कल्पना साधी असली तरी मोठा बिझनेस उभारता येतो याचे उदाहरण आहे हे स्टार्टअप !! (#Friday_Funda)

एक अशी सोपी कल्पना जी कोणाच्याही लक्षात येऊ शकते खरंतर .. पण प्रत्यक्षात ती लक्षात येते ती केवळ काही धडपड्या तरूणांनाच आणि त्या कल्पनेला हवा देऊन पाहिल्यावर त्यातून सुरु होतो त्या चारही जणांचा एक मस्त झक्कास बिझनेस स्टार्टअप आणि तो इतका दणदणीत चालायला लागतो की त्या स्टार्टअपमुळे बड्याबड्या ब्रँड्सलाही त्यात सामील व्हावसं वाटतं स्वतःहूनच ...

काही वर्षांपूर्वी सुरू झालेली अशी एक स्टार्टअप कंपनी म्हणजे गोमेकॅनिक डॉट कॉम. रिषभ करवा, कुशल करवा, अमित भसीन आणि नितीन राणा या चार तरूणांनी एप्रिल 2016 मध्ये गोमेकॅनिक (https://gomechanic.in) या स्टार्टअपची सुरूवात केली.

लोकांनी मोठ्या हौसेनं घेतलेल्या कारची मेंटेनन्सची आणि सर्व्हिसिंगची जबाबदारी या कंपनीने आपल्या खांद्यावर घेतली आणि अल्पावधीतच कंपनीला चहूकडून जबरदस्त प्रतिसाद येऊ लागला.

क्षणात बुकींग करून कार मेकॅनिक घरी बोलावता येतो, कार त्याच्या हाती सुपूर्द करता येते आणि लोकांना आरामात आपल्या घरी बसून आपली कामं करता येतात. लोकांचा वेळ वाचतो, कष्ट वाचतात शिवाय पैसेही वाचतात आणि काय हवं ?

पण हे सगळं कंपनीसाठी मुळीच सोपं नव्हतं. कल्पना सुचणे आणि प्रत्यक्षात कल्पना हवी तशी वर्क होणे हे अत्यंत कठीण काम. सुरुवातीला कंपनीचे दोन वेगवेगळे बिझनेस मॉडेल्स होते, B2B आणि नंतर B2C. पण अगदी सुरुवातीला कंपनी फक्त B2B मॉडेलवरच लक्ष्य केंद्रीत करून होती. कंपनीची इच्छा होती की त्यांना ग्राहकांना देण्यात येणाऱ्या दराचाही नीट विचार करायला हवा आहे, पण बिझनेस क्लायंट्सकडूनच ते सुरूवातीला ग्राहक मिळवत होते. म्हणून त्यांनी सुरुवातीला B2C मॉडेलऐवजी त्यांनी B2B मॉडेलच सुरू केले. नंतर, त्यांनी बीटूसी मॉडेलअंतर्गतही व्यवसायाचा विस्तार केला. त्यांचे बिझनेस क्लाएंट्स म्हणजे उबर, अर्बनक्लॅप, ड्रूम, रेव्ही आणि असे अनेक नामांकित प्रसिद्ध ब्रँड्स आहेत आणि त्याचबरोबर सध्या कंपनी ग्राहकांशीही थेट ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे जोडलेली आहे. अशाप्रकारे कंपनीने दोन्हीही म्हणजे बीटूबी आणि बीटूसी मॉडेल्स यशस्वीरित्या आपल्या व्यवसायात समाविष्ट करून घेतले.

सुरुवातीचे सहा महिने कंपनीला आपली विश्वासार्हता कमावण्यासाठी फार मेहनत करावी लागली. हळूहळू कंपनीला आपला विस्तार करता आला आणि कंपनीने कारशी संबंधित अन्य सर्व लहान मोठ्या सेवाही देणे सुरू केले.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

गोमेकॅनिक काम कसे करते ?

FOCO (Franchise owned company operated) या मॉडेलवर ही कंपनी काम करते. लोकांच्या घरी जाऊन गाडी तिथून उचलणे आणि हव्या असलेल्या दुरुस्ती झाल्यावर पुन्हा ज्याची त्याची गाडी ज्याच्या त्याच्या घरी परत पोचवून देणे अशी चोख सेवा कंपनी देते.

कोणताही स्टार्टअप असो, त्याची कल्पना जितकी महत्त्वाची तितकीच महत्त्वाची असते त्या कल्पनेची प्रत्यक्षातील अंमलबजावणी. जेव्हा तसं काम एखादी नवी कंपनी करते तेव्हाच ती विश्वासार्ह होते.

तसंच उद्योजक म्हणून सतत नफा व पैसा कमावण्याच्या संधी शोधत रहाणे हे देखील आणखी एक वैशिष्ट्य, आणि हे गोमेकॅनिकला शंभर टक्के जमलंय असं म्हणायला लागेल.

कारच्या सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्सच्या कामाबरोबरच कारसे अधिकृत स्पेअर पार्ट्सही ही कंपनी विकते व त्यातून कंपनी कमिशन मिळवते. हे स्पेअर पार्ट्स वर्कशॉप्स, आऊटलेट्स, रिटेलर्स यांना विकले जातात व त्यातून कमिशन मिळवले जाते. त्याचबरोबर कारशी संबंधित ब्रँडेड प्रॉडक्ट्स आणि एक्सेसरीज विकूनही कंपनीला कमिशन मिळते.

सध्या गुरगाव, दिल्ली, नॉयडा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि बंगळुरु या शहरांमध्ये ही कंपनी कार्यरत असून कंपनीशी मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी, व्होल्व्हो, मित्सुबिशी अशा लक्झरी ब्रँड्स बरोबरच मारूती सुझुकी, हुँडाई, होंडा, टाटा, महिन्द्रा असे अनेक पॉप्युलर कार ब्रँड्स जोडले गेलेले आहेत.

मोठाल्या अधिकृत शोरूममधून सर्व्हिसिंगची सेवा ज्या दरात मिळते त्यापेक्षा तब्बल 40 टक्के सेव्हींग्स तुम्ही या ऑनलाईन पोर्टलकडून सेवा घेतल्यास होते असा दावा गोमेकॅनिक्सने केला आहे.

नाविन्यपूर्ण संकल्पना, आणि एकाच छताखाली कारच्या लहानमोठ्या ब्रँड्सना एकत्र आणण्याची एक युनिक आयडीया यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधते आहे. अनेक नामांकित कंपन्या या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करत आहेत.

मित्रांनो, व्यवसाय किंवा कोणताही उद्योगधंदा करताना आपला टार्गेट ऑडीअन्स कोण हे जेव्हा पक्क ठाऊक असतं तेव्हा तो व्यवसाय यशस्वी होतोच, मात्र गोमेकॅनिक सारखी मोठी कल्पना, जिथे एकाच छताखाली सामान्य ग्राहकाबरोबरच मोठे लक्झरी कार ब्रँड्स, नामांकित कार ब्रँड्स आणि त्याचबरोबर रोजगाराच्या संधीही निर्माण केल्या गेल्या आहेत अशी कल्पना निश्चितच ठळकपणे उठून दिसते हेच या स्टार्टअपकडून शिकायला हवं.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com