यीकरण करण्याची यांची सवय असते. उदाहरणार्थ - माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही, मला सगळेच मूर्ख समजतात.. वगैरे विचारांनी यांनी स्वतःला ग्रासलेलं असतं.
✔️ बरेचदा अशा व्यक्ती स्वतःला किंवा कधी क्वचित प्रसंगी इतरांनाही, ' मी अमुक एक गोष्ट करायला हवी होती' , किंवा आपण 'तमुक एक गोष्ट करण्याऐवजी अमुक एक गोष्ट करायला हवी होती' असे सल्ले वेळ निघून गेल्यावर देत असतात ज्याचा काहीच उपयोग प्रत्यक्षात होत नाही.
✔️ हे कोणत्याही गोष्टीकडे एकतर काळ्या नाहीतर एकदम पांढऱ्या चष्म्यातून (अर्थात दृष्टीकोनातून) बघत असतात. यांना ग्रे शेडमधलं काहीच कधीच दिसत नाही वा पहाता येत नाही. म्हणजे असं म्हणतात, की कोणतीच व्यक्ती पूर्ण चांगली वा पूर्ण वाईट नसते, माणसं नेहमी या दोन्हीच्या मध्ये असतात पण नकारात्मक माणसांना इतरांमधला चांगुलपणा कधीच दिसत नाही.
तर मित्रांनो, अशी ही नकारात्मकता आणि नकारात्मक माणसं. आपल्याला जर आपलं जीवन घडवायचं असेल तर अशा नकारात्मक दृष्टीकोनापासून आणि नकारात्मक व्यक्तींपासून लांबच रहायला हवं..!
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!