व्यवसायवृद्धीसाठी जपा विश्वासार्हतेचे नाते (#Buz_Thirsday)

एका अभ्यासात असे आढळून आले की ज्या उद्योगसमूहांनी आपल्या कामाच्या ठिकाणी विश्वासार्हतेचे नाते जाणीवपूर्वक विकसीत केले व जपले अशा ठिकाणचे कर्मचारी अधिक उत्पादनक्षम असतात. त्यांच्यात काम करण्याचा दांडगा उत्साह असतो, त्याचबरोबर त्यांच्या मनात आपल्या सहकाऱ्यांप्रती प्रेम आणि विश्वास असतो आणि अशा कंपनीतले कर्मचारी दीर्घकाळपर्यंत त्या उद्योगसमूहाशी एकनिष्ठ रहातात. त्याचबरोबर अशा उद्योगव्यवसायांशी जोडलेले कर्मचारी हे अधिक आनंदी, तणावमुक्त जीवन जगतात आणि याचा थेट परिणाम त्यांच्या कामावर होतो, ते त्यांचं कामही अधिक आनंदाने व जबाबदारीने पूर्ण करतात.

2016 मध्ये झालेल्या ग्लोबस सीईओ सर्वेक्षणात सुमारे 55 टक्के सीईओंनी असे सांगितल्याचे आढळून आले की त्यांच्या कंपनीत विश्वासार्हतेची कमी हा एकमेव अडथळा असल्याचे त्यांना वाटते. ज्या कंपनीत विश्वासार्ह वातावरण नाही त्यांच्या तुलनेत ज्या कंपनीत विश्वासार्ह वातावरण आहे तेथील कर्मचाऱ्यांमध्ये तुलनेने 74 टक्के कमी ताण होता, 106 टक्के अधिक एनर्जी होती, 50 टक्के जास्त उत्पादनक्षमता होती, 13 टक्क्यानी कमी आजारपणासाठी घेतलेल्या सुट्ट्या होत्या, 76 टक्के अधिक एकाग्रता होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अशा कंपनीतील कर्मचाऱ्यांची एकूण जीवनाप्रती समाधानाची पातळी ही इतरांच्या तूलनेत 29 टक्के जास्त होती.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासार्हतेची भावना कशी निर्माण करायची ?

कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासार्हतेची भावना निर्माण झाली तर त्याचा उत्तम परिणाम साधला जातो व अर्थातच त्यामुळे काम चांगले होते व कंपनीची झपाट्याने प्रगती होते. परंतु, ही विश्वासार्हतेची भावना निर्माण करणे हेच मुळी एक आव्हान असू शकते. म्हणूनच त्यासाठी काही पावले जाणीवपूर्वक उचलायला हवीत आणि ते काम कंपनीचे व्यवस्थापन मंडळ जाणीवपूर्वक करू शकते. त्यासाठी खालील बाबींचा विचार केला जाऊ शकतो -

1. गुणवत्तेला वाव द्या -

मज्जातंतूशास्त्र (न्यूरोसायन्स) असे सांगते, की गुणवत्तेला दाद देणे, वाव देणे याचा थेट संबंध विश्वासार्हतेशी असतो. जेव्हा गुणवत्ता ओळखून त्यास दाद दिली जाते तेव्हा आपसूकच अशा गुणग्राहक व्यक्तीविषयी मनात विश्वास निर्माण होतो. सहकाऱ्यांकडून मिळणारी दाद, वरिष्ठांकडून मिळणारी दाद आणि लोकांकडून मिळणारी दाद या साऱ्याचा सकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो. जेव्हा एखाद्याच्या गुणवत्तेला दाद मिळते तेव्हा त्याच्या सहकाऱ्यांमध्येही तशी दाद मिळविण्याची आशा पालवली जाते, व त्यांच्या मनात ते ध्येय गाठण्याची इच्छा निर्माण होते.

2. कर्मचाऱ्यांना द्या योग्य आणि पुरेसा ताण -

जेव्हा मॅनेजर आपल्या कर्मचाऱ्यांना वा टीमला कठीण परंतु साध्य करता येईल असं काम देतात तेव्हा त्या संघात वा कर्माचऱ्यांच्या मनात एक योग्य, पुरेसा ताण निर्माण होतो. जेव्हा विस्कळीत आणि अशक्य ध्येय कर्मचाऱ्यांपुढे ठेवली जातात तेव्हा मात्र कर्मचारी अशा कामांपुढे सुरुवातीपूर्वीच हार मानतात.

3. कर्मचाऱ्यांना कामाचे स्वातंत्र्य द्या -

याबाबत 2014 मध्ये सिटीग्रुप आणि लिंक्डइनने केलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले, की ज्या कर्मचाऱ्यांना कामाचे स्वातंत्र्य मिळते ते अधिक विश्वासू असतात, कारण असे स्वातंत्र्य मिळणे हेच त्यांच्यासाठी प्रेरक ठरते. तसंच, या सर्वेक्षणात असेही आढळून आले की तब्बल अर्ध्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी तर त्यांना जर कामाचे स्वातंत्र्य मिळाले तर त्याऐवजी त्यांना मिळणाऱा 20 टक्के अधिक पगारावरही हसत हसत पाणी सोडले.

तर, कंपनीत विश्वासार्ह वातावरण कसे निर्माण करायचे याबाबत आणखीही काही मुद्दे सविस्तर जाणून घेऊयात पुढल्या भागात .. पुढल्या गुरूवारी..

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com