जगप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी
भारतीय जीवनशैलीचे जगाला ज्ञान देणारे, जागतिक कीर्तीचे प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी ...
केवळ एका जागी काहीच न करता बसून तुमचं जीवन घडणार नाही, जीवन घडवायचं असेल तर कॅलक्युलेटेड रिस्क घ्यायला शिका, मनाची शक्ती वाढवा.
तुमच्या मनाची कवाडं उघडा, तुमच्या मनातील असंख्य भीतींचा सामना करा. अकारणंच ज्या गोष्टींचा बाऊ तुमचं मन करतंय, त्या मानसिक मर्यादा भेदून स्वतःतील अभेद्य माणूस शोधा.
वेदना हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पण कोणत्या वेदना स्वीकारायच्या आणि कोणत्या नाही हा निर्णय मात्र तुमचा असतो. 'आजारपणाच्या वेदना हव्या की व्यायामाच्या ..?' निर्णय तुमचा असतो.
जेव्हा जीवनात तुम्ही तुमच्या उद्दीष्टावर लक्ष्य केंद्रीत करायला लागता त्या क्षणापासून तुम्हाला तुमच्या भवतालच्या कोणत्याही नकारात्मक गोष्टींचा त्रास होणं बंद होतं.
जीवनाचे निरनिराळे रंग आहेत. त्या रंगांमुळेच तर जीवनाला अर्थ आहे. एखाद्या वाईट क्षणामुळे कोणत्याही व्यक्तीला आजन्म जोखत रहाणे अयोग्य आहे. विश्वास ठेवा, "जीवन पुन्हा फुलून येईल...!"
आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी, फसवणारी माणसं भवताली आहेत..पण ते फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृती चोरू शकतात. त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कला, शक्ती, ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही.
पैसा, प्रतिष्ठा, सत्ता यांपेक्षाही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती. मन थाऱ्यावर नसेल तर अन्य कोणतीच गोष्ट काहीच कामाची नाही. आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे हीच सर्वात मोठी 'पॉवर' आहे.
जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर सर्वप्रथम तुमची संगत तपासा. अशा लोकांपासून लांब रहा ज्यांना तुमचा राग येतो, तुमचा मत्सर वाटतो, जे सतत तुम्हाला मागे खेचतात, आणि अशा वातावरणात जाऊ नका जिथे तुम्हाला असुरक्षित वाटतं.
जर तुमच्या मनात तुम्ही मिळवलेल्या यशाबद्दल अहंकार असेल तर ते यशही अपयशासमानच असतं.पण जर तुम्ही नम्र असाल तर अपयशी असूनही तुम्ही खरे यशस्वी झालेले असता.