३ इडियट्स चित्रपटासाठी ड्रोन बनवणाऱ्या तरुणांनीच भारतातील सगळ्यात मोठी ड्रोन कंपनी बनवली ! (#Friday_Funda)

आपल्या जीवनात आपल्या वाटेला जे जे अनुभव येतात त्यातून तर आपण शिकत असतोच, घडत असतोच, पण इतरांच्याही अनुभवातून आपल्याला शिकता आलं पाहिजे, तसंच, इतरांवर आलेल्या संकटातून आपल्याला आपलं ज्ञान बुद्धि व शिक्षण पणाला लावून समाजोपयोगी असं ठोस कार्यही करता आलं पाहिजे. आजच्या घडीला असे अनेक उद्योग व्यवसाय यशस्वी झालेले तुम्हाला दिसतील ज्या उद्योगव्यवसायांनी इतरांवर आलेल्या संकटातून, अडचणीतून मार्ग काढण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली.

आठवतोय मित्रांनो तो काळा दिवस .. ज्या दिवशी मुंबईतील ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला होता.. बरोबर .. 26-11 चा हल्ला.. देशावर जेव्हा इतकं मोठं संकट कोसळलं होतं, तेव्हा आपल्याच देशातील चार युवक तंत्रज्ञानाचा वापर करून अशा संकटांना कशाप्रकारे प्रतिउत्तर देता येईल याचा विचार करून काहीतरी ठोस पावलं उचलण्याच्या तयारीत होते.

ते 2008 चं वर्ष होतं. त्यावर्षी झालेल्या त्या भयंकर, भीषण हल्ल्याचं थरारक प्रक्षेपण टीव्हीवरून सारा देश बघत होता, आणि तेच प्रक्षेपण अंकीत मेहता, राहूल सिंघ आणि आशिष भट हे चौघेजण आपल्या घरातून टीव्हीवरून पहात होते. त्या थरकाप उडवणाऱ्या प्रक्षेपणाचे वेळी त्यांना लक्षात आलं की ते जी ड्रोन टेक्नॉलॉजी शिकत आहेत त्याचा उपयोग अशा संकटप्रसंगी निश्चितच उत्तमरित्या करता येऊ शकतो. खरंतर तोवर ते चौघेही जण ड्रोन टेक्नॉलॉजीवर केवळ आवड म्हणून काम करत होते पण त्या दिवशी डोळ्यांपुढे जो बाका प्रसंग त्यांनी पाहिला तेव्हा त्यांना त्यांच्या शिक्षणाचं महत्त्व जाणवलं, त्यातूनच जन्म झाला तो त्यांच्या ideaforge या स्टार्टअप कंपनीचा.. ही कंपनी असे ड्रोन्स तयार करू लागली ज्यांचा वापर आपल्या देशाला होईल. विशेषतः अशाप्रसंगी, जेव्हा कुठे एखाद्या ठिकाणी शत्रूंनी वेढा घातलेला असेल किंवा कोणा मनुष्याला ओलीस ठेवलेलं असेल अशा बिकट प्रसंगांना हे ड्रोन्स सामोरे जातील. कंपनीने तयार केलेले ड्रोन्स अल्पावधीतच इतके लोकप्रिय झाले की कंपनीला गेल्या वर्षी जानेवारीमध्ये भारतीय लष्कराकडून 20 मिलीअन डॉलरचं काँट्रॅक्टही मिळालं. या काँट्रॅक्टद्वारे कंपनीला भारतीय लष्करासाठी हाय अल्टीट्यूडचे ड्रोन्स तयार करण्याचं काम देण्यात आलं होतं.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

गंमत म्हणजे, या कंपनीच्या ड्रोन्सची झलक आपणही सगळ्यांनी पाहिलेली आहे. कुठे माहितीये...?
'3 इडियट्स' या मूव्हीमध्ये..! बरोबर तोच तो सीन ऑल इझ वेल गाण्यातला .. जेव्हा बाबा रणछोडदास ड्रोन यशस्वीरित्या उडवतो आणि दुसऱ्या मजल्यावर त्यांना त्या ड्रोनवर लावलेल्या कॅमेऱ्यातून दिसतं की त्या रूममधल्या मित्राने आत्महत्या केलेली आहे.

ही जी ड्रोनची झलक आपण पहातो ते ड्रोन याच स्टार्टअप कंपनीने बनवलेले, सुरुवातीच्या दिवसातले आहे.

त्यानंतर या कंपनीने मागे वळून पाहिलेच नाही. डिफेन्स फोर्सेस आणि सिक्यॉरिटी एजन्सीजसाठी या कंपनीने आजवर नानाविध प्रकारचे ड्रोन्स तयार करून दिलेले आहेत. निंजा, क्यू सेरीज, नेत्रा व्ही सिरीज, मेगाफोन असे अनेक प्रकारचे ड्रोन्स ही कंपनी तयार करते.

मित्रांनो, ड्रोन्स तयार करणे ही सोपी गोष्ट नाही त्याचबरोबर देशाच्या सुरक्षेसाठी ड्रोन्सचा वापर करता येईल ही कल्पनाही सुचणे फार विशेष. त्यामुळेच अशा एका स्टार्टअपने आपल्यासमोर जे उदाहरण निर्माण केले आहे त्यावरून हेच शिकायला हवं की संकटातूनच संधी निर्माण होत असतात, त्यामुळे प्रत्येक संकटाकडे डोळे उघडे ठेऊन पहा आणि उद्योगविश्वात क्रांती घडवा.. हे तुम्हालाही शक्य आहे.. !

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com