कॉमन सेन्स !

अठराव्या शतकामध्ये कॅलिफोर्निया मध्ये गोल्ड रश होती. गोल्ड रश म्हणजे सोन्याच्या खाणी शोधून सोनं काढण्यासाठी पूर्ण अमेरिकेतील लाखो लोकांनी कॅलिफोर्निया आणि आसपासच्या भागांमध्ये गर्दी केली केली होती. साधारण 3,00,000 खाण कामगार तेव्हा वेगवेगळ्या भागातून आले होते.

लेव्ही स्ट्रॉस आणि त्याचा मेहुणा डेविड स्टर्न यांना लक्षात आले की एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या कामगारांना कपडे, ब्लांकेट्स, जॅकेट, बटन, कात्र्या इत्यादी वस्तू लागतील. त्यांनी अशा विविध प्रकारच्या उपयोगी वस्तू आसपासच्या दुकानांमध्ये जाऊन विकायला सुरुवात केली.

एवढेच नव्हे तर घोड्याच्या पाठीवर सर्व सामान लादून त्यांनी थेट कामगारांना गाठून विकायला पण सुरुवात केली. या खाण कामगारांशी बोलत असताना त्यांच्या लक्षात आलं की सर्व कामगारांची एकच तक्रार असायची . ती म्हणजे ते जे कपडे वापरत होते ते सतत फाटायचे. आणि प्रामुख्याने त्यांचे खिसे जास्त फाटत असत. यावर उपाय म्हणून लेव्ही स्ट्रॉस याने आपल्याकडच्या चांगल्या जाड्याभरड्या कापडाच्या पॅन्ट बनवून विकायला सुरुवात केली. या पँट्स ना चांगला प्रतिसाद मिळाला.

लेव्ही स्ट्रॉस कडील ते जाड कापड लवकर संपलं. त्याने "सर्ज डेनाइम" या नावाचं एक वेगळं कापड मागवलं. याच कापडाला पुढे डेनिम या नावाने ओळखलं जाऊ लागलं.

याच दरम्यान डेविस नावाच्या एका टेलर ने कपड्यांमध्ये धातूंच्या रिवेट्स बसवण्याचे तंत्र विकसित केले. पॅन्ट मध्ये खीशांच्या शिवणीवर जेथे सर्वाधिक ताण येतो तिथे रिवेट्स आल्यामुळे खीसे फाटणे बंद झाले. डेविस कडे पुरेसा पैसा नसल्याने त्याने लेव्ही स्ट्रॉस बरोबर भागीदारी करून या रिवेटस बसवण्याचं पेटंट घेतलं.
आज आपण ज्या जीन्स वापरतो त्यामध्ये देखील असे धातूंचे रिवेज लावलेले पाहता येतात.

मित्रांनो, लेव्ही स्ट्रॉस हा आज जगातला जीन्स पॅन्ट चा मोठा ब्रँड आहे.

===================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
===================

या यशोगाथे कडे नीट पाहिलं तर लक्षात येईल ती त्यांच्या बिजनेस यशामागे काही फार मोठा धोरणात्मक विचार नव्हता. जे त्यांनी साधलं तो काही चमत्कारही नव्हता. या त्यांच्या यशामागे होतं कॉमन सेन्स.

प्रश्न शोधून त्यावर सोपे उपाय ग्राहकाला लवकरात लवकर देणे एवढच. बऱ्याचदा आपण उगाचच एखाद्या इनोव्हेटिव्ह आयडिया शोधण्याच्या मागे लागतो, काहीतरी भन्नाट बिझनेस कल्पना मिळाली तर मी यशस्वी होईन असं आपल्याला वाटत राहतं. पण खरं तर ग्राहकांच्या सोप्या प्रश्नाचे उत्तर शोधून त्यांना दिलं, तर ते आणखी प्रश्न सांगतात, त्यावर आपण आणखीन उत्तर शोधायची, मग ते आणखी नवे प्रश्न विचारतील.... त्यांच्यासाठी उत्तर शोधताना कधीतरी आपल्याला भन्नाट आयडिया मिळालेली असेल. इनोव्हेशनची प्रोसेस ही अशी असते.

आजच आपल्या आसपासचे बदल लक्षपूर्वक बघा.... त्यामध्ये कोणते प्रश्न दडलेले आहेत ते शोधा.... आणि त्यावर काय सोपे उपाय आपल्याला करता येईल यावर विचार करा. कोरोना काळात कोणी वेगवेगळ्या स्टाईल चे मास्क बनवले, कोणी स्पर्श न करता सामानाची देवाणघेवाण करता यावी असे मशिनच बनवले, रिक्षामध्ये ग्राहक आणि चालकाच्या मध्ये बसणारा पडदा बनविला..... तर कोणी प्रेशर कुकर चा वापर करून वाफ घेता येण्यासाठी मशीन बनवलं..... ही सगळी उदाहरणं लोकल प्रॉब्लेम्सना शोधलेली लोकल सोल्युशन्स आहेत. यामधून मोठा बिझनेस कदाचित उभा राहणार नाही परंतु भविष्यात मोठ्या होणाऱ्या एखाद्या बिजनेस ची सुरुवात यांच्यापैकीच एक असू शकेल.

कॉमन सेन्स नावाप्रमाणे तितकसं कॉमन नसतं..... आणि खूप काही कठीणही नसतं !

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com