संभाषण करण्याच्या 7 पद्धती

संभाषण करणं ही एक कला आहे. जेव्हा आपल्याला कोणाशीही संवाद साधायचा असतो तेव्हा आपण संभाषणाने सुरुवात करतो, पण हेच संभाषण जेव्हा आपण अत्यंत प्रभावीपणे करतो तेव्हा आपल्यात आणि समोरच्या व्यक्तीमध्ये आपोआपच एक सुंदर नातं तयार होतं. संभाषण प्रभावी करण्यासाठी जितकी भाषा उत्तम काम करते तितकीच देहबोलीही उत्तम काम करते. आजच्या पोस्टद्वारे जाणून घेऊया, संभाषण करण्याच्या 7 प्रभावी पद्धती - 

1. सुरुवात करा - 

संभाषण जर तुम्ही सुरु करू शकलात तर नेहमी समोरची व्यक्ती प्रतिसाद देतेच. संभाषणातील पहिला शब्द ज्या व्यक्तीकडून येतो त्या व्यक्तीच्या हातात संभाषणाची पूर्ण सूत्र रहातात. समोरची व्यक्तीही अशा वेळी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार असते... आणि बरेचदा हा संवाद आनंदाने आणि सहमतीने घडतो. 

2. आपलेपणाने बोला - 

जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्या परिचयाची असेल किंवा जुजबी ओळखीतली असेल, तेव्हा संभाषणात वैयक्तिक प्रश्न मोकळेपणाने विचारू शकता. फक्त या संवादात तुमच्या बाजूने मनाचा मोकळेपणा व खुलेपणा असला पाहिजे. समोरच्याचं मन दुखावणार नाही अशा पद्धतीने प्रश्न विचारल्यास समोरच्या व्यक्तीला कदाचित मन हलकं करण्यासाठी जागा मिळू शकते. 

3. देहबोलीचा प्रभावी वापर - 

जेव्हाही तुम्ही कोणा अपरिचित व्यक्तिशी संवाद सुरू कराल, तेव्हा तुमच्या देहबोलीकडे लक्ष्य ठेवा. चेहऱ्यावरचं स्मितहास्य, देहबोलीतील खुलेपणा, योग्य पद्धतीने केलेला नेत्रसंपर्क, या सगळ्यामुळे समोरच्या व्यक्तिला तुमच्या विषयी मनात विश्वास निर्माण झाल्यावरच ती तुमच्याशी संवाद करू शकते हे लक्षात ठेवा. 

4. मनापासून दाद द्या - 

संवाद करताना कधीही खोट्या, तोंडदेखल्या वाक्यांचा वा शब्दांचा वापर करून कोणालाही खोटे अभिप्राय देऊ नका. उगाच स्तुती करू नका. मात्र, जेव्हा तुम्हाला समोरच्याला खरीखुरी दाद द्यावीशी वाटेल, त्या व्यक्तीचं कौतुक करावसं वाटेल, तेव्हा मोकळेपणाने ते करायला विसरू नका. संकोच करू नका. 

5. समोरच्याचं मत विचारा - 

एखाद्या गोष्टीबद्दल समोरच्याचं मत विचारा. संभाषणाच्या विषयाला अनुसरून प्रश्न विचारा. मत विचारा. आणि मुख्य म्हणजे, जेव्हा समोरची व्यक्ती आपलं मत मांडत असेल तेव्हा ते शांतपणे ऐकून घ्या. समोरच्याच्या मतावर तुमचं मत मांडणं दरवेळी गरजेचं असतंच असं नाही ...

6. संवादात मनापासून सहभागी व्हा - 

बरेचदा आपण कोणाशी संवाद सुरू तर करतो पण नंतर आपण मनाने त्या संवादातून अलगदपणे बाहेर पडून जातो. कधी ते आपल्या लक्षातही येत नाही. कधी आपलं लक्ष्य मोबाईल, टीव्हीकडे लागतं किंवा अन्यत्र भरकटतं. म्हणून, जेव्हा कोणाशीही संवाद साधाल तेव्हा त्यात मनापासून सहभागी व्हा. 

7. नाव लक्षात ठेवा - 

ज्या व्यक्तीशी तुम्ही बोलताय, त्या व्यक्तीचं नाव, संवादात येणारी अन्य नावं लक्षात ठेवा. त्या व्यक्तीच्या संभाषणातील अन्य तपशील जसं गावांची नावं, त्या व्यक्तीच्या पाळीव प्राण्यांची नाव, मुलांची नाव वगैरे लक्षात ठेवा. त्यामुळे त्या व्यक्तीला तुम्ही तिच्याप्रती खरोखरीच आत्मियता बाळगून आहात हे वेळोवेळी जाणवेल. 

लक्षात ठेवा,

कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधताना मुळात तुमचा हेतू प्रामाणिक असला पाहिजे आणि त्या संवादात तुम्ही मनापासून सहभागी झालं पाहिजे, तेव्हाच तुमचं संभाषण खुलतं, संवाद रंगत जातो !