There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
आपल्यापैकी अनेकांना आर्थिक बाबी नीटशा कळत नाहीत, कारण त्या कधीच आपल्या शाळाकॉलेजेसमध्ये आपल्याला कोणी शिकवत नाही. आर्थिक बाबींचं ज्ञान हे आपल्याला स्वतःहूनच जाणकारांकडून मिळवावं लागतं किंवा आपण स्वतःच आपल्या अनुभवांमधून, आपल्या चुकांमधून हे ज्ञान मिळवू शकतो.. फक्त एवढंच आहे की जर आपण महाभयंकर चुका केल्या तर आपलं जन्मभराचं आर्थिक नुकसानही होऊ शकतं हे आपण कायम लक्षात ठेऊनच कोणतीही आर्थिक जोखीम पत्करण्यासाठी तयार रहावं. अशा कोणत्या चुका ज्यामुळे तुमच्या जीवनात तुमची आर्थिक बाजू कायमस्वरूपी लुळी होऊ शकते .. चला जाणून घेऊयात -
1. कर्ज घेण्याची सवय -
कर्ज काढून किंवा ईएमआयवर वस्तू विकत घेण्याला हल्लीच्या काळात खूप प्रोत्साहन दिले जात असल्याचे दिसते. विविध माध्यमांमधून अशाप्रकारे ईएमआयवर वस्तू खरेदी करण्याबाबतचा आग्रह जाहीरातींद्वारे केलेला तुम्हीही पहात असाल. कमी व्याजाच् दरांवर वस्तू विकत घ्या, क्रेडीट कार्डवर लोन घ्या अशी भुरळ पाडणारी विधान करून ग्राहकांच्या ग्राहकत्त्वाला उत्तेजन दिलं जातं. पण, हा एक कर्जांचा विळखाच आहे हे ओळखा. त्यामुळे कर्ज काढून अनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या सवयीपासून कायम लांबच रहा.
2. सामाजिक दबावाखाली येऊन अतिखर्च करणे -
आपल्याकडे छोटासाही सण असो, उत्सव असो, घरगुती कार्यक्रम असो, अनेक गोष्टी, ज्या आपल्या आवाक्याबाहेर असतात त्या करण्यासाठी आपल्यावर सामाजिक दबाव प्रचंड असतो. उदा. लग्नांमध्ये नुसता दिखाव्यावर होणारा प्रचंड मोठा खर्च, हल्ली वाढदिवसांवरही प्रचंड खर्च केवळ स्टेटस जपण्याच्या हेतूने केला जातो.. असा खर्च करणे शक्यतो टाळाच. कारण, सामाजिक दबावाखाली येऊन जर तुम्ही उधळपट्टी कराल तर भविष्यात तुमच्याजवळ शिल्लक रक्कम उरणार नाही आणि पैसा नसला की समाजही तुमच्यासोबत उभा रहात नाही हे सत्य तुम्हाला ठाऊक आहेच.
3. उधळपट्टी करू नका -
तुमच्याजवळ समजा 50 हजार रुपये असतील आणि दुकानात गेल्यावर तुम्हाला एखादी 50 हजाराची वस्तू आवडली आणि केवळ स्वतःला हवी म्हणून तुम्ही सगळे पैसे त्या वस्तूवर कोणताही विचार न करता उडवून आलात तर तुम्ही स्वतःच स्वतःचं किती मोठं आर्थिक नुकसान केलं आहे हे तुम्हाला दुसरं कोणी सांगायलाच नको. जगातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफेट नेहमी सांगतात, IF you buy the things you don't need, you will soon be selling the things that you need ..
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
4. आर्थिक विषयक फुकट सल्ले देणाऱ्यांपासून सावध रहा -
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या जगात फुकट काहीही मिळत नाही, मग भले तो कोणाचा सल्लाच का असेना. त्यामुळे आर्थिक सल्ले जर कोणी फुकटात देत असेल तर त्यांच्यावर कधीच डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. कायम, सल्ला देणारी व्यक्ती कोण, तिची आर्थिक परिस्थिती कशी आहे, आणि त्या व्यक्तिने दिलेल्या आर्थिक बाबतीतील सल्ल्याविषयी स्वतः पूर्ण खात्री करून, नीट अभ्यास करून मगच त्या व्यक्तिचा सल्ला मनावर घ्यायचा की नाही हे ठरवा.
5. अर्थ व्यवस्थापनाची कौशल्य न शिकताच काहीतरी करायला जाणे -
पैसा हातात आल्यावरही तो नीट सांभाळता येणे व त्यात वृद्धी करता येणे ही फार महत्त्वाची कौशल्य आहेत. अनेकांजवळ ही कौशल्य नसतात. तसंच, ते याबाबतीत फारसे गंभीरही नसतात. त्यामुळे अर्थ व्यवस्थापनाची कौशल्य आधी नीट शिका, त्यासाठी आपला वेळ खर्च करा, बुद्धी वापरा आणि मग मोठ्या आर्थिक गुंतवणुकी वा खर्च करा, अन्यथा तुमची अवस्था शेखचिल्लीसारखी होईल जो स्वतःच्याच हातानी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो.
6. केवळ कंपनीने दिलेल्या हेल्थ कव्हरेजवरच फक्त अवलंबून राहू नका, तर स्वतःही आरोग्यासाठी पैशांचे व्यवस्थापन करा -
आजारपणांमध्ये सर्वाधिक पैसे वाया जातात हे वास्तव आहे. एक मोठं दुखणं आणि तुमच्याजवळची सगळी जमापुंजी त्याकरिता तुम्हाला खर्च करावी लागते..शिवाय शारिरीक व मानसिक हानी होते ती वेगळीच. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, की कंपनीने तुम्हाला दिलेल्या हेल्थ कव्हरेजवरच केवळ अवलंबून राहू नका. तुम्ही स्वतःही स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबियांसाठी हेल्थ कव्हर घ्या. यामुळे आजारपणांवर होणाऱ्या खर्चांमधूनही तुम्हाला फारसे नुकसान होणार नाही.
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com